पुणे/दि/ प्रतिनिधी/
सर्वसामान्य नागरीक आणि पोलीस यांचा दुरान्वयाने देखील संबध येत नाही. पोलीस म्हंटल की, भले भले पळ काढतात. नको ती ब्याद म्हणून कल्टी मारतात. आता एखादा सर्वसामान्य नागरीक असो की भुरटा चोर, लुटेरा असो की सरावलेला गुन्हेगार… पोलीस स्टेशन मध्ये आला की सरळ माणसा सारखा वागायला लागतो. पोलीस स्टेशनच्या दारात एखादा पेन पडलेला असेल किंवा एखादी १० रुपयाची कुणाची नोट पडली असेल तर ती उचलतांना देखील १०० वेळा विचार करतो. एवढंच कशाला, कुठं जरी एखादी वडापावाची गाडी, फळाची गाडी लावून थांबल तरी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कामगार आणि त्याच्या मागोमाग पोलीस आलेच म्हणून समजा. पोट भरण्यासाठी देखील अतिक्रमण आणि पोलीस सांभाळावे लागतात. तिथं पोलीसांच्या डोळ्यासमोरच जप्त केलेला ट्रक चोरून घेवून जाणे म्हणजे अरे… देवाऽऽ आजच्या काळात शक्यच नाही. मग हडपसर पोलीस स्टेशन च्या ताब्यातील सहाचाकी डंपर चोराने चोरून नेला आहे हे सत्य आहे.
हडपसर पोलीस स्टेशनच्या नाकासमोर अर्थात सार्वजनिक रोडच्या बाजूला कृष्णा वडेवाले हॉटेल समोर १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा सहा चाकी लाल रंगाचा डंपर ट्रक नं. एमएच/ ४२/टी ९५७२ जप्त करण्यात आला होता. त्यामध्ये ३.५ ब्रास अवैध गौण खनिज वाळू होती. त्या डंपरला सरकारी जामर साखळी लावून लॉक व पार्क करून ठेवला होता. हा डंपर त्यातील वाळू सहित कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. यबाबतची फिर्याद शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी दिली आहे. आता याचा तपास हडपसर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक शोभा क्षीरसागर ह्या करीत आहेत. अज्ञात इसमाविरूद्ध भादवी ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.