Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

रविंद्र बराटे कुठं आहे

पुणे महापालिकेतील अभियंते, मध्यवर्ती पेठातील बांधकाम व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्याशिवाय रविदर्शन कठीणच

पुणे/दि/ प्रतिनिधी/
खंडणी, बेकायदा सावकारी, फसवणूकीच्या प्रकरणातील फरार तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटेनी पुणे शहरातील १५ हजार पोलीस, ५ गुन्हे शाखा, शंभरावर वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि ३० पोलीस स्टेशनच्या कडक पहार्‍याला वाकुल्या दाखवित आहे. अहोरात्र पोलीस यंत्रणा सज्ज असतांना देखील रवींद्र बराटे शोधूनही सापडत नाही. बराटेशी संबंधित सहा ठिकाणी पोलीसांनी छापासत्र केल्यानंतर, बांधकाम व्यावसायिक, हॉटेलमालक, पुणे महापालिका, शासकीय कार्यालयातील ठेकेदार तसेच शासन व महापालिकेतील शेकडोंनी फाईल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान सोन्याची अंडी देणारे पुण्यातील पेठांमध्ये ज्यांनी सोन्याच्या अंड्याची उबवणी केंद्र बांधली आहेत, त्यांच्या मुसक्या आवळल्याशिवाय सध्यातरी रविदर्शन होणे शक्य नसल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या एका टोळीने रवींद्र बराटेशी संगनमत करून अनेक प्रकल्प उभे आहेत तसेच पुणे महापालिकेतील काही अभियंत्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीकांना धडा शिकविण्यासाठी माहिती अधिकाराचा क्लास रवींद्र बराटेकडे लावण्यात आला होता. छळवणूकीच्या या क्लासमुळे अभियंत्यांचे एवढे फावले की एक कनिष्ठ अभियंता स्वतःला कार्यकारी अभियंता असल्याच्या अविर्भावात आजही वावरत आहे. यावरून रवींद्र बराटेच्या उपकाराची परतफेड यांनी नेमकी कुठे व कशी केली आहे, हे देखील पोलीसांना शोधून काढणे आवश्यक आहे.

खंडणी आणि बेकायदा सावकारीचे १५ गुन्हे रवींद्र बराटेवर असले तरी प्रत्यक्षातील काही प्रकरणे अद्यापही बाहेर आलेली नसल्याचे दिसून येत आहे. तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे याने काही बडी पत्रकार मंडळी, पोलीस खात्यातील काही अधिकारी व कर्मचारी तसेच काही गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून पुणे शहरातील पेठांमध्ये देखील उपद्रवी कृत्य केली आहेत. 

 रवींद्र लक्ष्मण बराटे हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेला होता. परंतु पुणे शहरातील जुने वाडे खरेदी विक्री करणे, जे.व्ही व्दारे विकसित करणे, जमिनीची खरेदी विक्री करणे, बळजबरीने दुसर्‍याच्या जमिनीवर, वादातीत वाड्यांवर कब्जा करणे, खरेदीखत व पॉवर ऑफ ऍटर्नी करणे, पुरावे तयार करणे, वादातीत भूखंड आणि वाड्यांचे पॉवर ऑफ एटर्नी स्वतःचे नावे करणे आणि ह्या मिळकती तिसर्‍यालाच विक्री करण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले आहे. तरी देखील तो प्रचंड मोठा माहिती अधिकार कार्यकर्ता, भ्रष्टाचार संशोधनाचे किती महान कार्य करीत आहे, 

याबाबतच्या बातम्या दैनिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत होत्या. त्यामागे कोणते पत्रकार होते हे पोलीस खात्याला देखील आता पूर्णपणे  उमगले आहे.

रवींद्र बराटे सह १३ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई –


दमदाटी करून मालमत्ता हडप केल्या प्रकरणी तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटेसह त्याच्या टोळीतील १३ जणांवर शहर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. रवींद्र बराटे याच्या विरूद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे आता पर्यंत १५ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान याच्यापूर्वी सहकारनगर पोलीस स्टेशनकडे १९९५ ते २००० या कालावधीत सुमारे चार गुन्हे दाखल आहेत. सहकारनगर येथील २००० सालानंतर आता २०१९ व २०२० मध्ये कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


या प्रकरणी रवींद्र बराटे, शैलेश जगताप, देवेंद्र जैन, परवेश जमादार, सचिन धिवार, नितीन पवार, विशाल ढोरे, विनोद ढोरे, बालाजी लाखाडे, विठ्ठल रेड्डी, गणेश आमंदे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी या टोळीवर मोक्का कारवाईचे आदेश काढले आहेत. यामध्ये सर्वांना आश्‍चर्य वाटेल अशी नावे आहेत. पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, ला. आर्किटेक्ट विशेष म्हणजे गुन्हेगारी टोळीतील काही लोकांचा समावेश आहे. त्यामुळे हे एकच रॅकेट आहे की, यांच्या काही उपटोळ्या अजून कार्यरत आहेत, याचाही शोध घेणे आवश्यक आहे.
रवींद्र बराटेच्या घरावर पोलिसांचा छापासत्र-
पुणे शहर पोलीस दलाच्या ६ पथकांनी वेगवेगळ्या शहरात जावून त्याचा शोध घेवून परत आली आहेत. परंतु रवींद्र बराटे कुठेही आढळुन आला नाही. त्यामुळे रवींद्र बराटेशी इतर साथीदार व त्याच्या नातेवाईकांच्या घरावर छापेसत्र पोलीसांनी अवलंबविले आहे. पोलीसांनी बराटेच्या ६ ठिकाणी छापामारी केली आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले संशयास्पद कागदपत्रे, बनावट शिक्के आणि इतर सामुग्रीचा पोलीस पंचनामा करीत आहेत. परंतु रवींद्र बराटे हा शोधूनही सापडत नसल्यामुळे पोलिसांपुढे यक्षप्रश्‍न उभा राहिला आहे. रवींद्र बराटेने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालात जामिनासाठी पळत असतांना, तेथे देखील त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.


छापासत्रात बांधकाम व्यावसायिक, राजकारणी, शासकीय ठेकेदार व हॉटेलचालकांच्या शेकडो फाईल्स सापडल्या –

रवींद्र बराटे व त्याच्या नातेवाईकांच्या घरावर सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पुणे आणि मुंबईतील बांधकाम व्यावसायिक, पुणे महापालिकेतील ठेकेदार, शासकीय ठेकेदार, हॉटेलचालक, महसुल विभागातील कागदपत्रे, तसेच यांच्याशी संबंधित असलेले पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महापालिका, महसुल विभाग, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसिदार कार्यालय अशा वेग वेगळ्या कार्यालयातील शेकडोंनी फाईल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत.
बराटेशी संबंधित धनकवडी, लुल्लानगर येथील मधुसूधा अपार्टमेंट, सरगम सोसायटीतील रायरी बंगला, मुलगी चालवित असलेले ए झेड फार्मासिटीकल्स शॉप, झांबरे इस्टेट, मुकूंदनगर, बहिणीचे घर भरतकुंज सोसायटी, एरंडवणा येथील मेव्हण्याचे घर निशीदा सोसायटी, बिबवेवाडी अशा ६ ठिकाणी एकाचवेळी छापासत्र घालण्यात आले आहे.


जंग-जंग पछाडले तरी बराटे सापडत नाहीये, मग पुणे महापालिकेतील अभियंते, मध्यवर्ती पेठातील बांधकाम व्यावसायिकांच्या मुसक्या आवळल्याशिवाय रविदर्शन कठीणच –
पुण्यातील बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, सदाविश पेठ, नारायण पेठ या मध्यवर्ती पेठांमध्ये जुने वाडे खरेदी विक्री करणे, विकसित करणे तसेच पुणे महापालिकेकडून एका बांधकामाचा प्लॅन मंजुर करायचा व प्रत्यक्षात जागेवर दुसर्‍याच प्रकारचे अनाधिकृत बांधकामे करून अधिक आर्थिक फायदा करून घ्यायचा असेही प्रकार रवींद्र बराटे व त्याच्या उपपार्टनर असलेल्या टोळीने केले आहेत.
दरम्यान या सर्व कृत्यास पुणे महापालिकेतील बांधकाम विकास विभागातील काही वरीष्ठ व कनिष्ठ अभियंता यांनी नियुक्ती दिलेल्या कार्यक्षेत्रातील पेठेत रविंद्र बर्‍हाटे याच्या सुचनेनुसार पुणे महापालिकेतील पदाचा वापर केला आहे. जुन्या वाड्यांना धोकादायक इमारत म्हणून नोटीसा देणे आणि घर दुरूस्तीच्या नावाखाली, आहे त्याच जागेवर पुणे महापालिकेच्या नियमानुसार डागडुजी करण्याऐवजी जागेवर तीन ते चार मजली नविन इमारती कोणत्याही मंजुरीविना बांधण्यात आलेल्या आहेत.


सामाजिक कार्यकर्त्यांवर जिवघेणा हल्ला – पोलीस तरीही मूग गिळून गप्प –


रवींद्र बराटे व त्याच्या पांढरपेशा, उच्चपदस्थ साथीदारांनी किती व कसा उच्छाद मांडलाय हे आता सर्वांनीच पाहिलं आहे. बराटे व त्याच्या टोळीने त्यांच्या विरूद्ध ज्यांनी माहिती अधिकारात माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील जिवे ठार मारण्याचे काम केले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन ही त्याची प्रमुख सुरूवात होते. परंतु त्याच पोलीस स्टेशनने आजपर्यंत बराटे व त्याच्या टोळीला पाठीशी घालण्याचे काम केले आहे. महापालिकेतील अनेक अभियंते रवींद्र बराटेच्या संपर्कात आहेत, त्यामुळेच बेकायदा कामे केली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही हा त्याचा पुरावा आहे. पोलीसांचे दस्तऐवजही पुणे महापालिकेत गहाळ केले जात आहेत. पोलीस मूग गिळून गप्प आहेत, बराटे टोळी आजही सक्रिय आहे. त्यामुळे जंग जंग पछाडले तरी सापडत नसला तरी, जिसे ढूंढा गली गली, वो तो मेरे पिछवाडे गली असं पुणे पोलीसांना कदाचित वाटू नये म्हणजे मिळवलं.