
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे महापालिका निवडणूकीत भाजपा, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना आणि काँग्रेस या आलटून पालटून सत्तेत असलेल्या पक्षांचे गुन्हेगारांशी किती व कोणत्या स्तरावर संबंध आहेत, हे पुणेकरांनी मागील 15/20 दिवसात अनुभवले आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्यानंतरही त्याच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. गुन्हेगारांचा एवढा पगडा राजकारण्यांवर असल्याचेही दिसून आले आहे. दरम्यान तडीपार असलेला एक माजी आमदार स्वतःच्या पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरात राजरोसपणे फिरत असल्याची तक्रार एका पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असली तरी, पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सहकारनगर पोलीस स्टेशनसह बहुतांश हद्दीत तडीपार गुन्हेगार, उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले आहेतच, या शिवाय स्लिपा वाटण्याच्या नावाखाली हेच तडीपार गुन्हेगार पैसे वाटपातही पुढे असल्याचे काही भागातून आलेल्या माहितीनुसार समोर आले आहे.
पुणे महानगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यावर आली आहे. आज सोमवार दि. 12 जानेवारी रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील काही भागासह, लगतच्या काही प्रभागात तडीपार गुन्हेगार हे उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले असून, प्रस्थापित पक्षाचे उमेदवार देखील ह्या तडीपार व गुन्हेगारांना आपल्या सोबत घेवून फिरत असल्याचे दिसून आले आहे. मंगळवार दि. 13 जानेवारी रोजी प्रचाराची सांगता होणार आहे. दि. 14 रोजी प्रचारास सुट्टी असली तरी मकरसंक्रात असल्यामुळे तिळगुळ देण्याच्या बहाण्याने अनेक उमेदवारांकडून पैशांची पाकीटे तयार केली असून, ती पाकीटे रेकॉर्डवरील गुन्हेगार, तडीपार गुन्हेगारांच्या हाती देवून, स्थानिक कार्यकर्त्यांना पुढे करून थेट मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचेही खात्रीलायक वृत्त आहे. चाळी व झोपडपट्टीतील मतदारांसाठी एका पाकीटात दोन हजार रुपये तर सोसायट्यांमध्ये वाटपासाठी 3 ते 5 हजार रुपयांचे पाकीटे तयार करण्यात आली असल्याचे ऐकिवात आहे. ही बाब कार्यकर्त्यांना माहिती आहे, तीच बाब बातमीदारांपर्यंत पोहोचत आहे, मग ही बाब पोलीसांपर्यंत कशी पोहोचली नाही याचेही आश्चर्य व्यक्त करायला हरकत नाही. जी बाब सर्वसामान्य मतदारांना दिसते, तीच बाब पोलीसांना का दिसत नाही असाही प्रश्न निर्माण होत आहे.
उमेदवारांच्या प्रचारावर निवडणूकीसाठी नियुक्त केलेले पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह, पुणे शहर पोलीसांचाही मोठा ताफा उमेदवारासह प्रचारावर लक्ष ठेवून आहे. पुणे मनपा व पोलीसांची परवानगी घेवूनच उमेदवारांकडून निवडणूक प्रचार केला जात असला तरी, प्रचारात झेंडे किती, लोक किती, बॅनर्स किती, रिक्षा किती, गाड्या किती याची मोजदाद होत असली तरी प्रचारात तडीपार गुन्हेगार वावरत असतानाही, त्यावर पोलीसांकडून आक्षेप घेतला जात नाही, कारवाई केली जात नाही, त्यामुळे तडीपार गुन्हेगारांवर नेमके कुणाचे आहे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यायालय व पोलीस दंडाधिकाऱ्याने तडीपारीचे आदेश दिल्यानंतर, त्यावर नियंत्रण कुणाचे असते असा संभ्रमित प्रश्न असला तरी, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही जबाबदारी पोलीसांचीच आहे. तथापी पोलीस तडीपारांवर कारवाई करीत नाहीत याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था हे कागदावरच राहिले आहे की काय अशी शंका येत आहे. लोकशाहीचे सार्वत्रिक उध्वस्तीकरण सुरू आहे. निवडणूक आयोगाने देखील बघ्याची भूमिका घेणे धोक्याचे आहे. आज सोमवार पासुन मत विकत घेणारे... शुक्रवारी मतमोजणीनंतर, काही उमेदवार निवडूण येणार, काही उमेदवार पडणार, त्यातून खुन्नसबाजी होणार ती वेगळीच... पुढे... पुणे शहरात राडा झालाच तर पुढे काय... कोणाला दोष देणार ... वेळीच कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करणे पुणे शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ठरत आहे एवढच... आता पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्रीमंत महाराज अमितेश कुमार कोणती दैवी पॉवर वापरणार हे देवांनाच ठाऊक.
