Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खाजगीकरणातून विकासाची दारे बंद करण्याचा डाव डॉ. सुखदेव थोरात यांचा आरोप

sukhdov thorat-1

कोल्हापुर/दि/

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून मागासवर्गीयांना शिक्षण आणि आरक्षण बहाल केले. यातून मागासवर्गीयांचा विकास झाला. मात्र, खासगीकरणातून विकासाची ही दोन्ही दारे बंद करण्याचा व आरक्षण संपविण्याचा डाव सरकारकडून सुरू आहे,’ असा आरोप विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केला. ते माणगाव परिषद शताब्दी महोत्सव समितीने आयोजित केलेल्या समारंभात बोलत होते.

     यावेळी डॉ. थोरात म्हणाले, ‘केवळ ३३ टक्के लोकसंख्या असलेल्या उच्चवर्णीयांकडे ६६ टक्के जमीन आहे. उद्योग, पतपुरवठा संस्थांमध्येही उच्चवर्णीयांचेच प्राबल्य आहे. मागासवर्गीयांकडे केवळ चार टक्के जमीन आहे, तर उद्योगांमध्ये हा टक्का आणखी कमी आहे. उत्पन्नाचे निश्चित साधनच नसल्याने मागासवर्गीय आर्थिक दुर्बल राहिले.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक जागृतीमुळे मागासवर्गीय समाज शिक्षणाकडे वळाला तर त्यांनीच दिलेल्या आरक्षणाच्या घटनादत्त अधिकारामुळे नोकर्‍या मिळाल्या. यातून आजचा नवा मध्यमवर्ग दिसत आहे. या समाजाची गेल्या ३० ते ४० वर्षातील विकासाची गती यापुढे दिसणार नाही.’ असेही थोरात म्हणाले.

     डॉ. थोरात यांनी विविध अहवालांचा आधार देत मागासवर्गीयांच्या सध्यस्थितीची माहिती दिली. यापुढील आव्हानांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मागासवर्गीयांना मिळालेल्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यासाठी खाजगीकरण केले जात आहे. खाजगीकरणात आरक्षण नाही. सरकारी नोकर्‍यांमध्येही कंत्राटी नोकर भरतीमुळे नोकर्‍यांचे प्रमाण कमी होत आहे. सरकारच्या याच धोरणामुळे राज्यातील पाच लाख नोकर्‍या गेल्या आहेत. अधिकार टिकवण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल.’असेही थोरात म्हणाले.