
आधी बांधकाम पूर्ण होऊ दयायचे, मागाहून नोटीसा देऊन सेटलमेंट करण्याच्या धोरणामुळे पुणे शहरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील उपनगरांमध्ये अनाधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. जुनी बांधकामे पाडून त्यावर तीन/चार मजल्यांची बांधकामे सर्रास होत आहेत. तरी देखील बांधकाम विभागाचे अभियंता अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करीत नाहीत. थोडक्यात आधी अनाधिकृत बांधकाम पूर्ण होऊ दयायचे आणि मागाहून नोटीसा देवून सेटलमेंट करण्याच्या वृत्तीमुळे पुणे शहरात अनाधिकृत बांधकाम करणारांनी उच्छाद मांडला आहे. धानोरी अभियंत्याच्या कार्यक्षेत्रातील टिंगरे नगरमध्ये देखील अनेक अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत. काही व्यक्ती व संस्थांनी तक्रार अर्ज देवून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे, तरी देखील नोटीसा किंवा कारवाई केली जात नसल्याचे आजचे चित्र आहे.
एअरपोर्ट रोडवरील टिंगरे नगर –
एअर पोर्ट रोडवरील टिंगरे मधील आदर्श कॉलनी लेन नं. 2 येथील स.नं. 36 धानोरी येथे शेख नावाचे इसमाचे आरसीसी कॉलम मध्ये अनाधिकृत बांधकाम सुरू आहे. याबाबतची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते रामभाऊ फुगे यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाला दिली आहे. तथापी आज तक्रार अर्ज देवून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी जागेवरील अनाधिकृत बांधकाम थांबविण्यात आले नाही. उलट अधिक गतीने अनाधिकृत बांधकाम सुरू असल्याचे दिसून आले आहे.
अनाधिकृत बांधकामाचे फोटोसहित तक्रार अर्ज देण्यात आलेला आहे. तसेच संबंधित कार्यकारी अभियंता यांना भेटून त्यांना माहिती देण्यात आली आहे. तथापी बांधकाम विभागातील कोणताही अभियंता अनाधिकृत बांधकामाकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून आल्याची माहिती रामभाऊ फुगे यांनी नमूद केले आहे.
