Tuesday, August 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

10/12 वर्षात एकाही आरोग्य निरीक्षकाची बदली का होत नाही, 1200 कोटींचा खर्च आणि तथाकथित 2200 मे.टन कचरा

पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणतात, पुणे शहर स्वच्छ ठेवणार….
… पण शहराची स्वच्छता उपआयुक्त संदीप कदम यांना झेपणार का…

नॅशनल फोरम/पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे शहराच्या हद्दीतील कचरा उचलणे व कचरा प्रकल्पाव्दारे कचऱ्यावर प्रक्रिया करून कचरा जिरविण्यासाठी कायम व कंत्राटी असे एकुण 20 हजारापेक्षा अधिक स्वच्छता कर्मचारी, 20 पेक्षा अधिक कचरा प्रकल्प, 8 +5= 13 ठेकेदार, शेकडो आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) व त्यावर 1 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च करूनही पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून ते मध्यवर्ती शहरासह सर्व उपनगरात कचराच कचरा पडलेला असतो. कचऱ्यासाठी शेकडो वाहने उपलब्ध असतांनाही पुणे शहरात कचऱ्याची समस्या जैथे थे अशीच आहे. पुणे महापालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त नवलकिशोर राम हे पुण्याचे जिल्हाधिकारी तर होतेच परंतु पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजु होण्यापूर्वी ते देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयातही होते. त्यांना देखील कचऱ्याबाबत खोटी उत्तरे देवून त्यांची बोळवण केली जात आहे. वारजेतील कचऱ्याप्रकरणी कचरा उचलला होता, पण सकाळी कुणीतरी टाकला असेल असे खोटेच सांगण्यात आल्याचे दस्तरखुद्द आयुक्तांनीच पत्रकारांना सांगितले आहे. त्यामुळे कचऱ्यात पैसा कसा मुरविला गेला आहे त्याचे उत्तर आयुक्तांनीच दिले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचा झाडाझडती घेण्याची वेळ निश्चित आली आहे.

10/12 वर्षात एकाही आरोग्य निरीक्षक(सॅनिटरी इन्सपेक्टर) ची बदली का होत नाही-
पुणे महापालिकेच्या एकुण 15 क्षेत्रिय कार्यालयात कार्यरत असलेले आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) हे मागील 10 ते 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. महाराष्ट्र बदलीचा अधिनियमान्वये त्यांची बदली कायदयातील तरतुदीनुसार दर तीन वर्षांनी होणे आवश्यक असतांना, त्यांची आजपर्यंत बदली झाली नाही किंवा बदली केली जात नाही. यामागे नक्की कोणते इंगित असावे असाही प्रश्न सहन निर्माण होत आहे. समजा एखादया आरोग्य निरीक्षकाची बदली झाली तरी 10/15 दिवसांत त्याची बदली रद्द करून पुनः त्याला आहे त्याच ठिकाणी नियुक्ती दिली जाते. बदल्या ह्या अतिरिक्त आयुक्त कार्यालयातून जाहीर केल्या जातात, त्यांचीच स्वाक्षरी बदल्यांवर असते. अतिरिक्त आयुक्त देखील ज्या आरोग्य निरीक्षकाची बदली केली आहे, त्याची पुनः 10/15 दिवसांनंतर लगेच पुनः त्याच कार्यालयात या प्रश्नाचे उत्तरच मिळणे कठिण झाले आहे.

पुण्यातील कचऱ्यात काय दडलय, बदल्या का नाहीत-
पुण्यातील कचऱ्यात नेमकं काय दडलय, जेणेकरून एकही आरोग्य निरीक्षक त्यांचे त्यांचे क्षेत्रिय कार्यालय सोडून दुसऱ्या क्षेत्रिय कार्यालयात कामासाठी का जात नाहीत हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. सॅनिटरी इन्सपेक्टर यांचे वेतन व भत्ते समान आहेत. अमुक एका क्षेत्रिय कार्यालयात बदली झाल्यानंतर त्याचा पगार व देय भत्ते कमी होणार असतील तर एकवेळ समजु शकलो असतो. परंतु नियमानुसार सर्वांनाच वेतन व देय भत्ते समान असल्याने दुसऱ्या क्षेत्रिय कार्यालयात हेच सॅनिटरी इन्सपेक्टर का जात नाहीत. बदली झाली तरी ती बदली एका महिन्याच्या आत रद्द होते तरी कशी… पुण्याच्या कचऱ्यात नेमकं दडलय तरी काय….