Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

देशाच्या प्रमुखाने खोटे बोलू नये – ऍड. आंबेडकर

गडचिरोली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कोणतेही आकडेवारी फुगवून सांगतात. जीएसटीमुळे शासनाच्या तिजोरीत किती पैसा आला, याचे उत्तर मोदींकडे नाही. मोदी आपली शैक्षणिक कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत. खोटे बोलण्याची प्रवृत्ती देशाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या माणसात नसावी.

                देशाचा  प्रमुखच खोटे बोलत असेल तर इतरांचे काय, अशा शब्दात भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना टोला लगावला. येथील कात्रटवार भवनातआयोजित संवाद यात्रेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांच्या विमानात कोण बसले होते, याचा खुलासा त्यांनी करावा.

                मोदी बाहेर देशात जातात, तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश असावा याची यादी त्यांच्या संमतीशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे देशाला चुना लावून देश सोडून जाणारे लोकं त्यांच्या विमानात बसतातच कसे, असा प्रश्‍नही  त्यांनी केला.  गेल्या ७० वर्षांत वंचितांना कुणीच स्वीकारले नाही. त्यांना पाहिजे तसे शिक्षण मिळाले असते, तर त्यांनी आरक्षण मागितले नसते. ही व्यवस्थाच ओरबडणारी आहे. येथे कोण रक्तबंबाळ होईल हे सांगता येत नाही.

                केंद्रातील सरकार हे अतिविद्वान लोकांचे सरकार आहे. त्यामुळेच गडचिरोलीसारख्या मागास जिल्हयात वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येत नाही, अशीही टीका आंबेडकर यांनी केली.