Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय व अतिक्रमण विभाग यांच्या संमनमतातून, मार्केटयार्ड रोडवर अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण धारकांची मुजोरी वाढली.

marketyard-illagal

अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण विरोधात बांधकाम विभागाचा हातोडा, २४ तास उलटण्याच्या आतच अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत.

पुणे/दि/ प्रतिनिधी/

     श्रीमंत, धनाढ्यांना पैशाची एवढी मुजोरी चढली आहे की, गरीबांना अधिकाधिक पिळून काढायचे, त्यांच्या धामाच्या- कष्टावर अधिकाधिक आक्रस्ताळेपणा करून स्वतःच्या संपदेमध्ये वाढ करण्याकडे अधिक कल वाढला आहे. पुण्यातील आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठ रोडवर याच धनदांडग्यांनी कब्जा केला आहे. धनदांडग्यांचा हा कब्जा बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण विभागाच्या संगनमतातून हा सर्व कारभार सुरू आहे. सध्या बेरोजगारीचा स्फोट होण्याची वेळ आली असतांना, इथली शासन यंत्रणा भांडवलदारांच्या  पायावर लोळण घेत आहे.  बेरोजगारी, उपासमारीने त्रासलेला वंचित, शोषित वर्ग न्यायिक हक्कासाठी बंड करून मुजोरांना चाप लावण्याऐवजी आपआपसात लढत राहीला आहे. यामुळेच इथल्या भांडवलदारांनी शासन यंत्रणेचा वापर करून अधिकाधिक संपत्ती मिळविण्याकडे अधिक लक्ष दिले असल्याचे दिसून येत आहे.

      पुण्यातील मार्केटयार्ड रोडवर मार्केटयार्ड पोस्ट ऑफिसपासून ते सिटी प्राईड उत्सव बिल्डींग चौकाच्या दुतर्फा असलेल्या दुकानदारांनी, हॉटेलचाकांनी, व्यापार्‍यांनी इमारतीच्या फ्रंड,साईड व रिअर मार्जिनमध्ये बेकायदा बांधकामे व अतिक्रमण करून व्यापार सुरू केला आहे. याबाबत मागील आठवड्यातच नॅशनल फोरम वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. शिवाय पुणे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर, गुरूवार, शुक्रवार दि. २२ मार्च रोजी बांधकाम विभागाने कारवाई केली. जेसीबी व कटरच्या साह्याने कारवाई केली असली तरी कोणत्याही प्रकारचे साहित्य जप्त करण्यात आले नाही.

     या कारवाईची माहिती पुणे महापालिकेकडून प्राप्त झाली. तसेच कारवाईचे फोटो देखील जनसंपर्क विभागाकडून मिळाले आहेत. शुक्रवारी कारवाई झाल्यानंतर शनिवार दुपारपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील हॉटेल्स, होलसेल/किरकोळ किराणा माल दुकानदार, व्यापार्‍यांनी पुन्हा कारवाई केलेल्या जागेवर अतिक्रमण केले. पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई होवून २४ तास देखील उलटत नाहीत, तोच या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे करण्यात आली आहे. याबाबत माहिती समजते की, आजपर्यंत मार्केटयार्ड पोस्ट ऑफिस ते बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय पुणे येथे चार ते पाच वेळेस कारवाई करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. तथापी रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा सातत्याने राजकीय दबाव आणून कारवाई होताच पुन्हा ह्या राहूट्या उभ्या केल्या गेल्या आहेत.

मुजोरांवर फौजदारी कारवाई करण्यात बांधकाम व अतिक्रमण विभाग हात राखुन  काम का करीत आहे

     महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने नागरी भागातील बेकायदा बांधकामे व अतिक्रमण यांच्या विरूद्ध तत्काळ कारवाई करण्याचे तसेच संबंधितांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आहेत. तथापी पुणे महापालिकेतील बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग यांच्याकडून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण करणार्‍यांना बांधकाम व अतिक्रमण विभाग यांनी कोणत्या राजकीय दबावापुढे माना झुकविल्या आहेत याचा बोध होत नाहीये. परंतु ह्या सर्व प्रकारामागे प्रचंड आर्थिक स्वरूपाची देवाण-घेवाण होत असल्याची माहिती किरकोळ दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय व अतिक्रमण विभाग यांच्या संगनमतातून मार्केटयार्ड रोडवर अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण धारकांची मुजोरी वाढली.

     दरम्यान याबाबत खात्रीलायक वृत्त हाती आले असून, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचे सह आयुक्त श्री. सकपाळ व क्षेत्रिय कार्यालयातील अतिक्रमण  विभाग प्रमुख श्री. गायकवाड ह्यांनी हॉटेलचालक, व्यापारी व दुकानदारांवर आपली कृपादृष्टी ठेवली आहे. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या नाकावर टिच्चुन हॉटेल मिसळ तडका, बालाजी टे्रडिंग कंपनी, बालाजी ट्रेडर्स यांची मोठी दुकाने भर रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा करीत व्यापार सुरू असतो. शिवाय मार्केटयार्ड पोस्ट ऑफिस समोर देखील अनेक हॉटेलचालक असून, त्यांनी देखील इमारतीच्या समोरच्या दर्शनी भागात पत्रा, वासे व प्लॉस्टिकच्या साह्याने अनाधिकृत अतिक्रमण करून त्यांचे व्यवसाय सुरू ठेवले आहेत. या सर्वांकडून बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचे सह आयुक्त व अतिक्रमण विभाग प्रमुखां बरोबर मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय संबंधित अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमण करणार्‍यांविरोधात कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.

गरीबांचे मरण हेच बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचे धोरण –

     बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाने नेहमीच गरीबांवर कारवाईचा हातोडा उचलला आहे. काल रविवार दि. २४ मार्च २०१९ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास देखील हातावर पोट असलेल्या किरकोळ विक्रेत्यावर तुफान कारवाई करून त्यांना पिटाळून लावले असल्याचे दिसून येत आहे. ज्यांच्या अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे, त्या धनाढ्यावर कारवाई न करता, तोंडदेखलेपणाने निव्वळ हातावर पोट असणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. व कारवाईचे रेकॉर्ड मेंटेन केले जात आहे.      बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचे सह आयुक्त श्री. सकपाळ व अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्री. गायकवाड यांच्या शुभाश्रीर्वादामुळे अनाधिकृत अतिक्रमणे करणारे हॉटेलचालक, किराणामाल दुकानदार, विशेषतः बालाजी ट्रेडींग कंपनी, बालाजी टे्रडर्स यांच्यावर प्रचंड कृपादृष्टी ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणी तातडीने कारवाई करून, दोषी अधिकारी व कर्मचारी तसेच बेलगाम व्यापार्‍यांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरीकांतून व्यक्त केली जात आहे.