नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
सध्या नगरसेवकाविना पुणे महापालिका आणि क्षेत्रिय कार्यालये भकास झाली आहेत. पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नगरसेवकांचा दबाव नाही, नगरसेवक नाहीत त्यामुळे कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्ते नाहीत तर नागरीकही पुढे येत नाहीत. त्यातच गैरकृत्यांचा जाब विचारणारी पुणे महापालिका मुख्य सभा अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत पुणे महापालिकेत भ्रष्टाचार आणि गैरव्यवरांने कळस गाठले आहे. पुणे महानगरपालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयात देखील कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, निविदा कामांच्या माध्यमातून विकास कामांचे ढोंग करून पुणे महापालिकेच्या हातावर तुरी देण्यात आलेल्या आहेत. तत्कालिन सहायक महापालिका आयुक्त श्री. प्रकाश पवार आणि उपअभियंता श्री. राजेश फटाले यांनी हा गैरव्यवहार दडपुन टाकण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कनिष्ठ अभियंता शशिकांत निवदेकर, प्रज्ञा कोडापे व अजय खामकर यांच्यासह प्रकाश पवार व राजेश फटाले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना पुणे महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री. अनिरूद्ध चव्हाण यांनी केली आहे.
प्रकाश पवार व राजेश फटाले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा-
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाने माहे 2022-23 या वित्ती वर्षात करण्यात आलेल्या निविदा कामांमध्ये कमालिचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाले आहेत. त्रयस्थ संस्थेने देखील दुरूस्ती व परिरक्षण कामांची तपासणी करण्याचे बंधन नसल्यामुळे कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बीले अदा केली आहेत. याबाबत जुन 2023 रोजीपासून तक्रार अर्ज करण्यात आले आहेत. तथापी त्याची कुठलिही चौकशी न करता, तत्कालिन उपअभियंता व तत्कालिन महापालिका सहायक आयुक्त श्री. प्रकाश पवार यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. उपअभियंता श्री. राजेश फटाले यांनी देखील गैरव्यवहार झाला आहे हे दिसत असतांना देखील कोणतीही चौकशी केली नाही.
उलट गैरव्यवहाराचे मास्टरमाईंड शशिकांत निवदेकर, प्रज्ञा कोडापे व अजय खामकर यांना पाठीशी घालण्याचे काम श्री. पवार व फटाले यांनी केले आहे. त्यामुळे श्री. प्रकाश पवार व राजेश फटाले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन फेडरेशनच्या वतीने पुणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त श्री. विक्रम कुमार व सध्या पुणे महापालिकेत नव्याने रुजु झालेले आयुक्त व प्रशासक श्री. राजेंद्र भोसले यांचेकडे निवेदन सादर केले आहे.
आसाम मधुन बोगस डिग्री आणलेले श्री. निवदेकर यांच्याकडून भ्रष्टाचाराचा कळस –
पुणे महापालिकेत सुमारे 150 पेक्षा बोगस अभियंते असून, त्यांनी आणलेल्या बोगस डिग्य्रांची चौकशी करून त्यांना पुणे महापालिका सेवेतून बडतर्फ करण्याबाबत आम आदमी पक्ष, इतर राजकीय व सामाजिक संघटनांसह रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी शासनासह पुणे महापालिका आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिले आहेत. तथापी त्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. दरम्यान आसाम राज्यामधुन चार सेमिस्टर असलेली व एआयसीटी अप्रुव्हल नसलेल्या शैक्षणिक संस्थेतून श्री. शशिकांत निवदेकर यांनी डिग्री आणली आहे. व आता ते कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान इंजिनिअरींग मधील ट का ढ न समजणाऱ्या शशिकांत निवदेकर यांच्याकडे बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील विकास कामे करण्यासाठी नियुक्ती देण्यात आली होती. तथापी श्री. निवदेकर यांनी इंजिनिअगरींग मधील काहीही कळत नसतांना, एखाद्या रोडछाप गवंड्यासारखे कामे करवुन घेतली आहेत. काही ठिकाणी कामे न करताच, एमबी लिहण्यात आलेली आहे व त्याची देयके अदा केली आहेत. तसेच श्री. प्रकाश पवार यांनी देखील निविदा कामांची कोणतीही पाहणी न करता, बिलांची अदायगी केली आहे. त्याबदल्यात प्रकाश पवार यांना निविदा निहाय 15 टक्के तर शशिकांत निवदेकर यांना निविदानिहाय 10 ते 15 टक्के रक्कम मिळालेली आहे. त्यातच बहुतांश निविदा कामे ही 10 ते 35 टक्के बिलोने देण्यात आलेली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात निविदा कामे किती व कशी झाली असतील याचा पुणेकरांनी विचार करावा. त्यातच प्रज्ञा कोडापे व अजय खामकर यांनी देखील भोंगळ स्वरूपाची कामे करून पुणे महापालिकेची फसवणूक केली आहे.
त्यामुळे राजेश फटाले, प्रकाश पवार, शशिकांत निवदेकर, प्रज्ञा कोडापे व अजय खामकर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. क्रमशः (भाग 1 ते 15)