Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे पोलीस आयुक्तालयाचा पांढर्या हत्तींवर अंकुश गुन्हे शाखेची पुनर्रचना, १३ पैकी ५ पथके बरखास्त!

पुणे पोलीस आयुक्तालयाने पांढरा हत्ती का पोसायचा

शून्य कारभारी गुंडा स्कॉड, खंडणी, दरोड आणि अंमली पदार्थ विभाग तत्काळ बरखास्त करा –

*        आवश्यक विभागाचे मनोबल वाढवा, अनावश्यक विभाग तत्काळ बरखास्त करा –

* पोलीस ठाणी सक्षम आहेतच पण ती अधिक स्मार्ट करा –

*        बदली व नियुक्ती प्रक्रियेमध्ये कोण किती थैली देतो, याच्यावर त्याचे मेरिट तपासू नये, सर्वांना एकाच तराजुत तोलू नये –

*        प्रतिनियुक्तीवरील कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस ठाणे कामकाजात पाठवा –

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

          पुणे शहराची वाढती लोकसंख्या, घनदाट लोकवस्त्या, परराज्यातील व विदेशातील नागरीकांचे नोकरीनिमित्त, व्यापारानिमित्त तसेच शिक्षण व संशोधनात्मक कामासाठी शहरातील वास्तव्य, या सर्वांचा पोलीस ठाण्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. शिवाय स्थानिक गुन्हेगारी, अपव्यापार, राजकीय व सामाजिक संघर्षाच्या ठिणगीच्या ठिकर्‍या नेहमीच पोलीस ठाण्यावर पडत असतात. त्यामुळेच शहर आयुक्तस्तरावर गुन्हे शाखा, विशेष शाखा, महिलांचा अपव्यापार ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून, गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी उपाय योजना करण्यात आली आहे. तथापी राज्य शासन, गृहमंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालय यांच्या व्यापक जनहिताचा काही पोलीस मंडळींनी गैरअर्थ काढला. पोलीस खात्यातील काही असंतुष्टांना मानसन्मान मिळावा म्हणून पुणे शहर पोलीस दलात गुन्हे शाखेची डझन दोन डझन पथके निर्माण करण्यात आली. त्यामुळे गुन्हे शाखेत कोणत्या विभागात नेमके कोणते काम व तपास सुरू आहे, याचा काही ताळेबंदच राहिला नव्हता. त्यामुळेच आम्ही मार्च २०१८ पासून पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पांढरा हत्ती का पोसायचा… अशा प्रकारची पथके बरखास्त करून, या पथकातील पोलीसांना, पोलीस ठाण्याच्या कामकाजात पाठविण्याचे वृत्त आम्हीच प्रकाशित केले होते.

आवश्यक विभागाचे मनोबल वाढवा, अनावश्यक विभाग तत्काळ बरखास्त करा –

          नॅशनल फोरमच्या वर्ष १९ वे, अंक क्र. ५, दि. ५ मार्च २०१८ च्या  अंकात वरील मथळ्याखाली बातमी प्रसारित करून, मागील १० महिन्यांपासून याचा पाठपुरावा करीत होतो. आज डिसेंबर २०१८ मध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. आर. वेंकटेशम यांनी गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्येदरोडा प्रतिबंधक विभाग, होमिसाईड, प्रॉपर्टी सेल, वाहनचोरीविरोधी पथक व संघटीत गुन्हेगारी विरोधीपथक बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

          पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम हे सर्व पोलीस ठाण्यज्ञांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची दर मंगहवारी बैठक घेऊन तीत पोलीस ठाण्याच्या कामगिरीचा आढावा घेतात. मात्र गुन्हे शाखेतील विविध पथके काय काम करीत आहेत, याचा आढावा स्वतंत्रपणे नियमित घेतला जात नव्हता. त्यामुळे पोलिसांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांचनी दररोज काय काम केले याचा आढावा घेण्यास सुरूवात केली असता, त्याीत अनेक पथकांची कामगिरी सुमार दर्जाची असल्याचे दिसून आले. एकच काम दोन तीन विभाग करीत असल्याचे दिसून आले.

          खरं तर हा सर्व प्रकार आम्ही मागील एक वर्षभरापासून मांडतच होतो. परंतु उशीरा का होईना अनावश्यक विभाग बरखास्त करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.

          गुन्हे शाखेच्या युनिट १ ते ५ मधील युनिट क्र. ४ हे अगोदरच प्रभावहीन झाले आहे. आता गुन्हे शाखेचे चार युनिट कार्यरत आहेत. खरं तर गुन्हे शाखा ही पुणे शहराचे संरक्षण कवच आहे. त्यामुळे त्याचे वेगवेगळे युनिट बरखास्त करून, केवळ एकच गुन्हे शाखा कार्यरत ठेवावी.

          गुन्हे शाखा व विशेष शाखा हा पुणे शहर पोलीस दलातील सर्वाधिक चर्चेत असलेला विभाग आहे. सर्व गंभिर गुन्हे, गँगवॉर, अंडरवर्ल्ड यांचा तपास याच  स्वंतत्र विभागाकडुन होणे आवश्यक आहे. पोलीस ठाण्यांना या सर्व प्रकरणांत गुंतवून ठेवणे वा गुंतून राहणे शक्य नाही ही बाब सर्वाविदीत आहे. तसेच स्पेशल ब्रँच या विभागाकडून चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट सारखी कामे केली जातात त्यामुळे हा विभाग देखील सक्षम ठेवणे, तेथील मनुष्यबळाचा उपयोग करून घेणे तसेच त्यांचे मनोबल टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

          या व्यतिरिक्त महिलांचा अपव्यापार हा कक्ष देखील असुन ओळंबा आणि नसुन खोळंबा अशी अवस्था आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार हा विभाग ठेवणे तसे आवश्यकच आहे. नाहीतर धरल तर चावतय आणि सोडलं तर पळतय असे या विभागाचे दुर्देव आहे. या व्यतिरिक्त इतर शिल्लक राहिलेले इतर युनिट देखील बरखास्त करून, त्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजात पाठविणे आवश्यक आहे. अतिआवश्यक विभागाचे मनोबल वाढवा, अनावश्यक विभाग तत्काळ बरखास्त करावेत.

पोलीस ठाणी सक्षम आहेतच पण ती अधिक स्मार्ट करा –

          पुणे शहरातील पोलीस हा सुरक्षा व्यवस्थेचा कणा आहे. तो व्यवस्थित राहीला तर पुणे शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था चांगली राहू शकते. सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयात ३०/३२ पोलीस ठाणी आहेत. ती सक्षम आहेतच परंतु अधिक स्मार्ट करण्याची आवश्यकता आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पारंपारिक पद्धतीबरोबरच डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग अधिक वाढविणे आवश्यक आहे.

          यामुळे गुन्हे रोखण्यासाठी अधिक मदत होवू शकते. शिवाय गुन्हेगारांवर वचकही राहील. गुन्हेगारांचा माग काढण्यात डिजिटल तंत्रज्ञान अधिक उपयोगी पडू शकते. दरम्यान मध्यंतरी केंद्र शासनाच्या ई- गर्व्हनन्स योजनेंतर्गत गुन्हा व गुन्हेगारीचा माग काढण्यासाठी नेटवर्क व  यंत्रणा (क्राईम ऍन्ड क्रिमिनल टॅ्रॅकिंग नेटवर्क ऍन्ड सिस्टिम) हा प्रकल्प प्राधान्याने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात राज्यातील १०५४ पोलीस ठाणी आणि घटक कार्यालये, परिक्षेत्र कार्यालये, पोलीस उप आयुक्त कार्यालये/ सहायक पोेलीस आयुक्त कार्यालये, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुन्हे अन्वेषण विभाग,  राींज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशी एकूण ६२९ वरिष्ठ कार्यालये एकशमेकांशी जोडण्यात आली असल्याची माहिती पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई यांनी माहिती दिली आहे. दरम्यान….

बदली व नियुक्ती प्रक्रियेमध्ये कोण किती थैली देतो, याच्यावर त्याचे मेरिट तपासू नये, सर्वांना एकाच तराजुत तोलू नये –

          केंद्र व राज्य शासन, गृहमंत्रालय, पोलीस महासंचालक कार्यालयाने कितीही यंत्रणा निर्माण केली तरी पोलीसांचे विहीत असे प्रशिक्षणा बरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. जो पोलीस कर्मचारी विभागातील जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्याची क्षमता धारण करतो किंवा त्याच्याकडे कामाची हातोटी आहे, जुजबी कामे सहजपणे करू शकतो अशा होतकरू पोलीस कर्मचार्‍यांना, पोलीस अधिकार्‍यांना कि-पोस्ट देणे आवश्यक आहे. बदली व नियुक्ती प्रक्रियेमध्ये कोण किती थैली देतो, याच्यावर त्याचे मेरिट तपासू नये, सर्वांना एकाच तराजुत तोलू नये.

          पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील बदल्या व नियुक्त्यांबाबत मागील वर्षभरापासून प्रचंड लेखन झाले आहे. त्यामुळे या वृत्तात इतर संदर्भ घेणे उचित नाही.

प्रतिनियुक्तीवरील कार्यरत पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस ठाणे कामकाजात पाठवा –

          पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उप आयुक्त कार्यालये, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये व इतर तद्अनुषांगिक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर अनेक पोलीस पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. एकाच विभागात, एकाच परिमंडळात वर्षानुवर्षे अनेक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. झोन बदलुन ते बाहेर गेलेलेच नाहीत.

          त्यामुळे पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उप आयुक्त कार्यालये, सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये व इतर तद्अनुषांगिक कार्यालयात प्रतिनियुक्तीवरील पोलीस कर्मचार्‍यांच्या झोन बदलुन बदली आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे एकाच विभाग व परिमंडळात कार्यरत असल्याने त्यांचे हितसंबंध अधिक दृढ झाले आहेत. प्रत्येक बदली प्रक्रियेत यांचाच वरचष्मा असतो. बदली आदेश निघण्याआधीच ही मंडळी थैली घेवून पोलीस आयुक्तालयात हजर असतात.           त्यामुळे अशा थैलीबहाद्दर व हिंतसंबंध दृढ झालेल्यांना झोन बंदीचा आदेश होणे आवश्यक आहे.तसेच त्यांना वरीष्ठ कार्यालयाएैवजी पोलीस ठाणे व पोलीस चौकी कामकाजात पाठविणेच आवश्यक आहे. दरम्यान प्रतिनियुक्तीवरील कर्तव्य बहाद्दुर कर्मचार्‍यांची यादी यापुढील अंकात प्रसारित करण्यात येईल. इतर अनेक मुद्दे आहेत. तुर्तात इतकेच.