Saturday, April 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महार समाजाची शौर्यगाथा शिवकाळापासून, अनेकांनी केला कौतुकाचा वर्षाव

Mahar Regiment

मुंबई: महार समाजाची शौर्यगाथा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची आहे. शिवकाळामध्ये स्वराज्यातील किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही महार समाजावर असे, अशा शब्दांत अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला.  शनिवारी महार रेजिमेंट अमृत महोत्सव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

      गेट वे ऑप इंडियासमोर झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे व महार रेजिमेंटचे अनेक महत्त्वाचे लष्करी अधिकारी उपस्थित होते. भीमा कोरेगावच्या लढाईचा वर्धापन दिन १ जानेवारी रोजी येत आहे.

      गेल्या वर्षी भीमा कोरेगाव येथे झालेला हिंसाचार व त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक विद्वेषाच्या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमाला अनेक राजकीय व सामाजिक आयाम असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या वेळी अनेक वक्त्यांनी आपले मत मांडताना सांगितले की,  सैन्यदलातील सैनिक देशासाठी सर्वस्व त्याग करत असतात. परंतु अशा प्रकारे त्यांचा सत्कार केला जात नव्हता तो होत आहे, त्याचा खरोखरीच आनंद आहे.

      महार रेजिमेंटच्या शौर्यगाथांबाबत अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. ब्रिटिशांच्या काळात युध्दामध्ये सर्वात प्रभावी काम हे महार बटालियननेच केले आहे. या बटालियनची पुन्हा स्थापना करण्यात विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे अनेकांनी आवर्जून उल्लेख केला.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महार रेजिमेंटमध्ये भरती होण्याचेही तेव्हा तरुणांना आवाहन केल्याचे अनेकांनी आठवणी सांगितल्या. महार समाजाच्या शौर्याचा खूप मोठा आलेख आहे. भारताच्या भविष्याकरिता या शौर्याचा सन्मान करणे हे सरकारचेच नव्हे तर प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचे कर्तव्य असल्याचा सूर यावेळी निघाला.

म्युझियम उभारू- महार रेजिमेंटच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास येणार्‍या पिढ्यांना समजावा व कायम लक्षात राहावा यासाठी म्युझियम उभारण्याची गरज असल्याचे अनेकांनी सांगितले. भारत हा कमकुवत देश नाही, हे देशातील सैनिकांनी आपापल्या शौर्यगाथांनी कायम दाखवून दिले आहे व त्यात महार बटालियनचा सिंहाचा वाटा आहे