
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण-
पुणे महापालिकेने वॉर्ड ऑफिस, उपआयुक्त कार्यालयांसह खाते प्रमुख, विभाग प्रमुखांना निश्चित रकमेच्या निविदा मंजूर करण्याचे अधिकार सुपूर्द करण्यात आले आहेत. दरम्यान कुठे काम करावे, कुठे निविदा कामे करू नये, पुणे महापालिका निधीचा वापर करतांना त्याबाबत निश्चित अशी धोरणे सुधारित निवेदेत नमूद आहेत. तसेच एकाच कामावर पुन्हा दुसरे काम करू नये, क्षेत्रिय कार्यालयांनी निविदा कामे केल्यानंतर त्याच कामावर मुख्य खात्याने रक्कम खर्च करू नये, निविदा काढू नये, तसेच मुख्य खात्याने केलेल्या कामांवर पुन्हा वॉर्ड ऑफिस, उपआयुक्त व त्यांच्या नियंत्रणाखालील कार्यालयांनी निविदा काढू नयेत अशा तरतूदी आहेत.
तथापी क्षेत्रिय कार्यालाने केलेल्या कामांवर पून्हा मुख्य खात्याकडून कामे करण्याबाबत निविदा काढल्या जात असून, लाखाचे बारा हजार या म्हणीप्रमाणे पुणे महापालिकेतच्या विद्युत विभागाच्या कारभार सुरू आहे. घर जाळून कोळशाची वखार थाटण्याचा उद्योग सध्या पुणे महापालिकेत सुरू आहे. याचे एक उदाहरणच दयायचे तर, पुणे महापाकिलेच्या विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती आरती नाथी यांनी एकुण तीन निविदा कामांच्या जाहीरात वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केलेली आहे. त्यात पुणे महापालिकेच्या जुन्या व नव्या इमारतीमधील ध्वनीक्षेपण यंत्रणेची ऑपरेटींग करणे या कामासाठी 25 लाखांची निविदा काढली आहे. तसेच धनकवडी क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील दोन निविदा कामे काढण्यात आली आहेत. यात मांगडेवाडी व आंबेगाव खुर्द मधील अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर प्रकाशव्यवस्था करण्याची निविदा कामे काढण्यात आली आहेत. आंबेगाव खुर्द निविदा कामांसाठी 75 लाख रुपये व मांगडेवाडी गावातील कामासाठी 69 लाख रूपयांची निविदा काढली आहे.
दरम्यान पुणे महापालिकेत आंबेगाव खुर्द व मांगडेवाडी गावे समाविष्ठ झाल्यानंतर लगेचच पुणे महापालिकेने सन 2022, 2023,2024 व 2025 या कालावधीत क्षेत्रिय कार्यालय व उपआयुक्त कार्यालयासह विकेंद्रीत कामे यांनी यापर्वीच निविदा कामे काढून, त्यापोटी ठेकेदारांची बीलेही अदा केलेली आहेत.
निविदा कामांचे एक उदाहरण दयायचे तर, मांगडेवाडी या समाविष्ठ गावातील आनंदनगर सोसायटी, गुरू गणेश पार्क, उमाशंकर सोसायटी, राधाकृष्ण सोसायटी, रासकर पार्क, चांगभल चौक परिसर, भिलारेवाडी गावठाण, जांभूळवाडी गाव, जैन मंदिर परिसर, कोळेवाडी गाव, लिपाने दरा, येथे मागील 2022 पासून आज 2025 पर्यंत 5 लाखापासून 10 लाखांच्या आत क्षेत्रिय कार्यालयाने निविदा कामे केली आहेत. तसेच 25 लाखापासूनची कामे विकेंद्रीतने केली आहेत. तरी देखील केलेल्या कामासाठी पुन्हा नव्याने निविदा काढून त्यापोटी 69 लाख रुपयांची तरतुद केली आहे.
आंबेगाव खुर्द येथील वरद लेक सिटी, अटल 11, 12, व आगम पार्क , अमृत खाण सोसायटी, स.नं. 50, 51, 61 व 68 ते जैन मंदिर, काका पवार तालिम चौक, सिंहगड कॉलेज रोड, लॉ कॉलेज परिसरात यापूर्वीच प्रकाश व्यवस्थेत सुधारणा करण्याची कामे करण्यात आली आहेत. याबाबत धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय व सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय यांच्या रजिस्टरसह बील देयकाच्या नोंदी आहेत. पुणे महापालिकेच्या वित्त व लेखा खात्याकडे याच्या नोंदी आहेत.
थोडक्यात 10 लाख रुपयांपर्यंतची निविद कामे करून पुढे 70 लाख रुपयांना चुना लावण्याचा हा प्रशासकीय डाव आहे. पुणे महापालिकेचे लाखाचे बारा हजार करण्याचा विद्युत विभागातील या गुणवंत अभियंत्यांचा चांगलाच समाचार घेणे आवश्यक ठरत आहे.
( नॅशनल फोरमच्या सोमवारच्या अंकात- पुगप करणाऱ्या गुणवंत अभियंत्यांची आता नार्को टेस्ट करायची काय… की थेटच कामाचे वर्षनिहाय, कामनिहाय, खर्चनिहाय पोस्टमार्टेम करायचे)
