Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राज्यात दोन वर्षांत ८१९ कारखाने बंद पडले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तोंड वर करून सांगितले, कामगारांची उपासमार

subhash desai

मुंबई/दि/

       महाराष्ट्र राज्यात विविध कारणांमुळे २०१५-१६ मध्ये १५४ तर २०१७-१८ मध्ये ८१९ कारखाने बंद पडले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत तोंड वर करून सांगितली. त्याचवेळी बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, वर्षभरापासून बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योग विभागातर्फे अथक प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची कुर्‍हाड कोसळली आहे.

       राज्यात गेल्या काही वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण सातत्याने वाढत असून, नोटाबंदीच्या निर्णयामुळे लहान उद्योजक आणि किरकोळ व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील कारखाने बंद पडत असल्यामुळे बेरोजगारीची समस्या तीव्र होत असून, राज्यात ५० लाख शिक्षित तरुण बेरोजगार झाल्याविषयीच्या मुद्यावर कॉंग्रेसचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी शुक्रवारी अर्धा तास चर्चेची सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना उद्योग मंत्री देसाई म्हणाले की, राज्यातील बंद कारखाने सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी गेल्या वर्षेभरापासून उद्योग विभागातर्फे विविध रोजगारविषयक उपक्रम राबविले जात आहेत.

बंद उद्योगांसाठी धोरणात तरतूद

       राज्यातील बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने नवीन औद्योगिक धोरणात तरतूद केलेली आहे. त्याचा २१८ उद्योगांनी लाभ घेतला आहे. अडचणीतील इतर उद्योगांना पुनरूज्जीवन केले जाईल, असे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. सहकारी औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांसाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्या निधीतून रस्ते, पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.