Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मिलिंद एकबोटे, मनोहर कुलकर्णीसह १६३ जणांना जिल्हाबंदी

पुणे/दि/ प्रतिनिधी/
हिंदू एकता आघाडीचा मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचा मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणार्‍या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार झाला होता. या प्रकरणी मनोहर कुलकर्णी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कुलकर्णी आणि एकबोटेला जिल्हा बंदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना या ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरवण्यात आले. कार्यक्रम सुरळीतपणे होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले. बैठकीला पाटील यांच्यासह पोलिस उपायुक्त मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भीमा कोरेगाव शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, तसेच भीमा कोरेगाव, पेरणे, वढू बुद्रुक आदी गावांतील नागरिक उपस्थित होते.