Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या बे-कायदा मिळकतींवर पुणे शहर पोलीस आयुक्त बा-कायदा टाच आणणार काय

पुणे शहरात हेल्मेटची सक्ती रट्टावून केली जाते, मग शासनाने बंदी घातलेला गुटखा व जुगारावर कारवाई करण्यात शासन-लोकसेवक कसुरी का करीत आहेत.

पुणे/दि/ प्रतिनिधी/

                पुणेकर नागरीकांच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करून, पुणे शहरातील वाहतुक पोलीसांनी हेल्मेट सक्तीची रट्टावून कारवाई सुरू केली आहे. जे पोलीस कर्मचारी नऊ साडेनऊनंतर कर्तव्यावर हजर होत होते. तेच कर्मचारी सकाळी आठच्या आतच्या कामावर हजर होत आहेत तर घरी जाण्याचा टाईमच राहिलेला नाही. पुणेकरांचा सोमवार असो की रविवार, कामाचा दिवस असो की सुट्टीचा. दे धडक – बेधडक वाहतुक पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिथं जाईल तिथं पाच सहा वाहतुक पोलीसांची टोळकी सिग्नल किंवा त्याच्या अलिकडे – पलिकडे थांबवुन, हेल्मेटच्या दंडाच्या ऑनलाईन पावत्या करीत आहेत. २० टक्के दंड शासनात व ८० टक्के दंड शासनातीत असेच काहीसे दंडाचे परिणाम नियमित दिसत आहेत. एकीकडे पुणेकरांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देवून हेल्मेटची सक्ती नियम-बरहुकूम करीत आहेत. परंतु त्याच शासनाने राज्यात गुटखा बंदी व मटका जुगार बंदी केली आहे. राजरोसपणे कुठेही आणि केंव्हाही गुटखा सहज मिळत आहे. तर मटका व जुगार अड्डे तर पोलीस ठाण्याच्या पाठीमागे, पुढे खालच्या बाजूला बिनदिक्कत सुरू आहेत. मग तिथे कारवाई करण्यात पुणे शहर पोलीस कसुरी नेमकी का करीत आहेत. गुटखा व मटका जुगार अड्डे पुणेकरांचे आरोग्य व कुटूंब उध्वस्त करीत नाहीयेत काय असा सवाल नागरीकांकडून विचारला जात आहे.

                थोडक्यात जनतेच्या खिशावर,- राज्यकर्त्यांच्या साक्षीने, – शासनातील लोकसेवक दरोडा घालत आहेत असाच यातून सुर बाहेर येत आहे. गुटखा हा तंबाखुजन्य पदार्थ, नागरीक स्वतः खिशात हात घालुन स्वतःच्या पैशाने विष खरेदी करतात. तसेच नागरीक स्वतःचे नशिब आजमाविण्यासाठी ठायी-ठायी असलेल्या जुगार अड्डयांवर जावुन स्वतःच्या पैशाने आकड्यांचा खेळ खेळतात.

                थोडक्यात नागरीक स्वतःच मटका जुगार अड्डे व गुटखा स्वतःच्या पैशाने घेतात. परंतु हेल्मेट वा रस्त्यावरील वाहतुक दंड हा मात्र नागरीक स्वतः देत नाहीत. त्यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेचे कारण देवून जबरीने खिशावर दरोडा घातला जात आहे. ज्या हेल्मेटचा बाऊ केला जातोय, तेच बाजारात मिळणारे हेल्मेट हे निम्न दर्जाचे आहेत. म्हणजे ३० टक्के हेल्मेट वापरण्यास योग्य आहेत तर ७० टक्के हेल्मेट हे कुचकामी आहेत. म्हणजे हेल्मेट दाखवा आणि कारवाई टाळा असाच हा प्रकार म्हणावा लागेल. पण डिसेंबर २०१८ पासून आजपर्यंत जबरी वसूली सुरू आहे त्याचे काय… खरं तर हेल्मेट हा आजचा विषयच नसला तरी जबरी व लंगड्या कारवाईचा पोलखोल होणे आवश्यक आहे.

पुणेकर दिवसाला करतात ५ कोटीचा गुटखा फस्त –

                राज्य शासनाने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदीचा कायदा केला आहे. ज्याच्यावर बंदी आहे, ते कुठेजरी आढळले तरी त्याच्यावर कारवाई होणे हा नियमांचा भाग आहे. परंतु पुणे शहरासह पिंपरी चिचंववड, पुणे ग्रामीण सह राज्यात बिनदिक्कतपणे गुटख्याची विक्री केली जात आहे. पुणे शहर व परिसरातील एकुण पान टपर्‍यांची गणना केली व गुटखा विक्रीचा उच्चांक पाहिला तर पुणेकर दिवसाला सरासरी पाच कोटी रुपयांचा गुटखा फस्त करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याबाबत मागील अंकात वृत्त प्रसारित करण्यात आले असले तरी शहर पोलीसांकडून गुटखा विक्रीकरणार्‍यांवर कारवाईचा कुठेही लवलेशही दिसत नाही. सध्या पुण्यातील पोलीसांना उठता-बसता, अगदी झोपेतही हेल्मेट दिसत आहेत.

                पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्थ असलेले मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत कमालीचा गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुणे व पिंपरी चिंचवड मधील अनके होलसेल व किरकोळ विक्रेते येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे दर दिवशी अर्ध्या लाखाच्या आसपास नागरीक येथे येत असावेत असा अंदाज आहे. त्यातील निम्मे लोक गुटख्याचे शौकिन आहेत.

                आज मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे शंभर ते १२८ पानाच्या टपर्‍या असून, प्रत्येक पाने टपरीत गुटखा हा मिळतोच. एक पानाची टपरीवाला दर दिवशी सुमारे २० ते ३० हजार रुपयांचा गुटखा विक्री करतो. तर ५ ते ६ मोठ्ठे होलसेल डिलर व स्टॉकिस्ट आहेत. या गुटख्याची वाहतुक करण्यासाठी सुमारे ३० ते ५५ वेगवेगळी मालवाहतुक करणारी वाहने आहेत. वरच्या बाजूला तकरी, भुसार माल ठेवायचा आणि खाली गुटखा ठेवायचा असा तो प्रकार आहे. २५ टक्के पुणे शहराला १० ते १५ दिवस पुरेल एवढा गुटखा आज मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे समजते. त्यामुळे किती मोठा स्टॉक आहे याचा अंदाज येतो.

मटका व जुगार अड्ड्यांचे बेनाम शहेनशाह-

                मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत आजघडीस मटका व जुगाराचे १३ ते १५ अड्डे कार्यरत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजार पेठेतील भुसार बाजारातील, तरकारी बाजारातील बसस्टॉप जवळ, शौचालयाजवळ, गणपती मंदिराजवळ, हॉटेल जवळ धंदे सुरू आहेत. तर स्नेहनगर, रूणवाल रायसोनी इमारती लगत शिवाय आंबेडकर नगर, आनंद नगर येथेही मोठ्ठे जुगार अड्डे चालविले जात असल्याची माहिती आहे. या धंद्याचे बेनाम शहेनशाह अच्छुभाई, ढावरेमामु, तोरडमल सारखी मंडळी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ  पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वावरत असतांना दिसतात. खरं तर मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची हीच खरी चल- अचल मिळकती आहेत. ते त्यांनी स्वतःच्या ताकदीने उभ्या केलेल्या आहेत. काही वहीवाटीच्या आहेत, तर काही स्वतःने उभ्या केलेल्या आहेत. काहीही असले तरी १२-१५ बे-कायदा आस्थापना बा-कायदा सुरू करणे तसे कठीणच. परंतु एवढं मोठ्ठ भगवान श्रीकृष्णाचे गाडीव धनुष्यबाण दुर्योधनाने पेलला आहे यात शंकाच नाही.

बे-कायदा मिळकतींवर पुणे शहर पोलीस आयुक्त बा-कायदा टाच आणणार काय

                पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीतील बे-कायदा चल-अचल मिळकतींचा ७/१२ आजपर्यंत आम्ही पुणेकरांपुढे सादर केला आहे. त्या त्या भागातील नागरीक व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना हे चांगलेच अवगत आहे. परंतु पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालय आणि पोलीस स्टेशनला मात्र हे माहितीचं नसतं. मटक्या सारखे जुगार अड्डे आणि गुटखा व अवैध कृत्यांचा ७/१२ प्रसारित झाल्यानंतर खाकी रंगाचे सोवळ नेसून बरीच मंडळी मी त्यातला नसल्याचा आव आणतात. प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांना धमकाविले देखील जाते. परंतु असो त्या बाबत अधिक न बोललेच बरे. परंतु नुतन पोलीस आयुक्त अशा प्रकारच्या बे-कायदा मिळकतींवर बा-कायदा टाच आणणार आहेत काय हा मोठ्ठाचं प्रश्‍न आहे.

गणेश वायकर म्हणजे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पालखीचे भोई –

                मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीतील बे-कायदा मिळतींचा ७/१२ प्रसारित झाला आहे. वरीष्ठ पोलीसांच्या मेहेरबानीने वरील मिळकती वहीवाटी खाली आहेत. परंतु वहीवाटीची देखभालीची जबाबदारी सध्या गणेश वायकर यांच्याकडे दिलेली आहे. ते ईमाने इतबारे बे-कायदा मिळकतींची देखभाल करीत आहेत. ते काहीच करीत नाहीत. सर्वच निर्णय वरीष्ठ घेतात व ठरवितात अस्सं त्यांच्या मित्रांचे मत आहे. त्यामुळे गणेश वायकर हे पोलीस कर्मचारी, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पालखीचे भोई  आहेत असा गोड व गोंडस समज करून घेऊयात.

बे-कायदा कृत्यांना संरक्षण आणि कायदा पाळणार्‍यांना जबरी रट्टा,सज्जनांचे निर्दालन आणि दुर्जनांचे पालन –

                पुणेकर नागरीक हे शिस्तप्रिय आहेत यात शंकाच नाही. दोन पाच टक्के नागरीकांनी हुल्लडबाजी केली म्हणजे संपूर्ण पुणेकर कायदा पाळत नाहीत असं समिकरण मांडणे किंवा समज करून घेणे चुकीचे आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचारी विनाकारण स्वतःच्या पदाचा दुरूपयोग करून, सर्वसामान्यांना छळण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील सहा. निरीक्षक मनोज शामराव भोसल व तहहयात पोलीस पिंजरा गाडीचे गाडीवान अमोल दबडे हे दोन पोलीस कर्मचारी दिवस-रात्र मार्केटयार्ड परिसरात वाटमारी करीत असतात हे या भागातील सर्वांनाच ज्ञात आहे. शासनाने दिलेल्या पदाचा कस्सा उपयोग करायचा हे कुणीतरी ह्यांच्याकडून शिकूण घेण्यासारखे आहे.

                दिवस-रात्र वाटमारी करणे आणि जाब विचारणार्‍यांना विनाकारण जबरी मारहाण करण्यात ह्यांचा कुणीही हात धरत नाही. वरीष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अच-अचल बे-कायदा मिळकतींचे संरक्षण हे दोन लोकसेवक मोठ्या शिताफीनेच करतात.  परंतु याच भागातील बहुजन समाज पार्टीचे युवा कार्यकर्ते रिजवान अली मोहम्मद रफिक शेख या कार्यकर्त्याला डिसेंबर २०१७ मध्ये जबरी मारहाण केली होती. याबाबत अनेक तक्रारींचा पाढा वाचला परंतु कार्यवाही शून्यच राहिली आहे. रिजवान शेख सारखे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना जबरी मारहाण करून त्यांच्यावर दहशत बसविण्याचे काम मनोज भोसले व अमोल दबडे या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी केले आहे. पोलीस स्टेशनच्या मिळकतींच्या वहीवाटीसाठी सामान्यांना मारहाण हा कोणता पायंडा मार्केटयार्ड पोलीसांनी पाडला आहे हे समजत नाहीये. अधिक विस्तार भयास्तव तुर्तास इतकेच.

पुढील अंकी – स्वारगेट/बिबवेवाडी पोलीस स्टेशन…. नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाणी आहेत की नागरीकांच्या छळ-छावण्या.