Saturday, April 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बक्षिसाऐवजी शिक्षा -‘चांद्रयान २’ साठी झटणार्या इस्त्रोतील शास्त्रज्ञांचा पगार सरकारने कापला

मुंबई/दि/

        एकीकडे इस्त्रोचे शास्त्रज्ञ महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चांद्रयान २’ च्या उड्डाणाची तयारी करत आहेत. या मोहिमेतून देशाचे नाव जगाच्या नकाशावर आणि अंतराळावर कोरण्याचा प्रयत्न इस्त्रोचे वैज्ञानिक अन् इंजिनिअर्स करत आहेत. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने इस्त्रोतील शास्त्रज्ञांच्या पगारात कपात केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने १२ जून २०१९ रोजी एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार १९९६ पासून मिळणार्या दोन अतिरिक्त वेतनवाढ म्हणजेच देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

       देशाच्या अंतराळ जडणघडणमध्ये इस्त्रोचा सिंहाचा वाटा आहे. अग्नि क्षेपणास्त्र असेल, चांद्रयान मोहीम असेल किंवा चांद्रयान २ च्या लॉंचिंगची तयार असेल. इस्त्रोचे शास्त्रज्ञ दिवस-रात्र एक करुन देशाचे नाव जगात रोशन करत आहेत. देशाची अंतराळ ताकद वाढवत आहेत. मात्र, याच इस्त्रोमधील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कारण, सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार या शास्त्रज्ञांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येणार आहे.

       १ जुलै २०१९ पासून हा भत्ता बंद करण्यात आला आहे. या आदेशानंतर डी, ई, एफ आणि जी श्रेणीतील शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संना हा भत्ता मिळणार नाही. इस्त्रोमध्ये जवळपास १६ हजार शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्स आहेत. त्यामुळे या आदेशानंतर जवळपास ८५ ते ९० टक्के शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्संच्या पगारात दरमहा ८ ते १० हजारांची कपात होईल. सरकारच्या या आदेशामुळे इस्त्रोतील शास्त्रज्ञ नाराज असल्याचे बोलले जाते.