Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

१२ वर्षांआतील मुलींवरील बलात्कार प्रकरणात मृत्युदंड

law and order

नवी दिल्ली/दि/  देशातील १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणात मृत्युदंडापर्यंतची शिक्षा असलेल्या आणि १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद असणार्‍या विधेयकाला सोमवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली.

                फौजदारी कायदा (दुरुस्ती) विधेयक, २०१८ लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान उत्तर देताना गृहराज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, मागील काही दिवसात देशात बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्याने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर आणि १६ वर्षांच्या आतील मुलींवरील अत्याचार प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

                रिजिजू म्हणाले की, देशात लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना सरकार गप्प बसू शकत नाही. सरकारची प्राथमिकता असेल की, प्रत्येक प्रकरणात न्याय व्हावा. त्यांनी सांगितले की, या विधेयकात १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार प्रकरणातील किमान शिक्षा ७ वर्षांहून वाढवून १० वर्षे केली आहे. तर ही शिक्षा वाढवून आजीवन कारावासापर्यंतही होऊ शकते. प्रसंगी मृत्युदंडही ठोठावला जाऊ शकतो. १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा २० वर्षांपेक्षा कमी असणार नाही. ही शिक्षा वाढवून आजीवन कारावासापर्यंत होऊ शकते.

                बलात्काराची प्रकरणे सहा महिन्यांच्या आत निकाली काढावे लागतील. तपासात हलगर्जीपणा करणार्या पोलीस अधिकार्यांवर कारवाईची यात तरतूद आहे. तसेच १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील अत्याचार प्रकरणात आता आरोपीला जामीन मिळू शकणार नाही.

                पीडितेला तपासात होणारा त्रास पाहता अशी तरतूद करण्यात आली आहे की, कोणताही वकील पीडितेच्या चारित्र्याबाबत प्रश्‍न करणार नाही. असा प्रयत्न राहील की, प्रकरणाची सुनावणी महिला न्यायाधीशांसमोर होईल, असेही रिजिजू म्हणाले.