Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मराठ्यांना आरक्षण कधी मिळणार…,राज्य सेवा पूर्व परीक्षा कधी होणार….एमपीएससी अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलली,

पुणे/दि/ प्रतिनिधी/
मराठा आरक्षण आणि मराठा नेत्यांच्या दबावामुळं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० पुढे अनिश्‍चित काळासाठी ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले. दरम्यान पूर्व परीक्षा पुढे ढकलु नये असे आग्रही मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि बहुजन विकास विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेले असतांना देखील परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि विविध घटकांशी केलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंपदा जयंत पाटील, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका वर्ग बंद आहेत. या परिस्थितीचा तसेच विविध घटकांकडून, विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचनांचा सारासार विचार करून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वीही दोन वेळेस ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि काही उमेदवार कोरोनाग्रस्त असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचा सुधारित कार्यक्रम राज्य लोकसेवा आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या नारायणपेठ शनिवार पेठेतील उमेदवारांनी नमूद केले की, राज्याची लोकसंख्या ११ कोटी आहे. मराठा समाजाची लोकसंख्या १६ टक्के आहे. एकदीड कोटी लोकांसाठी संपूर्ण ११ ते १२ जनतेला वेठीस धरणार आहात काय… लोकप्रशासन हा विषय शिकत असतांना अशा प्रकारचे मुद्दे यापूर्वी कधी आमच्या वाचनात आले नाहीत. आम्ही कितीकाळ पुण्यात थांबायचे… जागेचे भाडे, खाणे-पिणे- राहणे इतकेही सोप्पे नाही. राज्य शासनाने आपल्या मतांवर ठाम राहून परीक्षा घेणेच योग्य असल्याचे मत काही उमेदवारांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे की नाही, हे काहीच माहित नाही. आमचे बरेच मित्र मराठा आहेत, त्यांनी देखील या निर्णयाला विरोध केला असल्याचे त्यांनी सांगितले.