Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या सोंगाड्यांना कार्यमुक्त केले जाणार आहे? नुतन अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण सोंगाड्यांना साथ देणार की लाथ देणार?

pwd pune

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सोंगाड्यांचा कट्टा झाला आहे. अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून मागील १५ वर्षांपासून वर्ग ३ मधील कर्मचार्‍यांचे पाच पाच वेळा बदली आदेश येवून देखील जुनं कार्यालय सोडून नवीन कार्यालयात संसार करायला तयार नाहीत. काही ना काही बहाणा करून बदली टाळण्याच्या त्यांच्या कहाण्या ऐकल्या तर दादा कोंडकेंची आठवण झालीच म्हणून समजा. शासकीय मध्यवर्ती इमारतीतील सा.बां. पुणे विभागातून पूर्व विभागात, दक्षिण विभागात बदली झाल्यानंतर, माझ्या पोटात दुखतय, मला डायबेटीस आहे, सध्या निवडणूक कामे आहेत, परिक्षेसाठी नियुक्त केले आहे, सध्या कोरोना आहे, अशी सबब सांगुन बदली टाळली जाते. परंतु ह्या बदल्या मुळातच एकाच आवारात करण्यात आलेल्या आहेत, जिल्हास्तर किंवा तालुका स्तरावर बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. परंतु शिमग्याला जशी सांग आणतात तशी सोंग आज पुण्याच्या सा.बां. विभागात पहायला मिळत आहेत.


शासनाने जुलै, ऑगस्ट महिन्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या बदलीचे आदेश काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पुण्यातील शासकीय कार्यालयात देखील बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु पुण्याच्या सा. बां. बांधकाम खात्यात मात्र बदली आदेश आला की, धडधाकट माणूस देखील पोटात दुखतयऽऽ म्हणून गयावया करून, आपली सोंग दाखवायला सुरूवात करतात. थोडक्यात लहान मुलं शाळेत जायचं म्हटलं की, जशी नाटकं करतात, हट्ट करतात, लाडीगुटी करतात, रडतात, फुगतात, अग्गदी तश्शीच ही नाटक करीत आहेत. पुण्याच्या सा.बां. विभागात तर एका महाभागाने तर चक्क मला डायबेटीस आहे, तसेच माझी जिथं बदली केली आहे, तिथं जर मला कोरोना झाला तर मग काय होईल… त्यामुळे माझ्या बदली आदेशाला मुदतवाढ देवून मला सध्या आहे त्याच कार्यालयात ठेवा अशी विनवनी केली आहे. आत्ता… बघ्घा… शासनाच्या बहुतांश खात्यातील १०० पैकी ७० टक्के अधिकारी कर्मचार्‍यांना डायबेटीस आहे. शुगर आहे. त्यात नवीन अस्सं काहीच नाही. नवीन कार्यालयात गेल्यानंतर कोरोना होईल हे आधिच ह्यांना कस्सं समजलं आहे, आणि आता जे कार्यालयात काम करीत आहेत, त्यांना बरं कोरोना झाला नाही, मग ह्याच कर्मचार्‍याला कोरोना होईल हे ह्यांना समजलं तरी कसं…


खरं तर ऑडीट, टेंडर,एसएससी, सारखी खाण्याची टेबल सोडून दुसर्‍या कार्यालयात कुणाला जायलाच नको आहे. त्यामुळे सोकावलेले कर्मचारी प्रत्येक बदलीवेळी सोंग आणत आहेत. तसंही पाहीलं तर पुण्याच्या सा.बां. बांधकाम विभागात पीएसडीचा घोळ सुरू आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात एका ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. परंतु लेखा शाखा, ऑडीट, टेंडर या विभागाला पीएसडी खरी आहे की, खोटी, एकच ठेकेदार पाच पन्नास टेंडर भरून, तेवढ्या कोटी रुपयांच्या पीएसडी भरत आहे …. तसेच २० टक्के ३० टक्के बिलो दराने भरत आहे, त्यामुळे ह्या पीएसडी खर्‍या आहेत की नाहीत याची जबाबदारी ही मुळातच ऑडीट आणि लेखा शाखेची आहे. परंतु त्यांना माहिती असतांना देखील शासनाची फसवणूक होत आहे हे माहिती असतांना देखील मागील तीन वर्षांपासून पुण्याच्या सा.बां. विभागात भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे.
पुण्याच्या सा.बां. विभागातील बनावट पीएसडी आणि ठेकेदारांची साखळी हा विषय मोठा आहे तो नंतर पाहू परंतु सध्या बदलीचा विषय असल्याने, याबाबत पुण्याचे नुतन अधीक्षक अभियंता श्री. अतुल चव्हाण हे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.