Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

तारिक अन्वर यांचे पवारांविरोधात बंड खासदारकीसह राष्ट्रवादी पक्षाचाही राजीनामा

मुंबई/दि/

                 सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावरून २० वर्षांपूर्वी शरद पवार यांच्यासोबत कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणारे तारिक अन्वर यांनी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातच बंड केले आहे. राफेल विमान करारासंदर्भात पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत अन्वर यांनी खासदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. अन्वर यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. राफेल कराराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे. या करारात घोटाळा असून त्यास मोदीच जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

                शरद पवार यांनी या संदर्भात व्यक्तव्य करताना मोदींच्या हेतूबद्दल शंका घेतली जाऊ शकत नाही, असे म्हटले होते. अर्थात, राष्ट्रवादी कॉंग्रेसने नंतर हे वक्तव्य फेटाळले. पवार असे बोललेच नव्हते. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले होते. मात्र, याच वक्तव्याचा आधार घेत अन्वर यांनी राजीनामा दिला आहे.

                खा. तारिक अन्वर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते असून त्यांनी पवारांचे विधान चुकीच्या पध्दतीने घेऊन राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची घेतलेली भूमिका बेजबाबदारपणाची आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, असा टोलाही पटेल यांनी लगावला.

                तसेच अन्वर यांनी पवारांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी एकदा शरद पवारांना फोन करून विचारायला हवे होते. आम्हाला याची कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तारिक अन्वर यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न करू, लोकसभेच्या खासदारकीचा प्रश्न अध्यक्षांच्या अखत्यारित येतो.

                 राजीनामा पवारांकडे सोपविला असता विचार केला असता, असेही ते म्हणाले. फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. त्यात पवारांनी मोदींना दिलेल्या क्लीन चिटवर मी असहमत आहे. मी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे. शरद पवार यांचा व्यक्तिगतरीत्या मी सन्मान करतो. परंतु त्यांचे हे विधान दुर्दैवी आहे. या विधानाने मला अतीव दुःख झाल्याने मी हे पाऊल उचलले आहे, असे तारिक अन्वर यांनी स्पष्ट केले आहे.