
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
समलैंगिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या डेटिंग ॲपचा गैरवापर करत तरुणांना जाळ्यात ओढून लूटमार करणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, ॲपवर ओळख वाढवून एकट्या ठिकाणी बोलावणे, धमकावणे, मारहाण करणे आणि एटीएममधून पैसे काढणे असा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आणला आहे. डेटींग ॲपवरुन संपर्क करुन त्यास डेटिंग करीता रात्री मोकळ्या मैदानामध्ये बोलावुन सदर ठिकाणी लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन त्याचे मोबाईल फोन, सोन्याचे चैन, अंगठी, एटीएम वरुन पैसे काढुन घेतल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण व सुहास मोरे यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे पाहिजे आरोपी नामे राहिल शेख यांच्या घराचे जवळ ए.जे कंपनी जवळ, डी मार्टचे पुढे, सोमजी, कोंढवा बु. पुणे येथुन आरोपी नामे 1) रोहील अकिल शेख, वय 19 वर्षे, रा. ए.जे कंपनीचे समोर भाड्याने रुममध्ये सोमजी कोंढवा बु. पुणे 2) नुहान नईम शेख वय 18 वर्षे रा. प्लॅट नं 202, इसाक टॉवर, गल्ली नं 02 लक्ष्मीनगर, कोंढवा बु.पुणे 3) शाहिद शाहनुर मोमीन वय 25 वर्षे, रा. बालाजी बिल्डींग, दुसरा मजला, संतोष नगर गल्ली नं.03 कात्रज पुणे व 4) ईशान निसार शेख वय 25 वर्षे रा. मातोश्री विल्डींग, लेन नं. 01 अंजलीनगर, कात्रज पुणे 5) वाहीद दस्तगीर शेख, वय 18 वर्षे, धंदा फॅब्रीकेशन, रा विस्मील्ला मस्जिदचे जवळ, स.नं.42 कोंढवा खुर्द, पुणे यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वाघोली परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. पीडित तरुण खासगी कंपनीत काम करत होता.
नेमकं घडलं काय?
11 जानेवारीच्या सायंकाळी पीडित तरुण बसने स्वारगेटकडे जात असताना डेटिंग ॲपवरून ‘राहिल’ नावाच्या व्यक्तीचा मेसेज आला. ओळख वाढल्यानंतर व्हॉट्सॲपवर संभाषण झाले आणि भेटीचा बहाणा करून त्याला कोंढवा परिसरात बोलावण्यात आले. प्रत्यक्ष भेटीनंतर आरोपींनी घर दाखवण्याच्या नावाखाली त्याला निर्जन ठिकाणी नेले. तेथे आधीच उपस्थित असलेल्या साथीदारांच्या मदतीने पीडिताला कोयत्याचा धाक दाखवण्यात आला.
या मारहाणीत पीडिताकडील सोन्याची चैन, अंगठ्या, रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेण्यात आले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी एटीएमचा पिन नंबर विचारून खात्यातील पैसेही काढून घेतले. जीवाला धोका असल्याने पीडिताने तात्काळ विरोध करू शकले नाही
सामाजिक बदनामीची भीती आणि कुटुंबीयांवरील ताण यामुळे सुरुवातीला पीडिताने तक्रार नोंदवली नव्हती. मात्र, धैर्य एकवटून 20 जानेवारीला त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल क्रमांक आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. मुख्य आरोपीच्या घराजवळून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
तपासात समोर आले की ही टोळी यापूर्वीही अशाच प्रकारे दोन जणांना लुटून फरार झाली होती. समाजातील भीतीचा फायदा घेत लोक तक्रार करणार नाहीत, याचाच गैरफायदा आरोपी घेत होते. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये आरोपीतांनकडुन गुन्हातील जबरदस्तीने चोरीचे 03 मोबाईल फोन, लोखंडी कोयता व आरोपींनी गुन्हयात वापरलेल्या 2 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आरोपींपैकी एकावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, सपोआ वानवडी विभाग श्री. कुमार घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नवनाथ जगताप, पोलीस निरिक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरिक्षक श्री रविंद्र गावडे व पोलीस अंमलदार निलेश देसाई, गोरखनाथ चिनके पुष्पेंद्र चव्हाण, रशिद शेख, सुहास मोर, अमित सुर्यवंशी, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, रियाज पटेल, केशव हिरवे, शाहिद राजपुत, प्रशांत खाडे, राहुल शेलार यांनी केली.
