
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या मागील 10 ते 12 वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक आरोग्य निरीक्षक स्वतःला त्या त्या भागाचा मालक किंवा सरसेनापती म्हणवून घेवू लागले होते. व्यावसायिक आणि आरोग्य निरीक्षकांचे एवढे सूत जुळले आहे की, प्रत्येक आरोग्य निरीक्षक म्हणेल ती पूर्वदिशा ठरू लागली होती. या अहंकारामुळे पुणे शहरात कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान अरोग्य निरीक्षकांच्या बदल्यांबाबत नॅशनल फोरम वृत्तपत्रासह रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्र यांनी तक्रार केल्यानंतर पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात बदल्यांचे कागद फिरू लागले. उदया 31 जुलै रोजी पुणे महापालिकेच्या जुन्या जी.बी. हॉलमध्ये समुपदेशनाने बदल्या करण्याचे फर्मान अतिरिक्त आयुक्तांच्या साक्षीने सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त प्रसाद काटकर यांनी जारी केले आहे. यात एकुण 53 अरोग्य निरीक्षक व 6 वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांचा समावेश आहे.
बदल्याची महानौटंकी-
महाराष्ट्र बदलीचा अधिनियम 2005 नुसार प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली दर तीन वर्षांनी करणे आवश्यक आहे. तसेच दोन पदावधी किंवा पाच वर्षांनी त्यांच्या खाते व विभागात बदल करणे कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील कार्यरत असलेले वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) यांच्या मागील 10 ते 12 वर्षांपासून बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. आता अनेकदा ओरड झाल्यानंतर बदल्यांची नौटंकी सुरू आहे. तथापि समुपदेशनाने बदल्या झाल्या तरी संबंधित आरोग्य निरीक्षक यांचे प्रत्येक विभागात हप्ते ठरलेले आहेत. तसेच सोसायट्या, कचरा प्लँटसह हॉटेल, दुकानदार, व्यापाऱ्यांबरोबर त्यांचे खाजगी उद्योग सुरू आहेत. त्यामुळे बदलीनंतर एक किंवा दोन महिन्यांची मेडिकल व इतर रजा टाकुन, त्यानंतर संबंधित बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन, पुन्हा दहा ते पंधरा दिवसांनी, किंवा फार फार तर एक महिन्यानंतर ते त्यांच्या मूळच्या खात्यात पुनःपदस्थापित होतात.मुळ ठिकाणी रिव्हर्ट होतात.
याबाबत एक उत्तर उदाहरण देता येईल की, एक आरोग्य निरीक्षक एका कार्यालयात मुळ नियुक्तीपासून म्हणजे 2011 ते 2023 एकाच क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत होता. त्यानंतर त्याची बदली तक्रार आल्यानंतर करण्यात आली. संबंधित आरोग्य निरीक्षकाने दोन महिन्यांची रजा घेऊन त्यानंतर बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. रुजू झाल्यानंतर पंधरा दिवस बदलीच्या ठिकाणी काम केले. त्यानंतर पुन्हा ते त्यांच्या मूळच्या क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत झाले. म्हणजे 2011 ते 2025 असे एकूण 14 वर्ष ते एकाच क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत. ही घनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षकांची पारंपरिक सवय आहे. त्यामुळे बदली ही एक नौटंकी आहे. समुपदेशनाने बदली करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. थेट बदल्यांचे आदेश काढणे हेच घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी आवश्यक होते. तथापि नियमांच्या आडूनही बदल्यांचा सोपस्कार उरकण्यात येत असला, तरी ही निव्वळ बदलांची नौटंकी ठरवू नये.

पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त जनरल यांना मुळा-मुठेच्या संगमाचे पवित्र तीर्थ पाजण्याचा महाउत्सव-
पुणे महानगरपालिकेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर व सीनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्या समुपदेशनाने बदल्यांचा कार्यक्रम उद्या दि. 31 जुलै 2025 रोजी संपन्न होत आहे. तथापि या बदल्यानंतर ज्या आरोग्य निरीक्षकांना त्यांच्या मूळच्या क्षेत्रीय कार्यालयात पुन्हा कार्यरत व्हायचे असल्यास, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, त्यांची योग्य प्रकारे सेवा करून, पुन्हा बदली झालेल्या आरोग्य निरीक्षकांना त्यांच्या मूळच्या क्षेत्रिय कार्यालयात पदस्थापना दिली जाते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आरोग्य निरीक्षक या पदाचेच कर्मचारी असे करतात असे नव्हे तर, पुणे महानगरपालिकेच्या बहुतांश खात्यातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या आवडीच्या म्हणजे मलाईदार खात्यामध्ये पदस्थापना करून घेण्यासाठी ते वाटेल ती किंमत मोजत असतात.
अतिरिक्त आयुक्त जनरल यांना पुणे महानगरपालिकेतील ह्या बदल्यांच्या आटापाट्या किंवा ह्या खोडसाळ बाबी अद्याप पर्यंत माहिती नाहीत. ते नियमानुसारच बदली करीत आहेत. तथापि त्यांच्या पश्चात पुन्हा संबंधित आरोग्य निरीक्षक बदलीनंतरही मूळ खात्यात कार्यरत असल्याचे दिसून येईल यात शंकाच नाही. थोडक्यात उद्या 31 जुलै रोजी बदलीचा कार्यक्रम संपन्न होत असला, तरी अतिरिक्त आयुक्त जनरल यांना मुळा-मुठेच्या संगमाचे तीर्थ पाजण्यात सामान्य प्रशासन विभाग पुन्हा यशस्वी ठरणार आहे यात वादच नाही.
बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या यादीत हेराफेरी-
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे ज्या आरोग्य निरीक्षकांची बदली मागील एक वर्षात,6 महिन्यात, 3 महिन्यात किंवा 2 महिन्यात झाली आहे ते पुन्हा त्यांच्या मूळच्या क्षेत्रीय कार्यालयात पुन्हा कार्यरत झालेले आहेत. बदली होऊन एक महिना, दोन महिना, चार महिना, त्यांनी (बदलीस अधीन राहून) दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात काम करून आल्यानंतर, पुन्हा मूळच्या क्षेत्रीय कार्यालयात आल्यानंतर त्यांची पदस्थापना तीन वर्षापेक्षा कमी दिसून येत आहे. त्यामुळे एक महिना, दोन महिने, चार महिने बदली होऊन पुन्हा मूळच्या क्षेत्रीय कार्यालयात आलेल्या बहाद्दर आरोग्य निरीक्षकांची नावे या यादीत नाहीत.
खरं तर हा आर्थिक किंवा अर्थशास्त्राचा भाग आहे. ते अर्थशास्त्र सामान्य प्रशासन विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्याशी निगडित आहे. त्यांच्या अर्थशास्त्राशी नवनियुक्त अतिरिक्त महापालिका आयुक्त जनरल यांचा सध्यातरी कुठेही संबंध आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने अतिरिक्त आयुक्तांना मुळा-मुठेच्या संगमाचे पवित्र तीर्थ पाजण्याचा चंग बांधला आहे, खरी वस्तुस्थिती अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांच्या बदल्यांची ही नौटंकी आहे यात शंकाच नाही. बदल्या व बदल्यानंतरची पदस्थापना याकडे आमचे लक्ष आहेच. डीएमसी आणि सीएसआय यांच्याकडेही तेवढेच लक्ष आहे. तुर्तास…