Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

‘एफडीए’ची पुण्यात मोठी कारवाई; ४७ लाखांचा खाद्यान्न साठा जप्त

पुणे/दि/ दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) खाद्यान्न तपासणी मोहीम सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातून खाद्यतेल, तूप, मिठाई, रवा, मैदा अशा विविध पदार्थांचे ९५ नमुने तपासणीसाठी घेतले असून, भेसळीच्या संशयावरून तूप, खाद्यतेल आणि इतर अन्नाचा ४७ लाख ५९ हजार रुपये किमतीचा तेरा टनाहून अधिक माल जप्त केला आहे.
दसरा आणि दिवाळी सणासाठी विविध खाद्य पदार्थांची मोठ्याप्रमाणावर खरेदी केली जाते. मागणी वाढल्याने या काळात कमी दजार्चे अथवा भेसळयुक्त खाद्यान्न येण्याची शक्यता अधिक असते. यापूर्वी एफडीएने परराज्यातून आलेली कमी दर्जाची गुजरात बर्फीचे साठे जप्त केले आहेत. ग्राहकांना सकस आणि भेसळमुक्त खाद्य पदार्थ मिळावेत या साठी एफडीएने जिल्ह्यात खाद्यान्न तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
खाद्यतेलाचे २१, तूप ५, नमकीन, रवा आणि मैद्याचे प्रत्येकी २, मिठाई १९ आणि इतर खाद्यान्नाचे ४४ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.