Saturday, November 16 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच कार्यालय म्हणजे दुसरी जनता वसाहत

pmc

जनावरांचा कोंडवाडा कोंढव्यात तर नागरीक, अधिकारी- कर्मचारी, डॉक्टर, नर्स चा कोंडवाडा पुणे महापालिकेत….

पुणे/दि/ प्रतिनिधी/
बडा घर आणि पोकळं वासा म्हणजे नेमकं काय असतं, याच उत्तम उदाहरण म्हणजे पुणे महापालिकेतील आरोग्य विभागाचं कार्यालय. मार्च २०२० ते सप्टेंबर पर्यंत पुणे शहरात कोरोना महामारीचा उद्रेक सुरू आहे. संपूर्ण देशात कोरोना महामारीने पुण्याला नंबर वन केलय. सोशल डिस्टनिंग पाळा अस्सं आरोग्य विभागच आरडून ओरडून सांगतय. पण खुद्द पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातच सोशलडिस्टनिंगचा पुर्ता फज्जा उडाला आहे. हे आजच नाही तर वर्षानुवर्षे आरोग्य विभागाच्या कार्यालयात हाच प्रकार सुरू आहे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बसायला आणि दप्तर ठेवायला जागा नाही. त्यातच नागरीकांचा सातत्याने संपर्क असल्याने नागरीकांना व्हारांड्यात थांबावे लागते. आता तर ज्या डॉक्टरांची बाहेरून सेवा घेतली आहे, त्यांना आणि परिचारिकांना देखील कार्यालयात दाटीवाटीने थांबावे लागत आहे.
कोरोना महामारीवर पुणे महापालिका आरोग्य विभागाने कोणती उपाययोजना केली, महापालिका आयुक्त कार्यालयाने याबाबत काढण्यात आलेले आदेश याबाबतची माहिती घेण्यासाठी आज पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात जाणं झालं. मुख्य इमारतीतील तिसर्‍या मजल्यावरून डावीकडून वडकेपर्यंत संपूर्ण एल टाईप विभाग आरोग्य विभागासाठी देण्यात आला आहे. परंतु प्रत्येक कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी टेबलाला टेबल लावून आणि त्यातच कार्यालयीन फाईल आणि मोठं दप्तर सांभाळत त्यांचा कारभार सुरू आहे. इतकी दाटीवाटी की, वन रूम किचन सारखी अवस्था एका-एका कक्ष कार्यालयाची झाली आहे.
मेडिकल युनिट या विभागात डॉक्टर, परिचारिका, आया यांची भरती, बदली बाबतची कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या विभागात डॉक्टर आणि परिचारिका तसेच आया व वॉर्ड बॉय अगदी भेदरल्या सारखे थांबलेले असतात. थोडक्यात एखादा नवा रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक आयसीयू मध्ये किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये आल्यानंतर जसे भेदरल्या सारखे होतात, जस्सं पोटात धस्स्… पोटात गोळा आल्या सारखे होते अगदी, बाहेरून सेवा घेतलेल्या नवीन डॉक्टर, परिचारिका यांचे होत आहे. थोडक्यात पुणे महापालिकेतील मेडीकल युनिट म्हणजे पुण्यातील पर्वती भागातील तळजाई झोपडपट्टीच म्हणावी लागेल. एखाद्या नवीन आलेल्या डॉक्टर किंवा परिचारिकेने हातातील कागद घेवून एखादी बाब विचारली असता, अधिकारी असो की कर्मचारी कुणालाच कोणत्या विभागाची माहिती नाही. त्यातच टेबल इतक्या जवळ जवळ आणि त्यातच दप्तराचा एवढा मोठा ढिगारा यामुळे अधिकारी आणि कर्मचारी देखील बोलतांना आणि ते काय बोलले आहेत हे देखील कळत नसल्याचे चित्र आज पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात पहायला मिळत आहे.
आज शुक्रवारी माहिती घेण्याच्या उद्देशाने बराच वेळ मेडिकल युनिट मध्ये बसून होतोच. याच ठिकाणी डॉक्टर आणि परिचारीकांचा जास्त राबता होता. त्यावेळी एक डॉक्टर युवती पांढर्‍या रंगाचा ऍप्रन परिधान करून, या विभागात हातातील कागद घेवून काहीतरी विचारीत होते. तिच्याबरोबर कदाचित तिचे बाबा देखील होते. बराच वेळ ही डॉक्टर युवती या टेबल वरून त्या टेबलवर आणि त्या टेबल वरून ह्या कक्षात जात होती. परंतु तिला कुणीच योग्य उत्तर देत असल्याचे दिसून आले नाही. शेवटी मी वडके हॉल समोरच्या कार्यालयात बसलो असतांना देखील ती युवती हातात कागद घेवून विचाराणा करीत होती. अधिकारी व कर्मचारी त्यांच्याच कामात इतके गुंतले होते की, मान वर करायला देखील त्यांना वेळ नाही.
कागदांच्या एवढ्या मोठ्या ढिगार्‍यावरून कोरोनाची इतकी सर्व कामे अपुर्‍या मनुष्यबळावरच आरोग्य विभागावर सोपविल्याचे दिसून आले. मी ना राहून त्या डॉक्टर युवतीला विचारले, बाळा मी बराच वेळ झालं पाहतोय, तु इकडुन तिकडे आणि तुकडून इकडे का जातीयस… नेमकं तुला कुणाला भेटावयाचे आहे, त्यावेळस तिच्या हंगामी नियुक्तीबाबतच आणि इतर बाबी सांगितल्या असता, त्या सर्व बाबी ह्या वडके समोरील कार्यालयातच होत्या. परंतु कर्मचार्‍यांपैकी कुणीही आणि काहीही सांगायला तयार नव्हते. मी ज्या फाईल्स चाळीत होतो, त्यातच तिच्याबाबतचे आदेशाची प्रत होती. इतक साधं काम पण कुणीही डॉक्टरला डॉक्टरां सारखे वागवायला तयार नाही.
पुणे शहरा सारख्या ठिकाणी डॉक्टरांची अशी अवस्था असेल तर नागरीकांची काय अवस्था होत असेल ते सांगायला नको. खरं तर हा दोष कर्मचार्‍यांचा नाही. थोडाबहुत आरोग्य अधिकार्‍यांचा असला तरी पुणे महापालिका आयुक्त कार्यालयाने आरोग्य विभागाला पुरेशा प्रमाणात कार्यालय देणे अपेक्षित आहे. त्यातच आरोग्य विभागाचं कार्यालय इतकं कोंदट आहे की बाहेरची हवा देखील आत यायला तयार नाही. अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी जिथं बसायला जागा नाही, लाकडी टेबल आणि मोडक्या खुर्चीवर त्यांना बसावे लागते. दप्तर ठेवायला जागा नाही, पुरेशा प्रमाणात खेळती हवा नाही. त्यातल्या त्यात, पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील व ज्यांची बाहेरून सेवा घेण्यात आली आहे, त्यातील डॉक्टर, परिचारिका, आया, वॉर्ड बॉय यांच्यासाठी वेटींग रूम तर सोडाच परंतु संबंधित कार्यालयात बसण्यासाठी जागा देखील नाही. एल टाईप जागा आता आरोग्य विभागाला पुरेशी नाही. त्यामुळे यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
त्यातल्या त्यात पशुवैधक विभाग आणि कत्तलखाना परवाने कार्यालय सध्या तिसर्‍या मजल्यावरून हलविले आहे म्हणून सुदैव नाहीतर, तिसर्‍या मजल्यावर थांबायला देखील जागा शिल्लक राहत नाही. आज कोरोना आहे म्हणून अशी अवस्था आहे असे मुळीच नाही. वर्षानुवर्षे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पुणे महापालिकेचा सासुरवास सहन करावा लागत आहे. विनामानधन तत्वावर काही डॉक्टारांच्या सेवा आपण अधिग्रहित केल्या आहेत. काही स्वयंसेवकांना देखील विनामानधन तत्वावर नियुक्त केले आहे, त्यांना चहा पाणी तर सोडाच परंतु साधी बसायला नव्हे नव्हे, थांबायला देखील जागा नसावी एवढे मोठे दुर्देव आहे. पुणे महापालिकेतील इतर विभाग व खात्यांना भले मोठे कक्ष आणि फर्निचर सुविधा आहेत, ज्यांना गरज नाही त्यांना देखील सुटसुटीत जागा पुरेशी खेळती हवा असलेली कार्यालये दिली आहेत, मग पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच आरोग्य पुणे महापालिकेनं नेमकं काय बिघडवलं हे काही कळायला मार्ग नाही. सगळीच नाही परंतु थोडीतर सुधारणा सध्या आवश्यक आहे.
पुणे महापालिकेतील सर्व नगरसेवक मंडळी पारंपारीकपणे टेंडर आणि ठेकेदार यांच्यात इतके गुंतून गेलेले असतात की, त्यांना पुणे महापालिकेत नेमकं काय चाललयं ह्याकडे लक्ष दयायला वेळच मिळत नाही. पुणे महापालिकेतर तर सध्या पुण्यातील जुन्या वाड्यांवर सर्वांचे लक्ष गेले आहे. जुने वाडे घेणे आणि नवीन इमारती बांधून विकणे, पुणे महापालिकेच्या मोकळ्या जागा, ऍमिनीटी स्पेसवर काही नगरसेवक मंडळींनी स्वतःचा बोर्ड लावून जागा ताब्यात घेतल्या आहेत. थोडक्यात नगरसेवकांना वेळ नाही. त्यामुळे हा प्रश्‍न जेबी किंवा स्टँडीगला येणे शक्यच नाही. (सत्य बोलल्यामुळे सर्वच दुखावतात पण आरोग्य विभागासाठी हे दोन शब्द आवश्यकच होते) त्यामुळे अधिकारी वर्गानेच मोठ्या नेटाने हा प्रश्‍न आता आयुक्तांसमोर मांडणे उचित होणार आहे. बाकी सर्व आयुक्तालयाच्या आज्ञापत्राप्रमाणे….