Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

स्वारगेट पोलीस ठाण्याचं सक्रीय संगनमत आणि सहभाग?

पोलीस कोठडीत क्रूर मारहाण करून, संशयावरून सामान्यांचा जीव घेणार्‍या स्वारगेट पोलीसांकडून दिवसाढवळ्या लुटमारी करणार्‍यांबरोबर सक्रीय संगनमतासह उत्स्फुर्त सहभाग

* दारायस इराणी, डी.वाय.पाटील, शामराव धुळूबुळू आता होणेच नाही….

Swargate-Police

पुणे/दि/ प्रतिनिधी/

            पुण्याच्या पूर्वेकडील प्रदेशातील पुरानी हवेली म्हणून स्वारगेट पोलीस स्टेशनचा बोलबाला होता. एका स्वारगेट स्टेशनमधुन आता आपणांस सहकारनगर, बिबवेवाडी, दत्तवाडी, भारती विदयापीठ अशी चार पाच पोलीस ठाणी उदयाला आली. परंतु तत्कालिन काळात ४०/४२ झोपडपट्ट्या, जनता वसाहत सारख्या आठ/दहा घनदाट लोकवस्तीची ठिकाणे, एकटे स्वारगेट   पोलीस ठाणे हाताळत होते. 

            झोपडपट्टी दादांची तर त्या काळात प्रचंड दहशत असायची. कात्रजच्या बोगद्यापासून ते स्वारगेटपर्यंत आणि स्वारगेट ते लष्कर-हडपसर, खडक उत्तरेकडून जनता वसाहत ते स्वारगेट, तिकडुन सिंहगड रोड ते स्वारगेट अशा संपूर्ण भागावर तीन/ चार पोलीस चौक्या आणि शे-दीडशे पोलीसांची कुमक होती. परंतु अशाही परिस्थितीत प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून, इथली दादागिरी आणि भाईगिरी मोडून काढली जात होती.

            आता पायलीची पंधरा पोलीस ठाणी निर्माण झालीत परंतु एकाही पोलीस ठाण्याला स्वतःच्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवता येत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. परंतु दस्तुरखुद्द स्वतः स्वारगेट पोलीस ठाण्याला देखील त्यांच्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवता येत नाहीये. त्यासाठी दारायस इराणी, डी.वाय. पाटील आणि शामराव धुळूबुळूंसारखे धुरंधर पोलीस प्रशासक असणेच आवश्यक असते. ते आता होणेच नाही.

            बलाढ्य भूप्रदेश आणि घनदाट लोकवस्तीच्या झोपडपट्या आणि सार्वजनिक ठिकाणांवरील भांडणं म्हणजे निव्वळ लाठ्या-काठ्या, दगडं,चाकु, सुर्‍या. सर्वत्र भितीचं वातावरण. परंतु अशाही परिस्थितीत पोलीसी नियंत्रण काय असते हे स्वारगेट पोलीस ठाण्याने आदर्श घालुन दिलेला आहे. परंतु मागील काही वर्षात स्वारगेट पोलीस ठाणे म्हणजे तोंडदेखलेपणा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा झालाय. पाठभिंतीला सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय आणि लाईन असतांना देखील कायदा आणि सुव्यवस्थेचे तेरा वाजविण्यात आले आहेत.

            स्वारगेट एस.टी. स्टँडवर त्या काळातही पाकीटमारी आणि लुटमारी होत होती. परंतु त्याची दखल घेण्याची पद्धत वेगळीच होती. दोन तासाच्या आतच गुन्हेगार पोलीस ठाण्यात बांधून आणला जायचा. त्या काळात स्वारगेट पोलीस ठाणे मार्केटयार्डात होते. आता हेच पोलीस ठाणे स्वारगेट एस.टी. स्टँडच्या समोर असतांना देखील पाकीटमार, लुटमार करणारे स्वारगेट पोलीसांना शोधूनही सापडत नाहीयेत. अन् ज्याची चोरी झालीय त्याची फिर्यादही लिहून घेतली जात नाही.

            चोरीमारी तर सोडाच परंतु त्या व्होल्गा चौकातील मटका आणि जुगाराचा अड्डा देखील बंद करू शकले नाहीत. व्होल्गा चौक काय अन् गिरीधर भवन काय… त्या संत नामदेव शाळा, इंदिरानगर खड्डा, सिटी इंटरनॅशनल महर्षिनगर आणि त्या डायसप्लॉटच्या कॅनॉलवरील देखील गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घालु शकले नाहीत. अस्सं सांगितलं जात की, वर नमूद केलेल्या ठिकाणंच्या साम्राज्यात स्वारगेट पोलीसांचा सक्रिय सहभाग व संगनमत आहे. त्यामुळे कुणी कितीही व काहीही केले तरी अवैध धंदे आणि गुन्हेगारी संपुष्टात येवूच शकत नाही.

            एकुण दाखल , एकुण निकाली, अपराध सिद्धी, कोर्ट खटले यांचे गुणोत्तरी प्रमाण निम्नस्तरावर आहे. कित्येकांची फिर्यादच घेतली जात नाही. आलेल्या तक्रार अर्जांवर कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे कागदी घोडेही नाचविता येत नाहीत आणि प्रत्यक्षातील कार्यवाही देखील निम्नस्तरीय आहे. त्यामुळे ह्या सर्व बाबींवर वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी जातीनेच लक्ष देणं आवशयक आहे.

            स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज व निकाली प्रकरणांत सज्जाद शेख यांच्या पूर्वी संतोष क्षीरसागर कार्यरत होते. बर्‍याच प्रकरणांत संतोष क्षीरसागर यांनी जाणिवपूर्वक कार्यवाही होवू दिली नाही. त्यामुळे त्यांना गच्छंती मिळाली. सध्या सज्जाद शेख कार्यरत आहेत. त्यांच्याही जात्यावरच्या म्हणी क्षीरसागरांसारख्यांच आहेत. थोडक्यात अंमलदार आणि वसुलदार व्यवस्थेतील असतील तर पोलीस ठाण्याचे कामकाज सुरळीत चालते. परंतु क्षीरसागर पूर्वी आणि सज्जाद शेख यांच्यापर्यंत सर्वांचा कारभार दलदलीचा आहे. त्यांच्या या कृत्य व अकृत्यांमुळेच कधी नव्हे तर स्वारगेट पोलीस ठाण्यात एका निरापराध युवकाचा कोठडीत मृत्यू झाला. आता हे प्रकरण सीआयडी कडे आहे. त्याचा काय निकाल लागला हे माहित नाही. परंतु स्वारगेट पोलीस स्टेशनला कोठडीत मृत्यूचा कलंक लागला एवढे मात्र नक्की.             दरम्यान अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता आले नाही तरी एकवेळ चालेल परंत अवैध धंद्यातील सक्रीय संगनमत आणि भागीदारी ही खात्याला न शोभनारी बाब नक्कीच आहे.