Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील पेठा आणि उपनगरातील गावठाणात बेकायदेशिर बांधकामांचा धडाका

Illegal-Construction-PMC

दोन गुंठ्यातः ६ मजली इमारती, १६ फ्लॅटची स्कीम, ६ महिन्यात उभ्या राहू लागल्या,

पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष,

धायरीत ६ मजली इमारत जमिनदोस्त, हिंगणे, विठ्ठलवाडी, गणेशमळा, सिंहगड रोडवरील कारवाई मात्र प्रतिक्षेत,

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

     जुनं पुणे शहर म्हणजे, पुण्यातील पेठा. कोणत्याही पेठांत जायचं तर जुने चिंचोळे रस्ते आणि एका वाड्यामागे खंडी-दोन खंडी दुचाकी,तीनचाकी व  चारचाकी वाहनांचा भरणा. त्यामुळे जुन्या पुणे शहरात जायचं यायचं म्हटलं की, तिथं कसलेलाच पुणेकर असायला हवा. पुणे शहर वाहतुक पोलीसांनी देखील पुणे शहराला शोभेल अशा पद्धतीने जुन्या पुण्यात परस्परविरोधी वाहनांचे फलक उभे केले आहेत. अगदी अस्सल पुणेकर त्याच्या उलट दिशेने वाहन पुढे दामटणार म्हणजे दामटणारच. कधी, कुठून आणि कस्सा कुठे वाहन घेवून घुसेल वा बाहेर पडेल याचा भरवसा देता येत नाही. भस्सकन् वाहन पुढे दामटणे हा पुणेरी बाणाच. वाहन पुढे दामटले तरी, कुणाला टच्च्च्ही होणार नाही. अगदी झालंच तर सॉरीऽऽ म्हणायचं नाहीतर आपण काही केलंच नाही असा आव किंवा अविर्भाव चेहर्‍यावर आणून पुढे सरळ रेषेत निघुन जायचं हा मात्र शिरस्ताच.

     नगरनियोजन झालं, पण ते जुनं शहर सोडूनच. डीसी रुल शहरात नावालाच आहेत. जुने वाडे तोडून नवीन बांधकामांना अधिकृत परवाना घ्यायचा आणि मनमानेल तसे बांधकाम करायचे. ज्या नकाशांना मंजुरी घेतली, त्याच्या अगदी उलट बांधकामे करण्याकडे अधिक कल वाढला आहे. पुणे शहरातील बहुतांश भागात हीच प्रथा आणि परंपरा सुरू आहे. इथं पुणे मनपा आणि शासनाचे नियम नावालाच आहेत. अधिकारी- कर्मचार्‍यांना सर्व ठाऊक. पण कुणीच नियमानुसार कामं करीत नाहीत. जोते तपासणी करतात की शालजोडी पांघरून येतात ह्याची खानेसुमारे अद्याप पावेतो होणे बाकी आहे. दरम्यान पुण्यातील पेठा व गावठांणांवर स्वतंत्र अधिकारी दिला जात नाही. प्रभारी पद देवून ते पद भरण्यात येते. त्यामुळे जुनं शहर आणि गावठाणं भकास झाली आहेत. जुन्या समस्या अजूनही कायम आहेत. विट मातीचे वाडे गेले अन् सिमेंटाचे वाडे आले. डीसी रुलची तर मातीच करून टाकलीय.

     दरम्यान उच्च न्यायालयाने ३१ मार्च २०१२ नंतर शहरात अनाधिकृत बांधकामे होऊ नयेत, असे महापालिका प्रशासनांना सुनावले आहे. उच्च न्यायालयात कित्येक जनहित याचिका व कित्येक अवमानना याचिका दाखल आहेत. शासन व उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून सर्रासपणे कामे केली जात आहेत. पुणे शहरातील पेठा व उपनगरातील अरूंद व चिंचोळे रस्ते व गल्ली बोळातील जुनी बैठी घरे पाडून दुरूस्तीच्या नावाखाली मजल्यावर मजले अनाधिकृतपणे चढविले जात आहेत.

     पुण्यातील सोमवार ते रविवार पेठा, सदाशिव, नारायण, रास्ता, घोरपडे अशा देखील डझन दोन डझन पेठा, तसेच भिमनगर ते मोमीनपुर्‍यापर्यंत सर्वत्र असाच प्रकार सुरू आहे.  उपनरागतील येरवडा, हडपसर, कोंढवा, कात्रज, धनकवडी, वडगाव धायरी, वारजे, बालेवाडी, हिंगणे, विठ्ठलवाडी, संपूर्ण सिंहगड रोड, इथ बजबजपुरी केली आहे. नियम आणि कायदा नेमका कुठाय असाच प्रश्‍न पडतो.

दोन गुंठ्यातः ६ मजली इमारती, १६ फ्लॅटची स्कीम, ६ महिन्यात उभ्या राहू लागल्या –

     जुन्या पुण्यात ३००, ५००, ८०० स्क्वे.फुटाच्या जागांवर चार पाच मजली इमारती उभ्या राहत आहेत. तर गावठाणातील जुन्या दोन तीन गुंठ्यावर सहा/सहा मजली इमारती १६ फ्लॅटच ओझं घेवून अगदी सहाच महिन्यात उभ्या राहू लागल्या आहेत. हडपसर, वडगाव धायरी, हिंगणे, विठ्ठलवाडी या परिसरात तर तुफान बांधकामे सुरू आहेत. हिंगणे विठ्ठलवाडीत तर दोन गुंठ्यात सहा मजली इमारती १३ फ्लॅटच ओझ सहन करीत आहेत. बांधकाम विभागाच साफ दुर्लक्ष होतय. बांधकामे मुळातच अनाधिकृत आहेत.

     शासनाच्या मार्च २००९ च्या शासन निर्णयानुसार बांधकाम पथकाने किंवा अनाधिकृत बांधकामांचे पदनिर्देशित अधिकार्‍यांनी एक टक्का जरी लक्ष दिलं तरी अशा प्रकारची बांधकामे होणार नाहीत. झालीच तर अत्याधुनिक यंत्रणांव्दारे इमारत पंक्चर करण्यास वेळ लागत नाहीत. परंतु नगरसेवक, आमदार, आमदारांचे एजंट, नगरसेवकांचे एजंट, बिल्डर, आर्किटेक्चर आणि ठेकेदार यांच्या दबावामुळे व अधिकार्‍यांच्या लालसेपायी पुणे महापालिकाच पंक्चर झाली आहे. त्यामुळे  ह्या परिस्थितीत नेमकी कधी सुधारणा होणार आहे हे देवालच ठाऊक. निदान प्रशांत महासागराला भरती आल्यास ह्यात सुधारणा होवू शकते. परंतु सतत ओहोटी लागल्याने सर्वांच चांगभल होतयं एवढं मात्र नक्की.

धायरीत ६ मजली इमारत जमिनदोस्त, हिंगणे, विठ्ठलवाडी, गणेशमळा, सिंहगड रोडवरील कारवाई मात्र प्रतिक्षेत –

     बांधकाम विकास विभागाच्या धायरी येथे अनाधिकृत बांधकामे सातत्याने वाढत होती. वारंवार तक्रारी येत होत्या. त्यामुळे मागील गुरूवारी जुना पारी कंपनी रोडवरील स.नं. ३० येथील सहा मजली इमारतीवर कारवाई करून, संपूर्ण इमारत जमिनदोस्त करण्यात आली आहे. एखादी कारवाई करून ही समस्या सुटणार नाहीये. तर अनाधिकृत बांधकामे होवूच नयेत यासाठी शासन निर्णय २००९ ची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सध्या हिंगणे, विठ्ठलवाडी, गणेशमळा, सिंहगड रोडवर अनेक अनाधिकृत तसेच अधिकृत बांधकाम परवाना घेवून अनाधिकृत बांधकामे केली जात आहेत. अशाप्रकारची अनाधिकृत बांधकामे कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत. चालुच्या आठवड्यात या इमारती जमिनदोस्त होतील अशी अपेक्ष ठेवायला काही हरकत नाही.

पुण्यातील पेठा आणि उपनगरातील गावठाणात बेकायदेशिर बांधकामांचा धडाका –

     पुण्यातील सोमवार पेठ असो की, मंगळवार, बुधवार असो की, शुक्रवार पेठ, रास्तापेठ असो की, नारायणपेठ, जिकडं तिकडं अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत. अधिकृत बांधकाम परवानगी घ्यायची आणि अनाधिकृत बांधकामे करायची अशी चढाओढ सध्या बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि आर्किटेक्चर यांच्यात लागली आहे. पुण्यात हाताच्या बोटावर दोन वेळा मोजमापे घेतल्यास, इतके आर्किटेक्चर अनाधिकृत बांधकामे करण्यात पटाईत आहेत.

     त्यामुळे आर्किटेक्चर, बांधकाम व्यावसायिक यांच्यावर कठोर कारवाई निर्णय घेण्याची वेळ आली आहे. प्रशांत महासागर कधी उसळतोय त्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. नाहीतर अधिकारी सर्रासपणे सर्वदा सुखी आहेत.