पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
मध्यवर्ती शासनकर्त्यांच्या चूकीच्या धोरणाविरूद्ध देशात वेगवेगळ्या पक्षांची आघाडी झाली. राज्यातही प्रस्थापित पक्षांनी आपआपली आघाडी महाआघाडीची स्थापना केली. यातही वर्षानुवर्षे सत्ता, संपत्तीपासून दूर असलेल्या समाजघटकांना विचारात न घेता, निव्वळ सत्ता मिळविण्यासाठी आघाड्या तयार झाल्या. वर्षानुवर्षे सत्ता आणि संपत्ती धारण करणार्यांनाच पुनः पुनः उमेदवारी देण्यात आली. याच काळात राज्यातील सत्ता, संपत्ती, शिक्षण, सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या वर्गांना बरोबर घेवून वंचित बहुजन आघाडीची स्थापना ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. धनगर, मुस्लिम, वंजारी, सारख्या ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी समाजातील दुर्लक्षित व वंचित समाजातील कार्यकर्त्यांना लोकसभेची उमेदवारी देवून, त्यांच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ४८ पैकी १२ जागांचा प्रस्ताव वंचित आघाडीने कॉंग्रेस आघाडीपुढे ठेवण्यात आला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, शरद पवार तसेच सर्वच कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या. आमच्या बरोबर युती करायची तर वंचित समाजातील उमेवारांना वार्यावर सोडा, मुस्लिमांना सोडून दया असे सांगत कॉंग्रेसवाल्यांनी वंचित व दुर्लक्षित समाजाचे उभरते नेतृत्व मारून टाकण्याचा पारंपारिक प्रयत्न केला. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्ता, सपंत्ती, सामाजिक न्याय, आर्थिक उन्नतीचे कोणतेही साधन सामुग्री नसलेल्या वर्गांना बरोबर घेवून लोकसभेच्या ४८ जागांवर निवडणूक लढविली. निकाल आपल्या हाती आलेले आहेत.
ज्या वर्गांना कॉंग्रेसवाल्यांनी नाकारले, ज्यांच्याबद्दल नाके मुरडली, त्याच वर्गाने कॉंग्रेसचे ८, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २ भाजपा- शिवसेनेचे ३, स्वाभिमानीचे २ उमेदवारांना अस्मान दाखविले. दोन माजी मुख्यमंत्री पराभूत झाले आणि वंचितांच्या विरूद्ध असलेल्या भूतावळींना त्यांची जागा मिळाली. कॉंग्रेसवाल्यानंी वंचित आघाडी विरूद्ध मोदीची बी टीम म्हणून संभावना केली. पारंपारिक बदनामीची केंद्रे सुरू केली. परंतु महाराष्ट्रातील वंचित समाजाने मोठ्या ताकदीने सत्तेचे पारंपारिक हक्कदारांची हाकलपट्टी केली आहे. केंद्रात चहावाला आणि राज्यात कपबशीवाला फॅक्टर राज्यात पुढे आला आहे.
वंचित बहुजन आघाडीमुळे आठ मतदारसंघांत कॉंग्रेस- राष्ट्रवादीचा गेम तर भाजपा सेना व स्वाभिमानीच्या ५ जणांचा गेम –
महाराष्ट्रात २५ जागा मिळवून दिल्लीचा सोपान गाठू पाहणा-या कॉंग्रेस राष्ट्रवादीचा वंचित बहुजन आघाडीमुळे गेम झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे दोन माजी मुख्यमंत्री, राजू शेट्टी यांच्यासारखा मातब्बर शेतकरी नेता, धनंजय मुंडे यांनी प्रतिष्ठेचे केलेले बजरंग सोनावणे, परभणीच्या रूपाने राष्ट्रवादीच्या आशा खिळून असलेले राजेश विटेकर, बुलढाण्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे, सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील या मातब्बरांचा वंचित बहुजन आघाडीमुळे आठ लोकसभा मतदारसंघांत कॉंग्रेस महाआघाडीचा गेम झाल्याचे आकडेवारी सांगते.
नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रताप चिखलीकर ४ लाख ७५ हजार ८०१ मते घेऊन विजयी झाले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ४ लाख ३३ हजार ५०२, मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांनी १ लाख ६२ हजार ६१२ मते घेतली. कॉंग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांची बेरीज केली असता ५ लाख ९६ हजार ११४ एवढी होते. त्यामुळे येथे चव्हाण यांना वंचितच्या उमेदवाराचा फटका बसला.
सोलापूर मतदारसंघातून भाजपचे जयसिध्देश्वर स्वामी ५ लाख २४ हजार ९८४ मते घेऊन विजयी झाले. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ३ लाख ६६ हजार ३७७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७० हजार ७ मते मिळाली. कॉंग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांची एकत्र बेरीज केली असता ५ लाख ३६ हजार ३८४ एवढी मते होतात. येथेही वंचितच्या उमेदवारामुळे शिंदेना फटका बसला.
अकोला मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे ४ लाख १५ हजार ७४० मते घेऊन विजयी झाले. कॉंग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ४७ हजार २१ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७३ हजार ११२ मते मिळाली. कॉंग्रेस आणि वंचितची एकत्र बेरीज केली तर ५ लाख २० हजार १३३ मते होतात. यामुळे येथेही वंचितचा फटका कॉंग्रेसला बसला.
बीड मतदारसंघात भाजपच्या प्रीतम मुंडे या ६ लाख ७८ हजार १७५ मते घेऊन विजयी झाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बजरंग सोनवणे यांना ५ लाख ९० हजार ८०७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना ९२ हजार १३९ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वंचितच्या मतांची एकत्र बेरीज केली तर ही मते ६ लाख ८२ हजार ९४६ हजार होते. त्यामुळे येथेही वंचितच्या उमेदवाराचा राष्ट्रवादीला फटका बसला.
हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांना ४ लाख ८६ हजार ३०९ मते घेऊन विजयी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना ४ लाख ३६ हजार ५६७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे सय्यद अस्लम यांना १ लाख १६ हजार ४५० मते मिळाली. स्वाभिमानी आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या मतांची एकत्र बेरीज केली तर ५ लाख ५२ हजार ५०७ एवढी होते. त्यामुळे शेट्टी यांना वंचितच्या उमेदवाराचा फटका बसला.
बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव ४ लाख ६४ हजार ६१८ मते घेऊन विजयी झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ३ लाख ४६ हजार ९७४ मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांना १ लाख ५७ हजार १३९ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वंचित च्या उमेदवारांची एकत्र बेरीज केली तर ५ लाख ४ हजार ११३ मते मिळाली. यामुळे बुलढाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला फटका बसला.
परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव यांना ५ लाख २९ हजार १४८ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांना ४ लाख ९१ हजार २ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांना १ लाख ४७ हजार ८४९ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि वंचित उमेदवाराची एकत्र बेरीज केली असता ती ६ लाख ३८ हजार ८५१ एवढी मते होतात. त्यामुळे विटेकर यांना वंचितच्या उमेदवारामुळे फटका बसला आहे.
सांगली मतदारसंघात भाजपचे संजय पाटील ४ लाख ९७ हजार ५७३ मते घेऊन विजयी झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना ३ लाख ३८ हजार ११६ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी २ लाख ९३ हजार ९३ मते घेतली. स्वाभिमानी आणि वंचितच्या मतांची बेरीच केली असता ती ६ लाख ३१ हजार २०९ एवढी होते. त्यामुळे वंचितच्या उमेदवाराचा फटका या मतदारसंघातही बसला आहे.
औरंगाबाद – इम्तियाज जलील एमआयएम मिळालेली मतं ३८८११५ मतांची टक्केवारी ३२.५२
चंद्रकांत खैरे शिवसेना मिळालेली मतं ३८२३९५ मतांची टक्केवारी ३२.०८
हर्षवर्धन जाधव अपक्ष मिळालेली मतं २८१९८६ मतांची टक्केवारी २३.६६
सुभाष झांबड कॉंग्रेस मिळालेली मतं ९१३०० मतांची टक्केवारी ७.६५
वंचितमुळं काय झालं ?
औरंगाबादमध्ये वंचित आणि कॉंग्रेस एकत्र आली असती तर त्यांचा उमेदवार सहज निवडून आला असता. मात्र, वंचितनं स्वबळावर लढत या मतदारसंघात लढत विजय मिळवला आहे. शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तब्बल २ लाख ८१ हजार ९८६ मतं घेतल्यानं चंद्रकांत खैरे यांचा पराभव झालाय.
चंद्रपूर – हंसराज अहीर भाजप मिळालेली मतं १९४२५४ मतांची टक्केवारी ४०.९२
बाळू धानोरकर कॉंग्रेस मिळालेली मतं २१६५३२ मतांची टक्केवारी ४५.६१
राजेंद्र महाडोले वंचित मिळालेली मतं ४३७०७ मतांची टक्केवारी ९.२१
वंचितमुळं काय झालं
चंद्रपूरमध्ये वंचितमुळं विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव झाल्याचं चित्र दिसतंय. हंसराज अहीर आणि कॉंग्रेसच्या धानोरकर यांच्यात फक्त २२ हजार २७८ मतांचा फरक आहे. कारण या मतदारसंघात वंचितच्या महाडोले यांना ४३ हजार ७०७ मतं मिळालेली आहेत.
गडचिरोली चिमूर – अशोक नेते भाजप मिळालेली मतं ४२१६१५ मतांची टक्केवारी ४५.६३
डॉ. नामदेव उसेंडी कॉंग्रेस मिळालेली मतं ३४९५४९ मतांची टक्केवारी ३७.८३
डॉ. रमेशकुमार गजबे वंचित- मिळालेली मतं ९९९११ मतांची टक्केवारी १०.८१
वंचितमुळं काय झालं
कॉंग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज ही ४४९४६० इतकी होते. ती भाजपचे विजयी उमेदवार अशोक नेते यांच्यापेक्षा २७,८४५ मतांनी अधिक होते. त्यामुळं वंचितला मिळालेल्या मतांमुळं गडचिरोलीमध्येही कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याचं स्पष्ट होतंय.
आता विधानसभेत वंचितचे ५५ ते ९० आमदार असतील
वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसबरोबर युती केली नाही हे बरेच झाले नाहीतर वंचितची कुचंबना झाली असती अशी प्रतिक्रिया ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत वंचित घटकांचे ५५ ते ९० उमेदवार आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. वंचित वर्ग एकवटतोय, आंबेडकरांच्या नेतृत्वात.