Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

हज्जार रुपयांचा रट्टा मारून, पुण्यातील वाहनचालकांचे दंडनिय समुपदेशन

* वाहतुक पोलीसांचे असेही जबरी समुपदेशन

* आवाहन केले असते तर एकही फिरकला नस्ता, लायसन जप्त करून हज्जार रुपयांचा रट्टा मारल्यावर सगळे कसे धावत आले बघ्घा….. आमच्या समुपदेशन कार्यक्रमाला…..

* विद्यार्थ्यांचे अतोनात हाल, समुपदेशन कसले ही तर जब्बर धमकीच….

* प्रत्येक जण कावर्‍या बावर्‍या नजरेने पोलीसांचे जबरी मनोगत

एैकत होता. परंतु हळुच आमचे लायसन कुठाय, दंड का भरायचा…

कशाचा …म्हणुन चुळबूळ करत सुटले.

traffic-police-pune

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/

                पुणे तिथे काय उणे ह्या म्हणीप्रमाणेच आमचे पुणे आहे. भलत्याच अक्कल हुश्शारीने कोण कुठला शोध लावेल याचा काही भरवसा देता येत नाही. ह्या हुश्शारीनेच पुण्यातील पाट्या रंगलेल्या आहेत. हे झाले पुणेकरांचे. पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील व परराज्यातील बहुतांश अधिकारी पुण्यात शासनातील पदांवर कार्यरत आहेत. ते देखील काही अवधितच अस्सल पुणेकर झाले आहेत. त्यांनी देखील पुणेरी बाणा दाखवित पुण्यातील वाहनचालकांचे रस्त्यावरील वाहन चालविण्याबाबत समुपदेशन करण्याचा घाट घातला. त्यासाठी मागील दहा पंधरा दिवसांपासून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष कामगिरी बजावून, शाळा कॉलेज जवळ दिवसरात्र खपुन पोलीसांनी एक एकाला अडवुन त्यांच्याकडील लायसन जप्त केले. त्यांच्याजवळ तुमचे समुपदेशन करायचे आहे, अशी चिठ्ठी वजा पत्र दिले. विद्यार्थ्यांना हीच पावती आहे शुक्रवार दि. ७ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस परेड ग्राऊंड शिवाजी नगर येथे हजर राहण्याचे फर्मान जारी केले. मग काय सगळे विद्यार्थी कावर्‍या बावर्‍या नजरेने हे पोलीस परेड ग्राऊंड कुठाय म्हणून धावाधाव करू लागले. जस काय १०वी/ १२ वी परीक्षेचा नंबर लागल्या सारखे सगळे सैरावैरा धावत सुटले होते. मग काय टायमाच्या आतच सगळे हज्जर्र….मग जमलेल्या विद्यार्थ्यांपुढे साग्रसंगिता सारखे धमकीवजा वाहन कसे चालवावे याबाबत समुपदेशन झाले. ज्यांना नोटीसा दिले होते ते महाविद्यालयीन विद्यार्थीच होते. त्यात चारचाकी वाहन चालविणारे व रस्त्यार उडाणटप्पुगिरी करणारे एकही आढळुन आला नाही. जे होते ते सर्व विद्यार्थीच.

वाहतुक शाखेचे निवेदन –    

                पुणे शहरातील वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढत्या वाहतुकीचे प्रमाण लक्षात घेता दुचाकी चालकांना रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हेल्मेटचा वापर करणे तसेच चारचाकी वाहनचालकांनी सिट बेल्टचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे.असे असुनही पुण्या सारख्या सुसंस्कृत शहरात हेल्मेट व सिटबेल्टचा वापर केला जात नसल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळेच अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने शासनाच्या धोरणानुसार वाहतुक शाखा व प्रादेशिक परिवहन यांच्या संयुक्त विद्यमाने ७/१२ डिसेंबर रोजी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात वाहनचालकांच्या समुपदेशनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यासाठी १५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत मोहिम उघडुन नियमभंग करणार्‍यांना समजपत्र देण्यात आली असल्याची माहिती वाहतुक शाखेकडून प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली होती.

आवाहन केले असते तर एकही फिरकला नस्ता, लायसन जप्त करून हज्जार रुपयांचा रट्टा मारल्यावर सगळे कसे धावत आले बघ्घा….. आमच्या समुपदेशन कार्यक्रमाला –

                बेशिस्त वाहन चालकांचे समुपदेशन करावे असा शासनाचा जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्याच आधारावर केवळ पुणे शहरात वाहतुकीच्या नावाने समुपदेशनाचा घाट पुणे शहर वाहतुक विभागाने घातला. पुण्यात बेशिस्त वाहतुक आहे त्यात काही दुमतच नाही.

                 परंतु जे रस्त्यावर उडाणटप्पुगिरी करतात, नियमांचे पालन करीत नाहीत अशांना समजपत्र देवून त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक होते. परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू असतांनाच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी कार्यक्रम होवून देखील आज सोमवार पर्यंत म्हणजे बातमी लिहीपर्यंत वाहतुक शाखेची प्रेसनोट जारी झाली नव्हती व अधिकृत माहिती देखील कुणी दिली नाही.

                याबाबत अधिक विचारणा केली असता, एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, सरळ सरळ आवाहन केले असते तर एकही फिरकला नस्ता, लायसन जप्त करून हज्जार रुपयांचा रट्टा मारल्यावर सगळे कसे धावत आले बघ्घा….. आमच्या समुपदेशन कार्यक्रमाला अशी प्रतिक्रिया मिळाली. त्यामुळे हा समुपदेशनाची उठाठेव का केली याचे उत्तर मिळते.

तुझे वय नाही इतकी माझी सर्व्हीस झाली आहे, मला अक्कल शिकवू नको- बापरेऽऽ हे समुपदेशन आहे की, येरवड्याचे कारागृह –

                खरं तर वाहतुक नियमांचे पालन सर्व पुणेकरांनी करावे यासाठीच हा समुपदेशन कार्यक्रमाचा हेतू होता. परंतु पुण्यातील शासकीय इंजिनिअरींग महाविद्यालयातील काही युवकांनी आम्हाला तर कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पकडले आहे. कॉलेज मधुन कॅन्टीन पर्यंत जाण्यासाठी हेल्मेट वापरायचे काय… असा प्रश्‍न विचारत असतांना, एका वरीष्ठ पोलीसाने पोलीसी भाषेत उत्तर दिले. ते म्हणाले तुझे वय नाही इतकी माझी सर्व्हीस झाली आहे, मला अक्कल शिकवु नको असे उत्तर दिले. त्यामुळे विद्यार्थी अधिकच भयभित झाले व विदयार्थ्यांनी तेथून काढता पाय घेतला. ह्याला समुपदेशन म्हणाचे काय….

लायसन जप्त केले, हेल्मेट नाही म्हणून ह्जार रुपयांचा दंड –

                लायसन जप्त केले म्हणून ५०० रुपये व हेल्मेट नाही म्हणून ५०० रुपये व इतर चार्जेस मिळून हज्जार पंधराशे रुपयांचा दंड एका एकाला ठोकण्यात आला. शिवाय समुपदेशनाला हजर राहिला म्हणून समजपत्राच्या पाठीमागे शिक्का मारून, त्यांना पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले व त्यांचे लायसन देण्यात येत होते. जे समुपदेशनाला उशिरा आले त्यांना पुन्हा पिटाळण्यात आले. खरं तर हजार पंधराशे रुपयांचा रट्टा मारत असतांना, त्याच हजार पंधराशे रूपयांतून पाचसातशे रुपयांचे हेल्मेट त्यांना दिले असते तर ते संयुक्तिक ठरले असते. अशा प्रकारचे जबरी समुपदेशन करून पुण्यात सुधारणा होणारेय काय.. यातून काय निष्पण्ण केले हा खरा प्रश्‍न आहे.

                वाहतुक विभागात अशोक मोराळे किंवा अन्य अधिकारी असतांना अशा प्रकारची कारवाई झाली नव्हती. हेल्मेटची जबरदस्ती होती व आहेच परंतु दंडनिय समुपदेशन कधी झाले नव्हते.