Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना धमक्या, कर्ज वसुलीसाठी घरी येऊन वसूली करणार असल्याचे दुरध्वनी, कर्जवसुलीचे काम स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांकडे?

पुणे/दि/ श्री नाथ/
कोरोना महामारीमुळे मार्च पासून लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू आहे. सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. केंद्र व राज्य शासनाने टप्प्या-टप्याने अनलॉकडाऊनची प्रक्रिया सुरू केली असली तरी, कोरोना महामारीमुळे लाखो नागरीकांचे रोजगार गेले आहेत. त्यातच ऑटोरिक्षा सह घरगुती उपकरणे, पर्सनल लोन घेतलेल्या नागरीकांना खाजगी फायनान्स कंपन्यांकडून धमक्यांचे सत्र आजही सुरू आहे.


कोरोना महामारीमुळे अनेकांचेरोजगार गेले असल्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे जिकीरीचे झाले आहे. नागरीक आपआपल्या परीने कुटूंबाची गुजराण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच ज्यांनी ऑटो रिक्षा, दुचाकी वाहने, तसेच खाजगी माल वाहतुकीसाठी टेम्पो सारखी वाहने फायनान्स कंपनीव्दारे खरेदी केली आहेत. तसेच ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजार, लाखभर रुपयांचे कर्ज पर्सनल लोन केले आहे, त्यांना कर्जाचे हप्ते भरणे शक्य नाहीये.
राज्य शासनाने देखील कर्जदारांवर बळजबरी करू नये असे तोंडी आदेश दिले असल्याचे वृत्तपत्रांतून दिसून येत आहे. तथापी प्रत्यक्षात ज्या कंपन्या बळजबरी करीत आहेत, त्यांच्यावर मात्र कारवाई केल्याचे कुठेही आढळून येत नाही.
कर्जवसुलीचे काम स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांकडे –
दरम्यान कर्जाचे हप्ते भरण्याबाबत दिवसांतून किमाने ५ ते १५ वेळा फोन केले जात आहेत. नागरीकांनी अमुक एक तारीख दिल्यानंतर देखील दर दिवशी मोबाईल फोन वाजले जात आहेत. तसेच त्यांच्या मोबाईलवरील संभाषणातून संबंधित इसम हे गुन्हेगारी स्वरूपाची भाषा वापरत आहेत. पुण्यातील वाकडेवाडी येथील फायनान्स कंपनीचे काम एका धर्मातील गुन्हेगारी टोळीकडे दिले असल्याचे मोबाईलवरील अनेकांच्या संभाषणातून दिसून आले आहे. तर वाकडेवाडी पाषाण लिंकरोडवरील, सदाशिव पेठेतील एका फायनान्स कंपनीचे काम कोंढवास्थित स्थानिक गुन्हेगारी टोळीकडे दिल्याचे देखील त्यांच्या हिंदीमिश्रीत आरेरावीच्या संभाषणातून दिसून येत आहे.
पुणे पोलीसांकडून गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम सुरू असतांना, दुसरीकडे मात्र खाजगी फायनान्स कंपन्या, स्थानिक गुन्हेगारी टोळीला पोसण्याचे काम तरी करीत नाहीयेत ना अशी शंका निर्माण झाली आहे. ज्यांना वारंवार फायनान्स कंपनीचे फोन येत आहेत, कर्जदारांच्या घरी येवून बळजबरीने वाहने तसेच गृहपयोगी वस्तु उचलुन घेवून जाण्याची धमकी देत आहेत, अशा नागरीकांनी संबंधित मोबाईलवरून आलेले नंबर सार्वत्रिक करून, पोलीसांना संपर्क करणे अपेक्षित आहे.
दरम्यान राज्य शासनाने व पोलीस यंत्रणेने शहरात नेमकं काय सुरू आहे, याचा आढावा घेवून, नेमक्या कर्जाची वसुली करणार्‍या गुन्हेगारी टोळ्या आहेत की अन्य हे तपासणे आवश्यक आहे.