भीमा-कोरेगाव येथे १८१८ साली झालेली पेशवे-इंग्रज यांच्यातील शेवटची लढाई ही ‘निर्णायक’ होती. सरदार बापू गोखले यांच्या नेतृत्वाखाली पेशव्यांचे प्रचंड सैन्य इंग्रजांच्या खडकी व पुणे येथील गॅरिसनवर हल्ला करण्यासाठी जमले होते. ही बातमी समजल्यावर कॅप्टन स्टॉण्टन या इंग्रज अधिकार्याच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याची एक छोटी तुकडी (पेशव्यांचे सैन्य कोरेगावला असताना) ३१ डिसेंबर १८१७ला रात्रभर २७ मैल रपेट करून पायी पोहचले. इंग्रजांकडे ७५० सैनिक आणि दोन-सहा पौंडाच्या तोफा होत्या. पेशव्यांच्या सैन्यात २०,००० घोडदळ अन् ८०००चे पायदळ आणि दोन तोफा होत्या.
पेशव्यांच्या सैन्याच्या तीन वेगवेगळ्या तुकडया इंग्रज सैन्याला कोंडीत पकडून सर्व बाजूंनी हल्ला केला व तोफगोळ्यांचा मारा करीत त्यांचे निसटण्याचे सर्व मार्ग बंद केले. अशा वेळी महारांची बहुसंख्य असलेल्या इंग्रज सेनेने निकराचा प्रतिकार दिवसभर करून रात्री नऊ वाजण्याच्या सुमाराला पेशव्यांच्या सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. त्यात ४० सैनिक कामी आले. त्यात बहुसंख्य महार सैनिक होते. म्हणून ही लढाई महारांनी जिंकली असे म्हटले जाते हा इतिहास आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा सैन्यात मोठया संख्येने महार होते. महार जात ही लढाऊ व शूर समजली जात असे. पेशव्यांच्या काळात महारांना प्रवेश बंदी केली गेली. त्यांना पेशव्यांच्या सैन्यात प्रवेश मिळेना. अशा वेळी काही महार तरुण ब्रिटिशांच्या ‘बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री’मध्ये दाखल झाले.
त्या काळी ‘स्वातंत्र्य’, ‘स्वदेश’ या कल्पना नव्हत्या. अनेक मराठा राजपूत व इतर हिंदू सरदार आपल्या सैन्यासह मोगल व इतर सुलतानांच्या सेवेत होते. मुस्लीम सुलतानांच्या पदरी मराठा, राजपूत सरदार असत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे त्यापैकी एक होते. कान्होजी आंग्रेचे आरमार दुसर्या बाजीरावाने इंग्रजांच्या मदतीने समुद्रात बुडविले होते.
कोरेगावला ब्रिटिशांनी २६ मार्च १८२१ला भीमा कोरेगाव लढाईत कामी आलेल्या महार सैनिकांचे स्मारक बांधण्यासाठी पाया घातला, अन् ६५ फूट उंचीचा मनोरा बांधला (विजयस्तंभ) या विजयस्तंभावर भीमा कोरेगाव लढाईत कामी आलेल्या महार सैनिकांची नावे कोरली आहेत, त्यांच्याबद्दल गौरव उद्गार कोरले आहेत. ‘अविश्रांत’, ‘अन्नपाण्यावाचून सलग बारा तास ते लढले’, ‘शौर्यपूर्ण कृती’, ‘अविचल धैर्य’ शिस्तबद्ध पराक्रम, ‘त्यागपूर्ण धाडस’ ‘कौतुकास्पद सातत्य’ ( विजयस्तंभावर कोरलेल्या मूळ इंग्रजी शब्दांचा अनुवाद) या शब्दात ब्रिटिशांनी महार सैनिकांचा गौरव केलेला आढळतो.
या स्मारकाला १ जानेवारी १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा भेट देऊन त्या सैनिकांना आदरांजली वाहिली. आजही त्यांचे हजारो अनुयायी प्रत्येक वर्षी १ जानेवारीला कोरेगावला जाऊन ‘विजयस्तंभा’ला आदरांजली वाहतात/ अभिवादन करतात. या विजयस्तंभाची प्रतिकृती ‘महार रेजिमेंट’च्या मानचिन्हावर स्वातंत्र्यकाळातही वापरली जाते. इथे अजून एक बाब लक्षात घेतली पाहिजे. भीमा-कोरेगावच्या लढाईत वीरमरण आलेल्या महार सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘विजयस्तंभ’ उभारणार्या ब्रिटिशांनी कालांतराने महार जातीची सैन्य भरती बंद केली. महार जातीस लष्करात घेऊ नये अशी किचनेरप्रणीत सरकारी घोषणा झाली. त्या वेळी ब्रिटिशअंकित भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांनी या अन्यायविरुद्ध दाद मागण्यासाठी न्या. महादेव गोविंद रानडे यांची मदत घेतली. सुभेदार रामजी आंबेडकर यांनी न्या. रानडे यांची भेट घेऊन एक निवेदन तयार करून घेतले, नि ते सरकारला सादर केले. त्या निवेदनाची एक प्रत पुढे आपल्याला सापडली, अशी आठवण न्या. रानडे जन्मशताब्दीच्या वेळी पुणे स्थित ‘गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ या संस्थेत १८ जानेवारी १९४३ रोजी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:च सांगितली.
‘महार जमातींच्या गौरवशाली पराक्रमाचा एक मोठा इतिहास आहे. पश्चिम व मध्य भारतातील या जमातीने आपले अतुलनीय शौर्य १८१८ साली भीमा- कोरेगाव, १८२६ साली काठियावाड, १८४६ साली मुलतान, १८८० साली कदाहार येथे दाखविले.
१९४१ साली या गौरवशाली परंपरेला ‘संघटनात्मक’ स्वरूप प्राप्त झाले. ‘महार रेजिमेंट’च्या स्थापनेने व्हाइसरॉयच्या युद्ध सल्लागार समितीवर असलेले डॉ. आंबेडकर यांचे प्रयत्न यामागे होते. हा काळ दुसर्या महायुद्धाचा. १९४६ साली ‘महार रेजिमेंट’ ही ‘मशिनगन रेजिमेंट’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आजही ‘महार रेजिमेंट’च्या मानचिन्हावर कोरेगाव विजयस्तंभाच्या बरोबरीने दोन क्रॉस मशिनगन आणि मध्यभागी ‘एम. जी. ही आद्याक्षरे दिसतात.
‘महार रेजिमेंट’ने १९४१च्या दुसर्या महायुद्धात बर्मा, पर्शिया, इराक तसेच १९४७ ४८ च्या काश्मीर युद्धात, १९६१ च्या गोवा मुक्तिसंग्रामात, १९६१ च्या भारत-चीन युद्धात, १९६५ व १९७१ च्या भारत पाक / बांगलादेश मुक्तिसंग्रामात तसेच नागालॅण्ड, मिझोरम येथील बंडखोरांच्या कारवाईत अतुल शौर्य दाखविले. परदेशातदेखील कोरिया, कांगो, गाझा तसेच १९८७ मध्ये श्रीलंका येथे उत्कृष्ट कामगिरी बजावली. काश्मीरच्या युद्धात झंगड असल, उत्तर जैरिया, टिळकपूर, महाडीपूर (१९६५) येथे केलेल्या अतुलनीय पराक्रमाबद्दल महार रेजिमेंटला पाच बॅटल ऑनर्सनी सन्मानित करण्यात आले आहे. १ परमवीर चक्र, ४ महावीर चक्र, २९ वीर चक्र, १ कीर्ती चक्र, १२ शौर्य चक्र, २२ विशिष्ट सेवा पदक, ६३ सेना पदक ‘महार रेजिमेंट’च्या नावावर आजपर्यंत आहे. म्हणून ही लढाई म्हणजे फक्त पेशव्यांचा पराभव नव्हे तर याने महार रेजिमेंटचा पायाही घातला..