Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाची अवैध धंद्यावर कारवाई, अवैध धंद्याचे निर्मूलन की खानेसुमारी

police crime investigation

पुणे/दि/ प्रतिनिधी/

                पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सध्या पोलीस आयुक्त, सहआयुक्त, चारही परिमंडळाचे उपायुक्त हे नवीनतम असल्याने, पदभार घेताच शहरातील अवैध धंद्यावर कारवाईचा धडका सुरू केला आहे. शहरातील मटका, जुगार, हुक्का र्पार्लर, सट्टा व देहव्यापार यांच्यावर धडक कारवाईमुळे, अवैध धंदे चालविणार्‍यांनी धंदे बंद केले असले तरी, कारवाईच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली असून, शहरातील अवैध धंद्याचे निर्मूलन की अवैध धंद्याची खानेसुमारी सुरू आहे अशी कुजबूज शहरात होत आहे.

                सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयात नागपुरसह विदर्भातील काही जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांना उचलुन पुणे शहरात पदस्थापना देण्यात आली आहे. तर पुण्यातील अधिकार्‍यांना नागपुर मध्ये स्थलांतरी केले आहे.

                सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पुणे शहर पोलीस आयुक्त, सह आयुक्त, एकुण चार पोलीस परिमंडळासह आठ उपायुक्त नवीनतम आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पदस्थापना होताक्षणीच् अवैध धंद्यावर  कारवाईचा बडगा उगारला आहे.

                वास्तविक पाहता, हा जुनाच खेळ असून, एखाद्या पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षक आले की, ते देखील हद्दीतील धंद्यावर कारवाईचा बडगा उगारतात. पुन्हा आठ दहा दिवसात सर्व धंदेवाल्यांची परेड साहेबांसमोर झाली की, धंदे पुन्हा शेअर मार्केटसारखे उसळून वाहतात. अगदी तस्साच् प्रकार पुणे शहर पोलीस आयुक्तालयात झाला आहे. नवीनतम् अधिकार्‍यांनी अवैध धंद्यावर  कारवाईचा बडगा उगारला असला तरी, शहरात नेहमीच कुजबूज सुरू आहे. हद्द निहाय अवैध धंद्याची परेड आणि खानेसुमारी होत असल्याचा अनेक धंदेवाल्यांचा आणि जुगार खेळणार्‍यांचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे ही खरोखरची  कारवाई आहे की, खानेसुमारी हे पुढील काळच सांगणार आहे. तुर्तात शांती.

किती सीपी आले आणि किती डीसीपी गेले, आम्ही मात्र इथेच आहोत, सीपीही जाणार- डीसीपीही जाणार आम्ही मात्र पुण्याच्या ७/१२ चे आहोत –

                पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पोलीस उपायुक्त परिमंडळ एकुण १ ते ४ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त हे बहुतांश नवीन आहेत. त्यामुळे वरीष्ठ अधिकार्‍यांनी ५ ऑगस्ट २०१८ रोजी पदभार स्वीकारला आणि ६ ऑगस्ट रोजी अवैध धंद्यावर कारवाई केल्याबाबत पत्रकार परिषदही घेण्यात आली. तसेच हुक्का पार्लर चालविणारे व हुक्का पिणार्‍यांविरूद्ध धडक कारवाई देखील केल्याचे पोलीस आयुक्तालयातील प्रेसनोट वरून दिसून येत आहे.

                या कारवाई मध्ये गुन्हे विभागातील गुन्हे विभाग, साबर विभाग, आर्थिक तसेच अंमली पदार्थ शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कारवाई केल्याचे नमूद आहे. पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंग व शिरीष देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केल्याचे नमूद आहे.

                दरम्यान पुणे शहर पोलीस दल वसुलदार संघटनेने (नाव काल्पनिक) वरीष्ठांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले असून, पारंपारीक धंदेवाल्यांकडून मानधन वाढवुन मागण्यासाठी ही कारवाई फायदेशीर ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ (चार) विभागातील वसुलदारांनी तर म्हणे, कारवाईबाबत एका पार्टीचे आयोजन केले असल्याचे समजते.

                दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वसुलदार संघटनेच्या अनेक प्रवक्त्यांनी धूंद अवस्थेत असतांना एक चारोळी एैकविली, ते म्हणतात – किती सीपी आले आणि किती डीसीपी गेले, आम्ही मात्र इथेच आहोत, सीपीही जाणार- डीसीपीही जाणार आम्ही मात्र पुण्याच्या ७/१२ चे आहोत. खरंच महा-१२ कुणाला एैकणार नाही हेच खरं. (वसुलदार संघटनेची विस्तृत यादी पुढील अंकात)