Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा – वडेट्टीवार

नागपुर/दि/
मराठा समाजाच्या १२ टक्के जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरू करा. ओबीसीसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे. अशा वेळी ओबीसी मुलांनी बेरोजगार म्हणून फिरायचे काय, असा सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
ओेबीसींसह इतर समाजातील मुलांना कदापी वेठीस धरायला नको. मराठा समाजावर अन्याय व्हायलाच नको. पण असे करतांना ओबीसी वरील अन्याय नको असे ते म्हणाले. नोकरभरतीसाठी ओबीसी तरूणांमध्ये असंतोष वाढत आहे. कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको अशा भावना वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत.
या संदर्भात ऍडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेवून लवकरच निर्णय घेवू. मोठ्या समाजाने लहान समाजाला किती दाबत ठेवायचे असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. राज्य सरकारने मराठा समाजाला नोकर्‍यांत १२ टक्के आरक्षण दिले आहे. याला कुणी कोर्टात आव्हान देत असेल तर न्यायालयीन प्रक्रियेला किती वेळ लागेल हे कुणाच्या हातात नाही. तोपर्यंत मराठा समाजाच्या जागा न भरता इतर समाजाच्या जागा भरणे योग्य राहिल असे मंत्री वडेट्टीवार म्हणाले.
मराठा समाजाच्या बाबत सातत्याने गरळ ओकणार्‍या वडेट्टीवारांच्या हाकलपट्टीची मागणी
मराठा समाज विजय वडेट्टीवारांवर चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सरकारमधून वडेट्टीवार यांची हाकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणार्‍या वडेट्टीवार यांना धडा शिकवा अशी मागणी केली आहे.