Wednesday, April 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

आज दि. 11 जानेवारी 2023 मधील पुणे शहरातील गुन्ह्यांचा धावता आढावा

national forum Daily Crime Report 11-01-2023

आजचे पोलीस स्टेशन = कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, विमानतळ पोलीस स्टेशन, हडपसर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, कोथरूड पोलीस स्टेशन, बिबवेवाडी पोलीस स्टेशन

सामाजिक सुरक्षा विभागाचा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत पुनः छापा,
रात्री 10 नंतर कर्णकर्कश्य आवाजात सुरू असलेल्या रेस्टोबार वर कारवाई, पावणेदोन लाखाचा साऊंड सिस्टीम जप्त-
कोरेगाव पार्क/ पुणे/ सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचारी ऑल आऊट मोहिमे दरम्यान कोरेगाव पार्क भागात गस्त घालत असतांना, कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 वरील पब्लिक रेस्टोबार मध्ये कर्ण कर्कश्य आवाजात साऊंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे दिसून आले. या हॉटेलवर कारवाई करून त्यांच्याकडील 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करून हॉटेल मॅनेजर विरूद्ध पर्यावरण संरक्षण कायदयाअंतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार अजय राणे, अण्णा माने, इरफान पठाण, हणमंत कांबळे व इम्रान नदाफ या पथकाने केली आहे.

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील गुरूव्दारा कॉलनीत अडीज लाखाची घरफोडी
विमानतळ/पुणे/ विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील गुरूव्दारा कॉलनी येथे फिर्यादी मनिषकुमार प्रसाद वय 39 वर्ष यांचे राहते घर 26 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंत कुलूप लावुन बंद असतांना कुणीतरी अज्ञात चोरट्याने, घराचे कुलूप उचकटून बेडरूमच्या कपाटातील रोख 40 हजार रुपये व सोन्या चांदीचे एकुण 2 लाख 52 हजार 500 रुपयांचा ऐवज अज्ञात इसमाने घरफोडी करून चोरून नेला आहे. अज्ञात चोरट्याविरूद्ध भादवि कलम 454, 457 व 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक श्री. मोहन साळवी अधिक तपास करीत आहेत.

हडपसर मध्ये मंगळसुत्र हिसकाविले
हडपसर/पुणे/ हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील शंभु कलेक्शन डीपी रोड हडपसर व गोंधळेनगर येथे रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी महिला वय वर्ष 38 ह्या रस्त्याने पायी जात असतांना, अचानकपणे मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे तसेच इतर एक महिला साक्षीदार याचेंही गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र एकुण 55 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र जबरी चोरी करून नेला आहे. हडपसर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरूद्ध भादवि कलम 393 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे करीत आहेत.

शिवाजीनगर पोलीस हद्दीतील, सुर्यमुखी दत्तमंदिरातील दानपेटी फोडण्याचा दिवसा ढवळ्या प्रयत्न
शिवाजीनगर/ पुणे/ शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सेंन्ट्रल मॉल शेजारी गणेशखिंड रोड, शिरोळेवस्ती लगत असणारे सुर्यमुखी दत्त मंदिर कुलूप लावुन बंद होते. तथापी या बंद असलेल्या दत्तमंदिरात दोन अनोळखी इसमांनी मंदिराचे दरवाजे तोडून दिवसा- ढवळ्या मंदिराच्या गाभाऱ्यातील लाल रंगाची लोखंडी दानपेटी कटावणीच्या व लोखंडी रॉडच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत निरंजन ढोके वय 37 वर्ष रा. नवी सांगवी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दोन अनोळखी इसमांवर भादवि कलम 457, 380, 511 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक श्री. विजय पानकर अधिक तपास करीत आहेत.

चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत दोन्ही ठिकाणी दे दणादण
चतुश्रृंगी/ पुणे/ चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत दोन ठिकाणी जबरी हाणामारी झाली आहे. त्यात परियोगी प्लाझा सुतारवाडी पाषाण येथे एक इसम वय 56 वर्ष यांचे सेक्युरिटी सर्व्हिसचे कार्यालय आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन इसमांनी कार्यालयात घुसून फिर्यादी यांच्या कामगारांना लोखंडी सत्तुरोन मारून त्यांना जखमी केले आहे. तसेच कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून तुम्हाला मालिक कहाँ है, उसको मिलने को बोलो, उसको खतम करे देंगे, पुरा एजन्सी खतम कर देंगे आप कल यहाँ दिखना नही मंगता अशी धमकी दिली आहे. संबंधित तीन इसमाविरूद्ध चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे भादवि व महा. पो. का. तसेच आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार वाळके करीत आहेत.
तर दुसरी घटना सेंट्रल मॉलच्या बाजुला खैरेवाडी दत्त मंदिराजवळ रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यातील आरोपी 1. प्रशांत मुदगल वय 32 वर्ष 2. स्वप्नील मुदगल वय 29 वर्ष दोन्ही अटक व इतर दोन इसम हे हे शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेस खैरेवाडी दत्तमंदिराजवळ अडवुन, तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे असे म्हटल्याने, त्यास फिर्यादी महिलेन नकार दिल्यानंतर, संबधित आरोपींनी महिलेच्या घरात घुसून त्यांच्या पतीस शिवीगाळ व हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेच्या शेजारी राहणारे अमोल कदम यास आरोपी प्रशांत मुदगल याने कमरेला लावलेली तलवार बाहेर काढून ती उलटी त्यांच्या कंबरेवर मारून जखमी केले. तसेच हातातील तलवार हवेत फिरवुन मोठ मोठ्याने आरडा ओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली आहे. संबंधिक आरोपींविरूद्ध भादवी, महा.पो. का. तसेच आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलस उप निरीक्षक दत्ता नांगर करीत आहेत.

कोथरूड व बिबवेवाडीत पोलीस स्टेशन हद्दीत र्रश्श ड्रायव्हिंग, जागेवर दोन्ही मोटारसायकलस्वार ठार
कोथरूड व बिबवेवाडी/ कोथरूड व बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे भरधाव वेगाने वाहने चालवुन दोन्ही ठिकाणच्या मोटार सायकलवरील स्वार जागीच ठार झाले आहेत. पैकी कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील सुंदर नगरी सोसायटी समोरील रोडवर, गुजरात कॉलनी कोथरूड येथे मध्यरात्री 3 वाजता फिर्यादी अमित गायकवाड वय 32 यांचा भाऊ अनिक अशोक गायकवाड वय 25 वर्ष रा. संकुराज सोसायटी कोथरूड हे त्याच्या मित्राच्या मोटार सायकलवरून घरी येत असतांना गुजरात कॉलनी येथे कारवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहन वाहतुक नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगाने चालुवन अनिकेत गायकवाड याच्या गाडीस जोरात धडक मारून, गंभिर दुखापत करून त्याच्या मृत्यूस कारणीभुत झाला आहे. कारवरील अज्ञात इसमावर भादवी व मोटार वाहन कायदयानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कोथरूड पोलीस स्टेशन मधील सहायक पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
तर दुसरी घटना बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील महावीर मोटर्स गोडाऊन समारेल रोडवर बिबवेवाडी येथे भर दुपारी हृदयद्रावक घटना घडली आहे. विजय कुलकर्णी वय 68 वर्ष रा. येवलेवाडी कोंढवा यांनी फिर्याद दिली आहे की, यातील नमूद इसमाने त्याच्या ताब्यातील ट्रक हा वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने चालुन फिर्यादी श्री. विजय कुलकर्णी यांचा मुलगा पराग कुलकर्णी वय 35 यांचे मोटार सायकलला जबर ठोस मारून, गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्युस कारणीभुत झाला. अज्ञात आरोपीला अटक केली नसुन त्याच्या विरूद्ध बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे भादवी व मोव्हे.ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख अधिक तपास करीत आहेत.

स्वारगेट पोलीस स्टेशन येथे एस.टी. स्टँडवरील पारंपारीक चोरी
स्वारगेट/ पुणे/ स्वारगेट एस. टी. स्टँड वरील चोऱ्या अधिक वाढल्या आहेत. यातील फिर्यादी सुनिल साळवे वय 59 रा. येवलेवाडी हे स्वारगेट एस.टी. स्टँड येथुन म्हाडा गावी जाण्यास निघाले होते. दरम्यान एस.टी. मध्ये प्रवास करीत असतांना चढत असतांना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी श्री. साळवे यांच्या जवळील रोख 5 हजार रुपये व इतर महत्वाची कागदपत्रासंह दोन बँकेचे एटीएम कार्ड व त्याचा वापर करून अनुक्रमे 33 हजार व 40 हजार रुपये एकुण 78 हजार रुपये चोरी करून नेले आहेत. अज्ञात चोरट्याविरूद्ध भादवि 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विजय कुंभार करीत आहेत.
दि. 10 जानेवारी 2023 रोजी 24 वाजेपर्यंतचे दाखल गुन्ह्यांचा तपशील….