Thursday, December 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महानगरपालिकेचे मागील 15 वर्षांपासून जमा आणि खर्चाचे ऑडीट नाहीच… अनुभवी कर्मचाऱ्या अभावी, हिशोबाची विल्हेवाट

पुणे/दि/ प्रतिनिधी/National Forum
पुणे महानगरपालिकेने मागील 15 वर्षात जमा आणि खर्चाचे ऑडीट केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रजिस्टर नुसार जमा खर्च व बँक पास बुकानुसार जमा खर्चाचा ताळेबंद केला जात नसल्याचेही समोर आले आहे. मुळात एवढं किचकट काम करणारा अनुभवी अधिकारी कर्मचारी नसल्यामुळेच आजपर्यंत ऑडीट झाले नसल्याचेही समोर आले आहे. पुणे महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. कोणत्याही तक्रार अर्जांवर किंवा बातमीवर साधा विचारही केला जात नाही. अतिशय मनमानी पद्धतीने पुणे महापालिकेचा कारभार सुरू असल्याने या गंभिर विषयावर साधी चर्चा करण्यास देखील कुणी तयार नसल्याचे दिसून आले आहे.


पुणे महापालिकेत मुख्य लेखापाल व ऑडीट विभाग कार्यरत आहेत. परंतु दोन्ही खात्यात अनुभवी कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. वर्ग 3 चा कर्मचारी वर्ग एक मध्ये रातोरात मंत्रालयातून आदेश घेवून येत असतील तर अनुभवी कर्मचारी उपलब्ध होणार तरी कुठून हा प्रश्नच आहे. माहिती अधिकारांतर्गत महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 चे परिच्छेद 106 (1) (2) आणि प्रकरण 3 चा (2) नुसार मुख्य लेखापरिक्षकाने लेखा विभागाकडील सर्व जमा खर्चाचे हिशोब तपासून त्याबाबतचे आक्षेपार्ह बाबी व तफावती याबाबतचे तपासणी अहवालाच्या प्रतींची मागील 15 वर्षातील माहिती मागण्यात आली होती. तथापी सध्या पुणे महापालिकेकडे केवळ वार्षिक वृत्तांताच्या प्रती उपलब्ध असून, लेख्यातील आक्षेपार्ह बाबी व तफावतींची कुठेही नोंद ठेवली जात नसल्याचेही धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आयएएस व आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांएवढा रग्गड दोन अडीज लाख रुपये पगार घेणारे अधिकारी कर्मचारी ह्या नोंदी का ठेवत नाहीत याचाही तपास होणे आवश्यक आहे.
दरम्यान आक्षेपार्ह बाबी व तफावतींच्या नोंदी ठेवल्या नसल्यामुळे महापालिकेतील गलथान कारभार कोणत्या टोकाला पोहोचला आहे हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकात राहिली नाहीये.
दरम्यान या सर्व बाबींवरून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. पैकी

  1. मुख्य लेखापाल खात्यात आढळुन आलेल्या आक्षेपार्ह बाबींचा अहवाल स्थायी समितीस का सादर केला जात नाही.
  2. जर एकही चुक आढळुन आली नाही तर पुणे महापालिकेतील सर्व हिशोब बरोबर आहेत काय ते दाखवुन देण्यात यावे.
  3. ॲडव्हान्स डिपॉजिट रकमा प्रतिवर्षी वेळच्या वेळी जमा व खर्च झाल्या आहेत काय.
  4. कर्जरोखे, ठेवी या वरील व्याज वेळच्या वेळी आणि बरोबर मिळाले आहे काय … असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
    पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे, श्री. कुणाल खेमणार आणि श्री. ढाकणे हया गंभिर विषयाकडे लक्ष देणार आहेत की नाहीये असा सवाल पुणेकर व्यक्त करीत आहेत.