Thursday, July 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

नववर्षाचा पहिलाच दिवस- खून, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या,लुटालूटीचा…
वर्षाच्या शेवटच्या दिवशीही संपूर्ण शहरात हिंसाचार आणि लुटालुटीच्या घटना…

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय…. भाग – 2

नॅशनल फोरमची काल प्रसारित बातमी आणि चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया,
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, वशिल्याने आलेल्या पोलीसांमुळेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभिर झाला. …..

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुण्यात कोयता गँगची दहशत, विधीमंडळात कोयता गँगचा मुद्दा आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी मागील दीड वर्षात 700 पेक्षा अधिक गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध मोक्का व एमपीडीए ची कारवाई करून त्यांना तडीपार केल्याचा मुद्दा अधिक तापला आहे. 700 पेक्षा अधिक जणांविरूद्ध कारवाई करून देखील गुन्हेगारांमध्ये पोलीस आणि कायदयाचा धाक का राहिला नाही… पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे काय हा मुद्दा घेवून नॅशनल फोरमने काही प्रश्न उपस्थित करून त्याबाबतची बातमी प्रसारित केली आहे. त्यात राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुद्याला वेगळेच वळण दिले असून, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात वशिलेबाजीने झालेल्या पोलीसांच्या बदल्यांचा हा परिणाम असल्याचे नमूद केले आहे. तसेच ज्यावेळी पोलस अधिकारी वशिल्याने आणि ओळखीने येतात त्यावेळी ते आपली कामे व्यवस्थितरित्या केली काय अथवा न केली काय या मनःस्थितीत असतात असे विधान केले आहे. दरम्यान नवीन आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांनी पदभार घेवून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. असे असतांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खुन, हत्याकांड, दरोडा, घरफोड्या लुटालूटीची अनेक प्रकरणे घडली आहेत. तर वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर रोजीही हिंसाचार आणि लुटालुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने प्रसारित प्रेसनोट मधील पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यांच्या खालील काही नोंदी नमूद केल्या आहेत. परंतु ज्यांच्या हद्दीत मी स्वतः हैदोस, धिंगाणा पाहिला आहे, त्यांच्या हद्दीत आज दोन तारीख उजाडली तरी गुन्ह्यांची नोंद नाहीये. आज भाग दोन मध्ये पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे असे कोण म्हणेल ....(बातमी थोडी मोठी आहे, परंतु संपूर्ण वाचा)

पुण्यात भीमा कोरेगाव शौर्य दिनाची जय्यत तयारी आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमाने पुणेकर न्हाऊन निघाले होते. परंतु पुणे शहरात मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी खुन, हत्याकांड, जबरी चोरी, दरोडा, घरडफोड्यांचे सत्र सुरू होते. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 11 पोलीस स्टेशन हद्दीत खुन, दरोड्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पैकी, 

वारजे पोलीस स्टेशन, उत्तमनगर पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन-3, बंडगार्डन पोलीस स्टेशन-2, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, कोथरूड पो.स्टे, लोणीकंद 2 आदि पोलीस स्टेशन हद्दीत घटना घडल्या आहेत. गुन्ह्यांची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे-

सिंहगड रोड पोलीस स्टेशन –
सिंहगड येथे राहत्या घरावर सुमारे 23 लाख 53हजारांचा दरोड पडला आहे. फिर्यादी आशिष पासलकर वय 33 रा. गणेशनगर धायरी यांचा फ्लॅट कुलूप लावुन बंद असतांना आरोपी तीन अनोळखी इसमांनी घराचे कुलूप तोडून फिर्यादी व त्यांचा भाऊ अमित पासलकर यांच्या बेडरूम मधील वॉर्ड रोपचे दरवाजे उचकटून ड्रॉवर मधील 50 हजार रुपये व सोन्याचांदीचे असे एकुण 23 लाख 53 हजार 800 रुपयांचा ऐजव घरफोडी करून नेला आहे. आरोपींविरूद्ध भादवी 454,457, 380 व 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.

कोथरूड येथील रामबाग कॉलनीत 41 लाखांची घरफोडी –
कोथरूड येथील शिवसाई केसरी अपार्टमेंट मध्ये एका 79 वर्षाच्या फिर्यादीचे घर 13 ते 29 डिसेंबर 2022 रोजी कुलूपबंद असतांना, कुण्यातरी अज्ञात इसमाने राहत्या घराचे कुलूप तोडले. घरातील बेडरूम मधील कपाटातील दोन लाख रुपये रोख त्यात भारतीय व युरो चलनासह सोने व हिऱ्याचे दागिने असा एकुण 41 लाख 16 हजार 798 रुपये किंमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील करीत आहेत.

लोणीकंद पोलीस स्टेशन येथे चोरीच्या दोन घटना –
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत मयुर लोंढे वय 20 वर्ष हे पेरणे टोलनाका येथे आळंदी येथे जाण्यासाठी बस मध्ये चढत असतांना त्यांच्या खिशामध्ये ठेवलेली 33 हजार रुपये किंमतीचे सोन्याची चैन सोन्याचा बदाम, कोणतीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सेंगर करीत आहेत.
तर दुसरीही चोरीची घटना पेरणे टोल नाक्यावर घडली आहे. एक 27 वर्षाची महिला त्यांचे पतीसह येरवडा येथे जाण्यासाठी पेरणे टोलनाका येथे बसमध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने बसमधील गर्दीचा फायदा घेवून फिर्यादींच्या पर्समध्ये ठेवलेली 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन चोरी करून केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सांगडे करीत आहेत.

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीतही तीन घटना –
भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील टेल्को कॉलनी जवळ जांभुळवाडी रोडच्या बाजूला स्वाद हॉटेल येथे फिर्यादी महिला वय 57 या उभे असतांना, एक अनोळखी इसमाने लॉटेरी लागल्याचे सांगुन त्यांना हॉटेल स्वाद मध्ये घेवून जावुन बोलण्यात गुंतविले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या गळ्यातील 75 हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठन हातचलाखी करून काढुन घेवून दागिन्यांचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली आहे. सदरील फिर्यादी हा 40 ते 45 वर्षांचा असून, अंगाने मजबुत,रंगाने काळा सावळा, उंची अंदाजे 5 फुट 6 इंच, चेरा उभा, अंगामध्ये काळ्या रंगाचे जर्कींन, करड्या रंगाची जिन्स पँन्ट, पायात काळे बुट अशा वर्णानाचा असल्याचे नमूद केले आहे. यासह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत आणखी दोन घटना हृदयद्रावक घडलेल्या आहेत.

बंडगार्डन पोलीस स्टेशन –
ज्या पोलीस स्टेशन हद्दीत पुणे शहर पोलीस आयुक्तालय येते, त्याच बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बंडगार्डन मुख्य शाखेत रात्रौ दीड वाजता आरोपी स्वप्नील मारूती गायकवाड या 21 वर्षीय तरूणाने बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या मजल्यावरील नेटवर्क रूमचे मागील बाजूचे खिडीला लावलेले प्लायवुड तोडून, खिडकीतून प्रवेश करून कॅन्टीज मधील मॅनेजर रूमची कडी कोयंडा लोखंडी रॉडने उचकटून कपाटातील पाच हजार रुपये घरफोडी चोरी करून पळुन जातांना मिळून आला. त्याच्या विरूद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत शिरसाट वय 42 यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरूद्ध भादवी 457 व 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत बंडगार्डन पोलीस स्टेशन अंकित पुणे स्टेशन पोलीस चौकी समोरील रस्त्यावर आरोपी गणेश घाडगे वय 35 रा. जालना याने कोणत्यातरी कारणांवरून स्वतःचे गळ्यावर कशाचेतरी सहाय्याने वार करून, त्यात स्वतः गंभिर होवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरूद्ध सहा. पोलीस निरीक्षक श्री. दिपक बर्गे यांनी भादवी 309 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वारजे पोलीस स्टेशन –
वारजे पोलीस स्टेशन हद्दीत खुना गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी निहाल शिंदे, वय 25, अल्ताफ शेख वय 19 व इतर तीन यांनी रात्रौ दीड वाजण्याच्या सुमारास विठ्ठलनगर वारजे माळवाडी पुणे येथे फिर्यादी वीरफकीरा कांबळे वय 22 यांचा भाऊ भुमीपुत्र वय 20 हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबला असतांना आरोपी सदर ठिकाणी येऊन भुमीपुत्र यास शिवीगाळ केली. भांडणाचा राग मनांत धरून आरोपी व त्याच्या साथीदारांनी गैरकायदयाची मंडळी जमवुन भुमीपुत्र यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता व दगडाने हातावर, कमरेवर व चेहऱ्यावर वार करून त्यास गंभिर जखमी करून त्याचा खुन केला आहे. आरोपींविरूद्ध भादवी कलम 302 सह महापो.का.क तसेच आर्म ॲक्ट, क्रिमीनल लॉ अमेंन्डमेंट ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. बागवे करीत आहेत.

उत्तमनगर पोलीस स्टेशन –
उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत थर्टी फर्स्टच्या रात्रौ साडेबारा वाजता जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. फिर्यादी कार्तिक शर्मा वय 21 रा. मासेगाळी उत्तमनगर हे त्यांच्या घराच्या बाहेर उभे असतांना, आरोपी 1. गौरव धावडे वय 22 2. प्रसाद कोळी वय 22 घराजवळ येवून, तु काय मोठा भाई झालास का, डोळे फाडून काय बघतोस, तुघ्या एरीयात आलोय काय वाकडे करणार, असे म्हणून संगनमताने फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून हाताने मारहाण व दमदाटी करून, रस्त्यावरील फरशी कार्तिक शर्माच्या डोक्यात मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींविरूद्ध भादवी 307, 323 सह क्रिमिनल लॉ ॲमेन्डमेंट सह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सहा.पो. निरी. रोकडे करीत आहेत.

थोडक्यात संपूर्ण पुणे शहर थर्टी फर्स्टचे स्वागताने न्हाऊन निघाल्याच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुन्हेगारांनी गुन्ह्यांचा धडाका लावुन पुणे शहर पोलीसांना सलामी ठोकली आहे. हिंमत असेल तर पकडुन दाखवा, ओळखुन दाखवा असे एकप्रकारे आव्हानच दिले आहे. 

वर्षाच्या शेवटी -थर्टी फर्स्टच्या रात्रीही- गुन्ह्यांची मालिका कायम –
पुणेकर नागरीक नववर्षाच्या स्वागसाठी सज्ज असतांना, पुणे शहर पोलीस हद्दीत गुन्ह्यांची कुठेही कमतरता जाणवली नाही. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत दोन व त्याचे इतर साथीदारांनी फिर्यादी केदार कुंभार वय 18 वर्ष याच्या डोक्यात कोयता मारून जखमी केले आहे. अधिक तपास सहा. पो. निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत. तर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील धानोरी येथील खदानी समोर मध्यरात्रौ साडेकराच्या सुमारास मोटारसायकल वरील दोन अनोळखी इमसांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवुन त्यांच्या हातातील 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले आहे. एका 59 वर्षाच्या प्रोढाने फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक एस.एस. गेंड अधिक तपास करीत आहेत.
चतुश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतही जीवे ठार मारण्याचा प्रकार समोर आला असून, एक 30 वर्षांची विवाहित महिला रा. गणेशखिंड रोड खैरेवाडी येथे थर्टीफर्स्ट च्या मध्यरात्रौ पावणेतीन वाजता घराच्या बाहेर पती व मैत्रिणीसह गप्पा मारत थांबले होते. मोटारसायकल वरून तीन अनोळखी इसमांनी संबंधित फिर्यादी महिलेच्या पाठीवर फटका मारून त्यांच्या मनांस लज्जा उत्पन्न केली. फिर्यादी व पती हे घाबरून तेथून निघुन जात असतांना अनोळखी इसमांनी थांब तुला मारून टाकतो अशी धमकी देवून फिर्यादी महिलेच्या डोक्यावर फटका मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक झरेकर अधिक तपास करीत आहेत.
कोथरूड येथे 25 हजाराची जबरी चोरी –
कोथरूड येथील पॅन्टालुन्स मॉल समोरील पदपथावर एक 25 वर्षाचा युवक घरी जात असतांना, समोरून मोटारसायकलवरून चार अनोळखी इसमांनी फिर्यादीजवळ येवुन त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्याकडील लॅपटॉपची बॅग हिसकावुन घेत होते. तथापी फिर्यादी हे पळत असतांना अनोळखी इमसांनी कोयत्याने तीनचार वेळेस मारण्याचा प्रयत्न केला. परंतु वार चुकवित पळत असतांना लॅपटॉप असल्याने वार बॅगेवर बसला. त्यानंतर फिर्यादी हे अटकाव करीत असतांना त्यांच्याकडील बॅगेसह 25 हजार रुपयांचा ऐवज जबरी चोरी करून नेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी करीत आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस हद्दीत मंगळसुत्र चोरी –
एक 52 वर्षांची महिला नवले ब्रिज कडून कात्रजकडे पायी जात असतांना शोगीनी कंपनीच्या नाल्यावर मोटार सायकलवरील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ येवून त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र जबरी चोरी करून नेला. अधिक तपास पो. उप निरीक्षक वर्षा घोगरे करीत आहेत.
खडकी पोलीस स्टेशन येथे दोन लाखांच जबरी चोरी –
वाकडेवारी एस.टी. स्टँड येथे एक 70 वर्षीय महिला कोंढवा जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या असतांना, दोन अनोळखी इसमांनी त्यांना बोलण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व मोबाईल असा एकुण 2 लाख एक हजार रुपयांचा ऐजव चोरी करून नेला आहे.
चंदननगर, चतुश्रृंगी हद्दीतील अशाच घटना घडल्या आहेत. तसेच थर्डी फस्टच्या रात्रौ कोंढवा, बिबवेवाडी तसेच कोरेगाव पार्क, विमानतळ हद्दीत अक्षरशः हैदोस सुरू होता. परंतु आज दोन तारीख उजाडली परंतु हैदोस घालणाऱ्यांवर कारवाईची एक ओळही बातमी आली नाही हे विशेष म्हणावे लागेल.
आता सांगा, पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था कुठे आढळुन येते. पुणे शहराचा बिहार आणि उत्तर भारत करण्यात पोलीसांना जबरी यश प्राप्त झाले आहे असेच म्हणावे लागेल काय…