Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेने लाडावुन ठेवलेल्या …..क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना पगारच नाही,

पुणे/दि/ नॅशनल फोरम प्रतिनिधी/
पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना मागील चार महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीये. महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्यान, पाणी टाकी व कार्यालये येथे कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. सुमारे 32 कोटी रुपयांचे हे कंत्राट मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. ही कंपनी भारतीय जनता पार्टीच्या बड्या नेत्याची असून केवळ दबावापोटी महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने या कपंनीचा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप प्रस्ताव मंजुरीच्यावेळी विरोधकांकडून करण्यात आला होता.


या कंपनीच्या मार्फत 1500 कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कंपनीकडून सुरक्षा रक्षकांना वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र कराराचे उल्लंघन होत असून सुरक्षा रक्षकांना वेतन मिळण्याची चार पाच महिने वाट पहावी लागत आहे.
दरम्यान पुणे महापालिकेने केवळ एप्रिल व मे महिन्याचा पगार थकविल्याने त्यांच्यावर कारवाईची नोटीस महापालिकेने बजाविली असली तरी जानेवारी पासून पगार नसल्याचे म्हणणे कंत्राटी कामगारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान 25 जून पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील असे सांगितले होते. तथापी जून महिना संपला तरी सुरक्षा रक्षकांना पगार मिळाला नाही. त्यामुळे क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस या कंपनीचे लाड पुरविण्याचे उद्योग पुणे महापालिकेने बंद करून नियम व अटींचे उल्लंघन करणाऱ्या कंपनी विरूद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी कंत्राटी कामगारांकडून केली जात आहे. या
या कंपनीचे मॅनेजर श्री. काळे हे सतत मदयाच्या आहारी असून, कामगारांचे पगारासाठी फोन आल्यानंतर ते घेत नाहीत. अरेरावीची भाषा वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे. पगार नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हात उसने पैसे देखील कुणी देत नसल्याचेही अनेकांनी नॅशनल फोरमला सांगितले आहे.