Wednesday, February 8 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बेकायदेशिर डे-नाईट पब, क्लब वर फौजदारी कारवाई करून जागा सिल करण्याऐवजी… ढाणढाण वाजणाऱ्या साऊंड सिस्टिमवर कारवाई करून, सामाजिक सुरक्षा विभागाने भिकार कारवाईचा कळस गाठला

Criminal action against illegal day-night pubs, clubs pune

पुणे/दि/ नॅशनल फोरम/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीसांचे आहे. तसचं कायदा आणि सुव्यवस्था मोडीत काढण्याचे, विस्कळीत करण्याचे काम गुन्हेगार करीत आहेत. जर कायदा मोडणाऱ्या गुन्हेगारांच्या तालावर पुण्यातील पोलीस मायकल जॅक्सन सारखा डान्स करीत असतील तर, गुन्हेगारांवर पोलीसांची दहशत राहणार तरी कशी…. गुंडगिरी, दादागिरी करणाऱ्यांवर पोलीसांचा वचक राहणार तरी कसा… आज पुणे शहरातील 32 पोलीस स्टेशन हद्दीत रोजचे रोज गुन्हेगारी टोळ्यांकडून दंगली घडविल्या जात आहेत… खुन, हत्याकांड घडत आहेत… त्यावर कुणाचेच लक्ष नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी जर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने राजकीय पुढाऱ्यांसारखे भाषणे ठोकत असतील, कनिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हेगारांच्या तालावर ठेका धरत असतील तर सर्वसामान्य पुणेकरांनी दाद मागायची तरी कुठे हा प्रश्नच आहे.

 पुणे शहरात 20 वर्षापूर्वी 35 गुन्हेगारी टोळ्या सक्रीय असल्याची पोलीसांची गुप्तनोंद होती. आता बीस साल बाद सुमारे 250 पेक्षा अधिक गुन्हेगार टोळ्या सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी जमिनीचा कब्जा घेणे, कब्जा सोडविणे, मोठ्या व्यापाऱ्यांची वसुली करणे, दुकानदारांची वसुली करणे, खंडणी वसुल करणे अशी कामे केली जात होती. आता याच गुन्हेगारांकडून त्यांचे आर्थिक मार्ग बदलले असून, आता पुणे शहरात दौलत ज्यादा करणाऱ्यांच्या खिशावर थेट दरोडा टाकत आहेत.

यामध्ये मोठ्या टोळ्या व भांडवलदार एकत्र येऊन त्यांनी डे- नाईट पब, क्लब, हुक्का पार्लर सारखे पंचतारांकित धंदे सुरू केले. पब आणि क्लब मध्ये प्रवेश फी 5000 (पाच हजार रुपये) असते. त्यानंतर मदय,मटणमांस, अंमली पदार्थ यांची रेलचेल आणि त्यांचे दरही मोठ मोठे असतात. महिला आणि लहान मुलींची तस्करी, वेश्याव्यवसाय अर्थात चमडा बाजाराने तर 2000 (दोन हजार) कोटींचा टप्पा पार केला असल्याचे वाचनात आहे. त्या खालोखालच्या गुन्हेगार आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन देशी विदेशी मदयांची तस्करी करून, ढाबे आणि डान्सबार सुरू केले. त्याच बरोबरीने मेफेड्रोन सारखे वेगवेगळे अमंली पदार्थांची तस्करी केली. त्याही खालोखाल असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांनी मटका, जुगार अड्डे, रमीचे क्लब, सोरट, ऑनलाईन लॉटरी सारखे धंदे सुरू केले. त्याच बरोबरीने पुणे शहरातील एकन्‌‍एक गल्ली बोळात खाजगी सावकार निर्माण झाले. कायदा आणि सुव्यस्थेला आव्हान देता येईल इतके बेकायदेशिर गैरकृत्य आजही पुणे शहरात सुरूच आहे. या सर्व बेकायदेशिर व्यवहारातून गुन्हेगारांचे आर्थिक बळ वाढले आहे. पन्नास/ पन्नास लाख, एक कोटींची चार चाकी वाहने घेवून आज ती मंडळी मिरवित आहेत. आज पुणे शहरात तर खाजगी सावकारीचा स्फोट झाला आहे. 

आज या धंदयात 15 ते 25 या वयोगटातील तरूण - तरूणी गुन्हेगारांच्या रडावर आहेत. त्या फरासखाना लॉकअप पासून शिवाजीनगर कोर्टापर्यंत सगळे गुन्हेगार हे ओठावर मिसरूड देखील फुटलेले नाही असे पकडून आणलेले असतात. यावरून लक्षात येते गुन्हेगारीची पाळेमुळे कुठपर्यंत पोहोचली आहे.... बेकायदेशिर आणि गैरकृत्याच्या कामांमध्ये याच वयोगटातील मुलांचा वापर केला जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जेवढे कायदे अस्तित्वात आहेत, त्या सर्व कायदयांना गुन्हेगारांनी आव्हान दिले आहे. पोलीस नियमावली भाग 1 आणि 2 चे वाचन, प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये केले तर सगळ्याच पोलीसांना आपले अधिकार आणि कर्तव्य काय आहेत....सध्या आपण काय करीत आहोत याचे आकलन होण्यास मदत होईल. आता मराठीत देखील पोलीस नियमावली उपलब्ध आहे. त्याचे वाचन आणि प्रचलित आयपीसी, सीआरपीसी,मुंपोअ चे नियमित वाचन व दवंडी प्रत्येक चौकात केली तर सर्वसामान्य पुणेकर देखील पोलीसांच्या मदतीला येतील. परंतु नागरीकात जागृतीच नको आहे. त्यामुळेच सगळे अवैध व बेकायदेशिर घडत आहे. 

सामाजिक सुरक्षा विभागाने भिकार कारवाईचा कळस गाठला-
पुणे शहरातील 32 पोलीस स्टेशनला त्यांचे मर्यादित क्षेत्रफळाचे अधिकार आहेत. गुन्हे शाखांना सहा / सहा पोलीस स्टेशनचे मर्यादित अधिकार आहेत. अंमली पदार्थ आणि सामाजिक सुरक्षा विभागांना मात्र थेट मिनी पोलीस आयुक्तांसारखे अधिकार आहेत. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा ही एकमेव सिंगल शाखा आहे. संपूर्ण पुणे शहरात एकच शाखा असल्याने निर्णय घेण्याचे सर्व अधिकार वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना आहेत. त्यामुळेच सामाजिक सुरक्षा विभागाचा दबदबा आहे. मागच्या 10/ 20 वर्षात एक श्री. भानुदास बर्गे व दुसरे श्री. राजेश पुराणिक यांनीच या पदाचा अधिकार वापरून गुन्हेगारांच्या आर्थिक मिळकतीवर हातोडा मारला होता. आता श्री. कुंभार हे वरीष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा कारभार म्हणजे, गुन्हेगारांना गालगुच्छा आणि सामाजिक कार्यकर्त्यांना कागदावर मारायचा टोच्या असंच यांच वर्तन असल्याचे मी स्वतः पाहिलं आहे.

कारवाईचे मच्छीमारी प्रकल्प –
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने सध्या पुराणिक स्टाईलने कारभार सुरू केला असला तरी तो मासळी बाजार किंवा मच्छीमारांसारखे जाळं टाकण्यासारखे काम आहे. मागील दोन आठवड्यात सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. परंतु कागदी कारवाईच्या (बेकायदेशिर धंदे सुरू असल्याने) पुढे त्यांचा वकुबच जात नसल्याचे दिसून येत आहे.
बेकायदेशिर डे-नाईट पब, क्लब वर कारवाई करण्याऐवजी… ढाणढाण वाजणाऱ्या साऊंड सिस्टिमवर कारवाई….
मागील दहा दिवसात सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडुन 1 ) कोंढवा परिसरातील सिल्व्हर स्पुन हॉटेल 2) विमानतळ परिसरातील 3 मस्कटेअर्स 3) कोरेगाव पार्क परिसरातील कोरा कॉकटेल बार ॲण्ड किचन 4) बंडगार्डन परीसरातील (राजाबहादुर मिल) मिलर्स लवहारी क्लब 5)वन-8 कम्युनवार 6) कोरेगाव पार्क परिसरातील पब्लीक रेस्टॉरंट ॲण्ड बार अशा एकुण 06 हॉटेलवर कारवाई करुन एकुण 11,39,000 /- रु किंचे साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आले आहेत.
तसेच काल परवा कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल / पब मध्ये रात्री साउंड सिस्टीम वर मोठयाने संगीत वाजवले जात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने दि. 23/11/2022 रोजी रात्री 22/19 वा पब्लीक हॉटेल येथे कारवाई करून 02,70,000/- रू किचे (दोन लाख सत्तर हजार ) किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन, यात पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन 2000) अधिनियम अन्वये कारवाई करून ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.

या सर्व कारवाचा सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व अमित जमदाडे या पथकाने केली आहे. तथापी याच विभागात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार श्री. प्रमोद मोहिते हे हॉटेल असो की, मटका जुगार अड्डा... या ठिकाणी जेवढी रक्कम मिळेल तेवढी जप्त करतात. परंतु.. रेकॉर्डवर मात्र तेवढी रक्कम दाखवित नाहीत असा त्यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे. 
दरम्यान मुळात डे - नाईट पब, क्लब यांना शासनाच्या कोणत्याही विभागाने परवानी दिलेली नाही. राजा बहाद्दुर मिल बंडगार्डन, हॉटेल ला मेरिडन लगत एकुण 8 पब दिवस- रात्र ढाणढाण वाजत असतात. शेजारी झोपडपट्टी व चाळी आहेत. येथील विद्यार्थ्यांना रोजच त्रास होत आहे. अनेक तक्रारी आल्या परंतु कारवाई कधीच झाली नाही. राजा बहाद्दुर मिल येथील 8 पैकी केवळ दोनच 1) 8 कम्युन बार व 2) मिलर्स लक्झरी क्लव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. क्लब नमुद करून त्यांना हॉटेल संबोधण्यात आले आहे. यावरून लक्षात येते की, हॉटेलच्या नावाखाली पब सुरू आहेत. त्यांना देखील क्लब म्हणून पोलीसांनी नोंद करणे म्हणजे गुन्हेगारांना निव्वळ मोकळे सोडले आहे असेच म्हणावे लागेल. 
थोडक्यात पोलीसच जर गुन्हेगारांना आर्थिक बळ देत असतील, त्यांचे संरक्षण करीत असतील तर गुन्हेगारांवर पोलीसांची दहशत कशी निर्माण होणार हा प्रश्नच आहे. पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शनपर भाषण म्हणजे राजकीय पुढाऱ्यांसारखे झाले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने निदान पोलीस आयुक्तांच्या आदेशाला तरी केराची टोपली दाखवु नये एवढी अपेक्षा आहे.