Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

राज्याचे गृहमंत्री महोदय, पुण्यातील गुटखा विक्रीकडे लक्ष देतील काय…
सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील पान टपरी,चहा टपरीसह किराणामाल दुकानदार धर्म संकटात
पोलिसांनी गुटखा विक्रीचा हप्ता वाढवून मागितला …आता दुप्पट द्यावे लागणार, नाहीतर कारवाई करण्याची धमकी?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्यात गुटखाबंदी करून दहा पंधरा वर्ष उलटून गेले तरी पुण्यात गुटखा बंदी असल्याचे कुठे जाणवत नाही. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदी ही केवळ सरकारी कागदांवर असून, ती प्रत्यक्षात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक सामजिक कार्यकर्ते व संस्था गुटख्याबाबत तक्रार करीत आहेत. परंतु कारवाई होत नाही. मध्यंतरी कोंढवा व वानवडी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गुटख्याची तक्रार केली तर त्यांच्या विरूद्ध मागाहून खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. थोडक्यात गुटखा बंदी आहे, परंतु ती केवळ कागदावर आहे हेच दाखवुन दिले आहे. सामाजिक कार्यकर्ते मात्र हकनाक कोर्टाच्या तारीख पे तारीख च्या जाळ्यात अडकले केले आहेत.

दरम्यान सहकारनगर पोलीस स्टेशन मधील काही प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील किराणा माल दुकानदार, चहाची टपरी व पानाची टपरी चालक सध्या मोठ्या आर्थिक आणि धर्म संकटात पडल्याची अवस्था दिसून येत आहे . सहकार नगर पोलीस स्टेशन हद्दीतील या टपरी व किराणा दुकानातून गुटखा विक्री होत असल्याने ज्या दुकानांना व टपरीला दोन ते अडीच हजार रुपये हप्ता द्यावा लागत होता आता त्याच ठिकाणी त्यांना दुप्पट रक्कम देण्याबाबत सहकार नगर पोलीस स्टेशनचे गैरमहसुली अंमलदाराने फर्मान काढले आहे असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे सर्व किराणा माल दुकानदार, टपरी चालक हवालदिल झाले आहेत. दरम्यान महागाई वाढली आहे, दुकानामध्ये ग्राहक कमी येत आहेत, त्यामुळे रकमा वाढवुन देणे शक्य होणार नाही म्हणून अनेकांनी गळे काढले असल्याचे समजते.

सहकारनगर, भारती विद्यापीठ व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतमध्ये मागील काही वर्षात गुन्हेगारी प्रचंड वेगाने वाढलेली आहे. गुन्हेगारांची संख्या वाढली, गुन्हेगारी टोळ्यांची देखील संख्या वाढत चाललेली आहे. सहकारनगर व भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही महिन्यात वाहनांची तोडफोड, जाळपोळ असे प्रकार घडले आहेत. स्वतःचे गुन्हेगारी वर्चस्व ठेवण्यासाठीच हे प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. याच गुन्हेगारांच्या राडा प्रकरणांमुळे सहकारनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली  व  निलंबन झालेले आहे. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी कठोर कारवाई करून देखील सहकारनगर व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या कारभारामध्ये तसा काही फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे. 

तसेच हद्दीमध्ये अनेक प्रकारचे अवैद्य व बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या संख्येने केले जात असल्याचे दिसते.  मटका जुगार अड्डे,  रमीचे क्लब,  हातभट्टीची, विक्री, देशी-विदेशी दारूची विनापरवाना विक्री, ऑनलाइन लॉटरी, तथाकथित सरकारमान्य व्हिडिओ गेम पार्लर,  मसाज पार्लर, स्पा याच पेव फुटलेले आहे.  त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, मसाला सुपारी याची सर्रासपणे विक्री केली जात आहे.  या सर्व बाबी पोलिसांना माहिती असताना देखील त्याच्यावर कारवाई न करता उलट अशा बेकायदेशीर व गैरधंद्यांना अभय देऊन त्यांच्याकडून हप्ता वसुली केली जात असल्याचा प्रकार नुकताच समोर आलेला आहे.

 काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, सहकारनगर पोलीस स्टेशनह द्दीतील गैरधंदयाची वसुली करण्यासाठी गैरकायदयाची मंडळींना पोलीस स्टेशन मधील गैरमहसुली पोलीस अंमलदाराने अनेक झिरो पोलीस निर्माण केले असल्याचे समोर आलेले आहे. 

संबंधित गैरमहसुली पोलीस अंमलदारांनी नियुक्त केलेले अर्धा डझन झिरो पोलीस यांच्याद्वारे संबंधित गुटखा, पान मसाला यांची विक्री करणाऱ्यांकडून हप्ते वसूल केले जात आहेत . गैरवसुलीची भली मोठी यादी असून त्यांची संख्या सुमारे 200 ते 250 टपरी व किरण मालाची दुकाने असल्याचे सांगितले जाते.  या सर्व ठिकाणातून दरमहा मोठी कमाई होत असल्याने या भागात दिवसेंदिवस बेकायदेशीर व गैरधंदे अधिक वाढत आहेत.  यासर्व अवैद्य व बेकायदेशीर धंद्यामध्ये गुन्हेगारी इसमांचे आर्थिक हितसंबंध निर्माण झालेले असल्याने स्पर्धा अधिक वाढत आहे.  

गुन्हेगार आपसापसामध्ये हल्ले करीत आहेत, यामुळे लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतही कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्हे विषय घटना घडत आहेत.  पोलिसांनीच गैर कायद्याची मंडळी एकत्र करून अशाप्रकारे बेकायदेशीर व गैर कायद्याची कामे करून घेतली जात आहेत असे दिसून येत आहे.  तरी या सर्व प्रकारावर राज्याचे पोलीस महासंचालक व गृहमंत्रालयाने अधिक लक्ष देण्याची मागणी नऱ्हे आंबेगाव व सहकारनगरातील सामाजिक संस्थांनी केली आहे.