Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

शिवाजीनगर पाठोपाठ फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतही सरकारमान्य लॉटरी आणि व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू

फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतही सरकारमान्य लॉटरी आणि व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पोलीस उपाआयुक्त परिमंडळ एक कार्यालयालयाच्या हद्दीतील पोलीस स्टेशनला जुगार अड्डयांचे ग्रहण लागले आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन पाठोपाठ आता फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तमंदिर बुधवार पेठेत सरकारमान्य लॉटरी व सरकारमान्य व्हिडीओ गेमच्या नावाखाली जुगार अड्डे सुरू असल्याचे दिसून आले आहे. दिवाळीच्या आगमन 10 दिवसांवर आले आहे, त्यामुळे या काळात जनतेची होणारी लुट थांबविण्यासाठी जुगार अड्डयांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्डयांबाबत मागील पाच दिवसांपासून पाठपुरावा करून बातमी प्रसारित केल्यानंतर, काल दि. 7 ऑक्टोंबर पासून या भागातील सर्वच प्रकारचे जुगार अड्डे बंद करण्यात आले आहेत. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने व दोन पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह 20 ते 22 पोलीसांनी संपूर्ण भागात पेट्रोलिंग केल्याने, धंदे काल संपूर्ण दिवसभर बंद होते. यासाठीच सकाळी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील पोलीसांच्या भेटी घेवून पुढे जात असतांना, शिवाजीनगर कोर्टाजवळ साईबाबा लॉटरी व जयमाता दी ऑनलाईन लॉटरी जुगार अड्डे दुकान सुरू असल्याचे दिसून आले आहे. तसेच भैय्यावाडी येथे देखिल वाहन पार्कींग मध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यावरून दिसून येते की, पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना, अवैध व बेकादेशिर धंदे बंद ठेवले जातात. तथापी ते पुनः सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत, त्या सर्व जागा सील करून जागा मालक व धंदयाच्या मालकांविरूद्ध कठोर कारवाईची मागणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे लेखी स्वरूपात केली आहे. 

शिवाजीनगरहून पुढे जात असतांना शनिवारवाडा ते फरारखान्यापर्यंत वाहनांची तुडूंब गर्दी असल्याने, गर्दीतूनच दगडुशेट गणपती मार्गे वाहनातून पुढे जात असतांना, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत भर रस्त्यावरच सरकारमान्य व्हिडीओ गेम पार्लर मध्ये पैसे लावुन जुगार सुरू असल्याचे दिसून आले आहे. दत्तमंदिर चौकात एकुण पाच दुकानांतून सरकारमान्य व्हिडीओ गेम व लॉटरी सुरू असल्याचे तसेच पणती पाकोळी सारखे जुगार सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे फरासखाना पोलीस स्टेशनने देखील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आदर्श ठेवून गुन्हेगारांना रान मोकळे करून दिले आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. 

दत्त मंदिर बुधवार पेठ मार्गे, पासोड्या विठोबाकडे येत असतांना सार्वजनिक मुतारीजवळील ढमढेरे गल्लीत मटक्याच्या चिठ्ठयांचा बाजार भरला असल्याचे आढळुन आले आहे. दगडू नावाचा अनोळखी इसम हा चिठ्याचपाट्याचा उद्योग करीत असल्याचे दिसून आले आहे. 

दरम्यान एका पोलीस स्टेशनने सुरूवात केल्यानंतर, त्याचे लोण संपूर्ण परिमंडळ एक मध्ये पसरत चालले आहे. तथापी या सर्व घडामोडीमध्ये एकेकाळात परिमंडळ एक मधील सिंडीकेट मध्ये कार्यरत असलेले एक दोन पोलीस जाणिवपूर्वक अवैध धंदेवाल्यांना उचकावित असून, जाणिपूर्वक खात्याची बदनामी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही पोलीस स्टेशन हद्दीत त्याची मोठी वसुली मोहिम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कठोर कारवाई करून, हद्दीतील घुसखोरांना हद्दीबाहेर काढणे आवश्यक ठरत आहे.