Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गुजरातमधील ३० हजार कोटींच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राची बदनामी

मुंबई/दि/
गुजरातमध्ये मुंद्रा बंदरावर सापडलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जवरून लक्ष हटवण्यासाठी २ ग्रॅम, ५ ग्रॅम ड्रग्जची जास्त चर्चा करत महाराष्ट्राची बदनामी केंद्राकडून केली जात आहे, अशा शब्दात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला आहे, तर त्याला पकडणारा अधिकारी कायद्याविरोधात काम केल्याने कोर्टकचेर्या करत आहे, असे म्हणत भुजबळांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला. ते पुण्यात बोलत होते.


गुजरातमधील मुंद्रा बंदरावर ३० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. ते कुणी आणले, कुठून आणले, का आणले याची काही चौकशी नाही. दुसरीकडे २ ग्रॅम सापडले, ५ ग्रॅम सापडले असे करत सर्वांचं लक्ष ३० हजार कोटीच्या ड्रग्जवरून हटवून महाराष्ट्रावर आणले जात आहे. न्यायालयाने हे सर्व ऐकून निर्णय दिला आहे. आता आर्यन खानला जामीन मिळाला आणि पकडणारा अधिकारी कायद्याविरोधी काम केल्याने कोर्टकचेर्या करत आहे.
भाजप विरोधी सरकार असलेल्या राज्यांमध्ये तपास यंत्रणांचा अतिरेक
मागील १५ दिवसांच्या गोष्टी पाहिल्या तर भारत सरकारच्या तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजप विरोधी सरकारं जिथं आहेत तिथं तिथं अतिरेक करत आहेत. त्यामुळेच या सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी चुकीचं काम करत आहेत आणि जनतेला त्रास देत आहेत हे समोर येतंय. भाजप सरकार महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करत आहे. लोकांना त्रास देत आहे. हे सर्व उघड करण्याचं काम नवाब मलिक यांनी केले आहे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.