Monday, August 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

समर्थ वाहतुक पोलीसांची हद्द म्हणजे दिवसा ढवळ्या लुटमारी, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश पुराणिकांची दादागिरी, व्यवसायिकाला डांबून केली मारहाण

पुणे/दि/ प्रतिनिधी/
शहरातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकाने कार्यालयातच एका व्यवसायिकाला ( इंटेरिअर डेकोरेट) डांबून ठेवत मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी समर्थ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्याविरूद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक रामनिवास ओझा यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. निरीक्षकाच्या घरातील इंटेरिअर डेकोरेशनचे काम व्यवस्थित केले नाही, असे म्हणत दिलेले पैसे परत मागण्यात आल्याच्या कारणातून हा प्रकार घडला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या नाना पेठ परिसरातील घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम कार्तिक ओझा यांनी घेतले होते. कामाचे कोटेशन पुराणिक यांना देउन कार्तिक यांनी कामाला सुरूवात केली. त्यांच्या घराचे अंतर्गत डिझाईनचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले. त्यावेळी कार्तिक यांनी पुढील कामासाठी आणि कामगारांचे पगार देण्यासाठी पुराणिक यांच्याकडे राहिलेल्या पैशांची मागणी केली. मात्र, कामामध्ये चुका काढून पुराणिक यांनी पैसे देणार नाही असे सांगत कर्तिक यांच्याकडेच पैशाची मागणी केली.
त्यातूनच पुराणीक यांनी कार्तिक यांना समर्थ वाहतूक विभागात सगळी कागदपत्रे घेऊन बोलवले. तेथे पैसे दिले नाहीत म्हणून त्यांना बुटाने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या कानपटीला बंदुक लावली असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी कार्तिक यांच्या बहिणीने पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार अर्ज प्राप्त झाल्यावर तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे.
दरम्यान राजेश पुराणिक यांनी संपूर्ण लॉकडाऊन काळात केवळ वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचे काम केले आहे. समर्थ वाहतुक विभागाच्या हद्दीतील हॉटेल चालकांना कुठल्याही प्रकारचे नो पार्कींगचे बंधन ठेवले नाही. रेस्टॉरंट बार मध्ये येणार्‍यांच्या गाड्या कधीच उचलल्या गेल्या नाहीत. परंतु हॉस्पीटल, मेडीकल स्टोअर्स सारख्या ठिकाणाहून देखील अनेकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या उचलण्याचे शिवधनुष्य त्यांनी पार पाडले आहे.


एखाद्या टेम्पोत दुध घेवून चालले असता, आंबे घेवून चालले असता, त्या टेम्पोचालकाला थांबवुन, लायसन दाखव, पियुसी दाखव, गाडीची कागदपत्रे दाखव, गाडीला हेड लाईट नाही, साईड आरसा नाही, या सारख्या ना ना तर्‍हेच्या बाबी मागुन, पुनः वाहतुक करण्याचा परवाना आहे काय याचीही परवानगी मागुणन अखेरीस त्याच्यावर पाच दहा हजाराचे नियमानुसार बोजा टाकुन सरतेशवटी पाच हजार रुपयात तोडपाणी करायची आणि गाडीतील आंबे, दुधाच्या पिशव्यांवर हात मारण्याचे कामही पुराणिक सातत्याने करीत असतात. पैसे देवून खरेदी करण्याचे नाव पुराणिकांना माहिती नाही. याबाबत पूर्वीच अनेक वृत्तपत्रात याबाबतच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. समर्थ वाहतुक विभागातील पोलीस देखील वैतागुन गेले आहेत. आता तर बंदुकीचा धाक दाखवुन केलेल्या कामाचे पैसेही न देता त्याला मारहाण करणे, बंदुक उगारणे धोकादायक म्हणावे लागेल. समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता पुढे काय होते ते पहायचे आहे.
रास्तापेठेतील समर्थ वाहतुक विभागाच्या कार्यालयापासून जाणे बहुतांश व्यापारी व नागरीक जाण्याचे टाळत आहेत. इतकी भयंकर लुटच्या अनेक कहाण्या बाहेर येत आहेत.