Tuesday, January 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पोलीसवाल्या, सायकलवाल्या, बिरेक लाऊन थांब्ब , टोपी तुझी तर हातात माझ्या, व्हईल कस्सं रं काम …? जाऊया डबलशिट रं लांब लांब…लॉंब…वसुली करूया लांब लांब… लॉंब…

पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
दरवर्षी डिसेंबर महिना उजडला की, पुणे शहर पोलीसांना बदलीचे वेध लागु लागतात. अमुकच एक पोलीस स्टेशन पाहिजे म्हणून पुण्यापासून मुंबईपर्यंत अनेकांच्या वार्‍या सुरू होतात. मंत्री आणि पुढार्‍यांच्या पायर्‍या झिजवु लागतात. थोडक्यात क्रिम पोलीस स्टेशन मिळावे म्हणून अनेकजन धडपड करीत असतात. आज तीच धडपड पुणे शहरातील बहुतांश सगळ्या पोलीस स्टेशनसहित गुन्हे युनिट व आयुक्तालयातील वेगवेगळ्या सेल मध्ये सुरू आहे. चौकातील कट्टयावर थांबुन माझे पोलीस स्टेशन फिक्स झाले, आता बघा फरासखान्याला आलोच म्हणून समजा… येरवड्यात आलोच म्हणून समजा… अशा गप्पा आता सुरू झाल्या आहेत. खरंच, पुण्या मुंबईच्या वार्‍या करून मनासारखे पोलीस स्टेशन मिळते काय, हा प्रश्‍न सर्वसामान्य पुणेकरांप्रमाणेच मलाही पडला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीच आता या प्रश्‍नांची उत्तरे देणे संयुक्तिक ठरेल.


बरीचे महिने पुणे महापालिका आणि कोर्ट कामकाजाचे हौद उपसता उपसता वेळ गेला. लॉकडाऊन अशंतः उठल्यापासून तर पेंडींग कामाचे हौद किरकोळ उपसुन झाले, परंतु इतर विभागाकडे लक्ष देण्यास वेळच मिळाला नाही. परवा राजधानीतून एक दूत नरपतगिर चौकात भेटला. लक्ष्मीनारायणमध्ये चहा घेतल्यानंतर, बदलीचा विषय निघाला. भाऊ, सगळीकडं कैफ चढला आहे, थोड इकड लक्ष दया, किती दिवस दुसर्‍याची आम्ही भांडी घासायची… वगैरे चर्चा झाल्यानंतर, पुणे शहर पोलीस दलातील बदल्यांचा घोडेबाजार किती वेगात सुरू आहे याची कल्पना आली. २०१९ पूर्वी बदल्यांबाबत पोलीस आयुक्त कार्यालयाशी थेटच संपर्क ठेवून, बदलीबाबत वृत्तांकन केले जात होते. दोन वर्ष कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन मध्ये गेले. परंतु या काळात देखील अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले हा भाग वेगळा.
माझी बदली फिक्स फरासखान्यात… आता एक एकेला बघुन घेतो –
पुण्यात जवळपास बरीच पोलीस निवासस्थाने आहेत. सोमवार पेठ, खडक, स्वारगेट, नाना आदी ठिकाणी पोलीस लाईन असल्याने, बर्‍याचदा येणे जाणे होतेच. कालच सोमवार पेठ लाईनमध्ये गेलो असता, जिमजवळ एक टोणगा असुरी हास्य करून माझी बदली आता फिक्स झाली. फरासखान्यात मी आलोच म्हणून समज. आता बघ एक एकेला कस्सं बघुन घेतो. लय *** मस्ती आलीय. कशी *** करतो बघ, अशी फुशारकी मारणं सुरू होतं. आता हिवाळा सुरू आहे, त्यातच अंधार लवकरच पडत आहे. त्यामुळे कोण कुठं येत, जात याच्याकडे काहीच भान न ठेवता हा टोणगा फुशारी मारत होता. थोडक्यात काय तर, बदली कुठे होणार हे त्याला आधीच कसं समजलं आहे, कोणतं बळ वापरलं असेल, जेणेकरून बदली फिक्स झाली अस्सं ठासुन सांगत आहे.
एक एकेलाबघुन घेतो म्हणजे नेमकं काय… पोलीस आहे की लोफर गुंड. गुंडासारखी भाषा वापरतांना थोडीही पोलीस आयुक्तांची भिती वाटली नाही काय…. खरं तर मला प्रवास वर्णनाची बातमी करायची नाहीये तर ह्यांची मनोवृत्ती कशी झाली आहे हे पुणेकर नागरीक आणि चार सोडून ४०० पोलीसांपर्यंत पोहोचवायची आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये चारच बदनाम असतात, परंतु त्याचा फटका ४०० पोलीसांना बदनामीरूपी सहन करावा लागतो हे वास्तव आहे.
वसुली करूया लांब लांब… लॉंब…
पुणे शहर पोलीस दलात एक काळ असा होता की, वरीष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मर्जीखेरीज पोलीस स्टेशन मधील पान हलत नव्हते. आता मात्र सगळीकडे बेदिली माजली आहे. राजकीय पक्षांच्या आखाड्या सारखे पोलीसांत गट पडले आहेत की काय असे वाटत आहे. हा सत्ताधारी पक्षाचा हा विरोधी पक्षाचा, हा केंद्रातील पक्षाच्या बाजूचा असे सगळे गट सध्या दिसून येत आहेत. मी जॉईन सीपी गटाचा, मी ऍडीशन सीपी गटाचा असे प्रकार पाहून तर आश्यर्च वाटत आहे. ही कसली पद्धत. हा कसला कारभार सुरू आहे. अशा प्रकारची बेदिली, बेशिस्तपणा खात्यात नेमका का वाढला आहे याचे अवलोकन होणे आवश्यक आहे.
प्रत्येक पोलीस स्टेशन आणि आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे युनिट, सपोआ, परिमंडळ, ऍडीशनल या उतरंडीप्रमाणे सगळ्या कार्यालयांची रचना आहे. आज प्रत्येक कार्यालय स्वतःला मोठे समजत आहे. त्यामुळे जिकडे तिकडे वसुलदार पदाची चलती सुरू आहे. एवढंच कशाला पोलीस स्टेशन मधील डीबी युनिट, सामाजिक युनिट, कोर्टकामाज सारख्या ठिकाणीही वसुलदार या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. थोडक्यात मीच वसुलदार आता होणार ही अटकळ बांधून पुण्या मुंबईच्या फेर्‍या का वाढतात त्याचे हे कारण आहे.
गेली २६ वर्षे मी या विभागाचे कामकाज जवळुन पाहतोय. अस्सं कधीच नव्हतं. आज एवढी बेदिली माजली आहे याच भयंकर दुख सगळ्याच पुणेकरांना आहे. वरीष्ठ देखील अशा लोकांना कसे जवळ करतात हा देखील प्रश्‍नच आहे. खरं तर या विषयावर पुढे जावुन चर्चा होणारच आहे. तुर्तात इतकेच.