Tuesday, January 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुण्यात बेकायदा सावकारी करणार्‍यांचा उच्छाद, शस्त्रांचा धाक दाखविणे, घराचा ताबा घेणे, घरातील सदस्यांना धमकी देणे, रस्त्यात गाठून मारहाण करण्याच्या संख्येत झाली वाढ

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील काळ्या पैशांना बिल्डरांची साथ
पुण्यातील महत्वाच्या पेठा, बाणेर, खराडी, वाकड, कोंढवा, मगरपट्टा, नांदेड आदि ठिकाणच्या बांधकामात नेमका कुणाचा पैसा लावण्यात आला आहे…

मंजुर लेआऊट मधील ओपन स्पेस आणि ऍमिनिटी स्पेसवर धडाधड १० ते १२ मजल्याच्या इमारती उभ्या, पण कारवाईच्या नावाने शिमगा कशासाठी….

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊनचा संसर्ग अजून कमी झालेला नाही. लॉकडाऊन काळात संपूर्ण देशातील उद्योग धंदे बंदच होते. त्यामुळे साहजिकच मोठ्या उद्योगांवर अवलंबुन असलेले इतर उद्योग व्यापार पूर्णपणे ठप्प अवस्थेत होता. आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परंतु बंद पडलेला धंदा कसा सुरू करायचा या विवंचनेत असलेल्या गरजू नागरीकांनी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेवून आपला उद्योग व्यवसाय सुरू केला. परंतु नागरीकांच्या गरजेचा गैरफायदा घेवून, खाजगी सावकार अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करीत आहेत. व्याजाच्या वसूलीसाठी भर दिवसा चार पाच जणांचे टोळके हातात सत्तुर, लोखंडी रॉड घेवून कर्जदारांना अडविणे, धमक्या देणे, मारहाण करणे अशा प्रकारात वाढ झाली आहे. कधी कधी तर भर दिवसाच बंदूकीच्या नळकांड्या फुटत आहेत. अपार्टमेंट आणि झोपडपट्यांतून तर लोखंडी रॉडच्या रट्टयाने डोकी फुटून रक्तबंबाळ होत आहेत. काही ठिकाणी आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नेमकं कुठे बसली आहे, त्याचा शोध पुण्यात घेण्याची वेळ आली आहे. शंभरावर मोक्का लावणार्‍यांना खाजगी सावकारी दिसून येत नाही याचा अर्थ नेमकेपणाने घेण्याची वेळ आली आहे.

कोण आहेत हे खाजगी सावकार-
पूर्वी सरकारी व खाजगी नोकरीतील कर्मचारी व्याजाने पैसे देण्याचे काम करीत होते. किराणा मालाचे दुकान, भाजीची हातगाडी, स्नॅक्स सेंटर पासून मुला मुलींची लग्न यासाठी प्रामुख्याने व्याजाने पैसे घेण्याचे काम सुरू होते. त्यानंतर काळ बदलला. आता गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांचा यात शिरकाव झाला आहे. कथित गैरव्यवहारातून खंडणीच्या आलेल्या रकमा ह्या मोठे व्यापारी, दुकानदार यांना व्याजाने पैसे देण्याचे काम करू लागले. यानंतर गुन्हेगारी मंडळींनी त्यांचा मोर्चा अपार्टमेंट व झोपडपट्टीतील छोट्या मोठ्या भाईंकडे वळविला. त्यांनी अपार्टमेंट व झोपडपट्टी तसेच किरकोळ दुकानदार यांना व्याजाने पैसे देण्याचा व वसुलीचे कंत्राट घेण्यात आले. अशा प्रकारे ही खाजगी सावकारी वाढत गेली.
काही काळाने पुण्यात झोपडपट्यांतून एस.आर.ए. प्रकल्प बांधकाम व्यावसायिकांनी सुरू केले. झोपडपट्टीतील भाईंना हाताशी धरून, नागरीकांकडून संमतीपत्र मिळविण्याचा मोठा गोरख धंदा सुरू झाला. यात बांधकाम व्यावसायिकांनी संबधित भाई मंडळींना मोठ्या रकमा दिल्याने, त्यातूनही बरेच खाजगी सावकार जन्माला आले. अजूनही याच पैशांवर त्यांची खाजगी सावकारी सुरू आहे. पुण्यातील मार्केटयार्ड, स्वारगेट व खडक पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे ५०० च्या आसपास खाजगी सावकार कार्यरत आहेत. या सावकारांबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत.परंतु पोलीस त्यांची दखल घेत नाहीत अशा नागरीकांच्या तक्रारी आहेत.
बांधकाम, कापड उदयोग, ऑटोमोबाईल, ज्वेलरी यामध्ये तर पारंपारीक व्याजाने पैसे देण्याचे उद्योग तर वर्षानुवर्षे सुरू होते व आहेत. आता नव्याने वरील प्रकारची सावकारी पुढे आली आहे. पुणे शहर व ग्रामीण भागात अशा सावकारांची मोठी संख्या आहे.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील काळ्या पैशांना बिल्डरांची साथ
पुण्यातील महत्वाच्या पेठा, बाणेर, खराडी, वाकड, कोंढवा, मगरपट्टा, नांदेड आदि ठिकाणच्या बांधकामात नेमका कुणाचा पैसा लावण्यात आला आहे…
बांधकाम क्षेत्रात तर पूर्वीपासूनच काळ्या पैशांचा मोठा वापर करण्यात येत आहे. कोणतीही मल्टीनॅशनल कंपनी नसतांना, पुण्यातील हजार बाराशे बांधकाम व्यावसायिकांनी मोठ मोठे बांधकाम प्रकल्प केले आहेत. हे कोणत्या पैशातून केले आहेत. आधी बांधकाम व नंतर विक्री अशा प्रक्रियेत नागरीकांच्या २० टक्के आधी भरणा केलेल्या निधीतून दहा पंधरा मजल्यांची व दोन तीन एकरवर प्रकल्प करण्याची ऐपत कुणाचीच नसते. हा पैसा कुठून येतो हे आता सर्वांनाच ज्ञात झाले आहे.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील काही अभियंत्यांनी नोकरीसहित बांधकाम प्रकल्प उभे करण्याचा जोडधंदा मागील दहा पंधरा वर्षांपासून सुरू केलेला आहे. कित्येक अभियंते हे सेवानिवृत्तीनंतर बांधकाम व्यवसायात सक्रिय आहेत. पुणे महापालिकेतील काळ्या पैशांच्या आधारावर पुणे शहरातील कित्येक बांधकाम व्यावसायिकांनी विना संमतीची व मंजुर लेआऊट व्यतिरिक्त मोठ मोठे प्रकल्प करून कोट्यवधी रुपये कमाविले आहेत. यातही मोठा काळा पैसा आहेच. शिवाय तो सावकारीचा आहे यातही शंका नाही.
पुण्यातील महत्वाच्या पेठा उदा- बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, गणेश पेठ, रविवार पेठ, नारायण पेठ, रास्ता पेठ व अन्य या ठिकाणी मोठे बांधकाम प्रकल्प झाले आहेत. एका ले आऊटला मंजुरी घेवून प्रत्यक्षात जागेवर दुसर्‍याच प्रकारची बांधकामे करण्यात आली आहेत. शेकडो ठिकाणी तर बांधकामांना मंजुरी न घेताच बांधकामे करण्यात आली आहेत. पुण्यातील बाणेर, खराडी, वाकड, कोंढवा, मगरपट्टा, नांदेड आदि ठिकाणी देखील अनेक अभियंत्यांच्या भागिदारीतील मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. काही प्रकल्प पूर्ण होवून, त्याची विक्री झालेली आहेत.

मंजुर लेआऊट मधील ओपन स्पेस आणि ऍमिनिटी स्पेसवर धडाधड १० ते १२ मजल्याच्या इमारती उभ्या, पण कारवाईच्या नावाने शिमगा कशासाठी….
खाजगी सावकारी का वाढली ह्याच उत्तर शोधण्यासाठी पुणे शहरातील पोलीसांना विशेष चौकशी समिती नियुक्त करण्याची अजिबात आवश्यकता नाही. पोलीस स्टेशनकडील खाजगी वसुलदारांचे कान उपटल्यास, ते खाजगी सावकारी काय असते, त्याचा हजार पांनाचा अहवाल पोलीस आयुक्तांना एक दिवसात देऊ शकतात असा मला (अ)विश्‍वास आहे.
पुण्यातील बहुतांश बांधकाम प्रकल्पात मंजुर लेआऊट मधील ओपन स्पेस, आणि ऍमिनीटी स्पेसवर धडाधड १० ते १२ मजल्यांच्या इमारती उभ्या केल्या आहेत. कित्येक तक्रारी नागरीकांनी केलेल्या आहेत. परंतु याबाबत पुणे महापालिकेत कुणीच काही बोलत नाही. यात अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, राजकीय पक्षांचे नेत्यांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे सगळं अळी मिळी गुप चिळी असा सगळा प्रकार आहे.
खाजगी सावकारी यामुळेच वाढलेली आहे. जिवघेणे हल्ले होत आहेत. यासाठी पुणे शहर पोलीसांनी मोक्का इतकेच काम खाजगी सावकारीत करणे गरजेचे आहे.