Monday, August 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुण्यातील सलून चालकांना सोलून काढण्याचा सरकारचा इरादा,

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेने शहरातील अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसह इतर सर्व दुकानेही सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्यासाबाबत आदेश दिले होते. तथापी सोमवारी रात्री राज्य शासनाकडून पुन्हा सुधारित आदेश आले असून यामध्ये सलून व ब्युटीपार्लरला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे पुणे शहरातील सलून व ब्युटीपार्लर बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


दरम्यान पुणे शहरातील सर्व दुकानांना परवानगी आहे, मात्र सलून दुकानांनाच परवानगी नाकारण्यात आली आहे. तथापी पुणे शहरातील बहुतांश सलून दुकानांमध्ये कोरोना येण्याच्या आधीपासून म्हणजे पूर्वापार परंपरेनुसार, प्रत्येक ग्राहकांना नवीन ब्लेडचा वापर केला जात आहे. कात्री, वस्तारे व इतर साधनांना तुरटी आणि इतर जंतुनाशकांमध्ये स्वच्छ धुवूनच त्याचा वापर करण्यात येत होता. नागरीकांच्या आरोग्याची काळजी ही पूर्वपरंपरेनुसार घेण्यात येत होती.
तथापी अमेरिकेसारख्या राष्ट्रात सलूनच्या दुकानातून कोरोना पसरला आहे, हे जगजाहीर झाल्यामुळे राज्य शासनाने तेच डोक्यात ठेवून सलून दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. थोडक्यात पाऊत अमेरिकेत पडत आहे, आणि छत्र्या मात्र भारतात आणि त्यातही पुणे शहरात उघडून फिरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
केस कापणे, दाढी करणे ही नियमित व नित्याचीच बाब आहे. यामध्ये तुरटी सहित इतर जंतुनाशकांचा वापर हा पूर्वापार होत असतांना, सलून चालकांवर अन्याय करणे अनुचित स्वरूपाचे आहे. सलून चालक कोरोना नियमांचे पालन करून, कामे करण्यास तयार असतांना देखील त्यांना का डावलले जात आहे हे समजण्यास कारण नाही. थोडक्यात सलून चालकांना काकडी सोलल्या सारखे सोलून काढण्याचे काम राज्य शासन आणि पुणे महापालिका करीत असल्याचे दिसून येत आहे.
आजपर्यंत राज्यात पाचशेच्या आसपास सलुन चालक व कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येकांची दुकाने ही भाड्याने घेण्यात आलेली आहेत. तसेच दुकानामधील फर्निचर स्वखर्चाने केले असल्यामुळे भाड्याचे दुकान खाली/रिकामे करणे शक्य नाही. दुकानमालक भाडे घेण्याचा थांबलेला नाही. त्यामुळे दारिद्रयात दारिद्रये निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांपेक्षाही अधिक वाईट अवस्था सलून चालकांची झाली आहे.
लॉकडाऊन झाल्यापासून म्हणजे मागील दीड वर्षांपासून, पुणे शहरातील नागरीकांची केस व दाढी कापली नसती तर आज पुणे शहरात अश्मयुगातील लोकांसारखे लोक दिसू लागले असते. खांद्यावर डोक्यावरचे केस आणि छातीपर्यंत दाढी म्हणून फिरणारे लाखो नागरीक आज दिसले असते. म्हणजे सर्व नागरीक कुठे ना कुठे केस कापण्याचे व दाढी करण्याचे काम करवुन घेत असावेत. सगळ्या पोलीसांचे केस आजही बारीक आहेत, दाढी चकाचक आहे.
सगळया सरकारी व खाजगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची केस बारीब आहेत, दाढी चकाचक आहे, याचा अर्थ ते कुठे ना कुठे तरी केस कापून घेत असतील. त्यांना बरे, कुठे कोरोना झाला नाही. मग दुकाने उघडल्यानंतर कोरोना होतो याचा तर्क कशाच्या आधारे शासन लावत आहेत ते समजण्यास कारण नाही.
ज्या शासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी हा निर्णय घेतला, त्यांनी देखील लॉकडाऊन काळात कुठे ना कुठे तरी केस कापले असतील, दाढी केली असेलच. त्यांनी दाढी केस कापले नसते तर आज मंत्रालयात देखील अश्मयुगातील लोक आले की काय असा भास निर्माण झाला असता.
ते तसे झाले नाही, याचा अर्थ ते देखील कुठे ना कुठे तरी केस व दाढी करीत असतील यात शंकाच नाही. त्यामुळे दुकानदारांच्या भावना, त्यांचेही कुटूंब आहे, हे लक्षात घेवून, सलूनची दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची नितांत आवश्यकता आहे.