Monday, April 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

देशातील ८ एजन्सीज माझा फोन टॅप करतायत; बाळासाहेब आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

पुणे/दि/ प्रतिनिधी/
तब्बल आठ एजन्सीकडून माझा फोन टॅप केला जात आहे. माझे त्याबद्दल काहीही आक्षेप नाही. त्यांनी खुशाल माझा फोन टॅप करावा, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावर त्यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी याबद्दलचे उत्तर दिले.


माझं फोन टॅपिंग होतो. माझा फोन आता ऑन केला तरीही फोन टॅप होतो हे मी दाखवू शकतो. माझा फोन टॅप करणार्‍या एक एजन्सी नाही. आठ एजन्सी आहेत. त्यांच्याकडून फोन टॅप केला जात आहे, असा खळबळजनक दावा बाळासाहेब आंबेडकरांनी केला आहे. मी खुशाल म्हणतो, माझे फोन टॅप करा. माझे त्याबद्दल काहीही ऑब्जेक्शन नाही. मी कोणत्याही गुन्हेगाराशी बोलत नाही. तसेच कोणालाही फोन करुन पैसे मागत नाही, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना कणा नाही
महाविकासआघाडी सरकारमध्ये गुन्हेगारी वृत्ती आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून राज्यात नवं सरकार आलं पाहिजे, असं वक्तव्य बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. उद्धव ठाकरे हे गेल्या पाच वर्षांमध्येही सत्तेत होते. या गोष्टी त्यांना माहिती नाहीत, असे नव्हे.
पण उद्धव ठाकरे यांना कणा नाही. त्यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत, अशी खरमरीत टीकाही बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते पश्चिम बंगालची निवडणूक अशा विषयांवर चौफेर फटकेबाजी केली. सरकारमधील मंत्र्यांनी पोलीस अधिकार्‍यांना पैसे गोळा करायला सांगितले होते, ही सत्य परिस्थिती आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हा आदेश देण्यात आला होता का? मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती का, असा सवाल बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केला.
मोदी बंगालमध्ये जितका प्रचार करतील तितका फायदा ममता बॅनर्जींना मिळेल’
पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात नियमांचे उल्लंघन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च आदेशांची पायमल्ली करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल केलेला नाही. माझं पोलिसांना आव्हान आहे की, त्यांनी मोदींवर गुन्हा दाखल करुन दाखवावा. तसेच नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये जितका प्रचार करतील तेवढा फायदा ममता बॅनर्जी यांना होईल.
बंगालच्या लोकांना कोणीही डिवचलेले आवडत नाही. परंतु, मोदी वारंवार त्यांना बंगालमध्ये जाऊन डिवचत आहेत. त्यामुळे मोदी जितक्या वेळा बंगालमध्ये सभा घेतील ममता बॅनर्जींच्या जागांमध्ये तितकी भर पडेल, असे भाकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी वर्तविले.