Monday, August 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

जमावबंदी झुगारून वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेट समोर धडकला!

‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी लागणारा खर्च करायला राज्य सरकार तयार असल्याचे सांगावे जेणेकरून केंद्राला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी लागेल आणि त्यातून आवश्यक असलेला इमपीरिकल डेटा प्राप्त होईल.’

मुंबई/दि/ राज्य सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा थेट विधानभवन गेटवर धडकला. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी आदेश लागू केला तरी ‘वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचे वंचितचे अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले होते. सकाळ पासून मुंबईत येणार्‍या वंचितच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली होती. विधानभवन परिसरात पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली होती. त्यामुळे वंचितचा मोर्चा विधानभवन पर्यंत पोहचण्या आधीच अडवला जाईल अशी रणनीती पोलिसांनी आखली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गनिमीकाव्याने हजारो कार्यकर्ते विधानभवन परिसरात आधीच विखरून उभे केले होते.
ऍड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांचे विधानभवन गेटवर आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू केली.यावेळी माध्यमांशी बोलताना ऍड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, ‘ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा ठराव राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात मांडावा आणि तो ठराव केंद्र सरकारला आणि जनगणना आयोगास पाठवावा तसेच त्यासाठी लागणारा खर्च करायला राज्य सरकार तयार असल्याचे सांगावे जेणेकरून केंद्राला ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी लागेल आणि त्यातून आवश्यक असलेला इमपीरिकल डेटा प्राप्त होईल.’


केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मिलीभगत असून यांनी मिळून ओबीसी आरक्षण संपवण्याचा डाव आखल्याचा आरोप यावेळी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. तसेच ओबीसी आरक्षणाचे आंदोलन आता गावपातळीवर घेऊन जाणार असल्याचे जाहीर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, महिला आघाडी उपाध्यक्ष सविता मुंडे, प्रदेश उपाध्यक्ष नागोराव पांचाळ, किसन चव्हाण, अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, गोविंद दळवी, सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रियदर्शी तेलंग, युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकिर तांबोळी, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनराव गायकवाड, मुंबई प्रदेशाध्यक्ष अबुल हसन खान, महासचिव आनंद जाधव, संघटक विकास पवार आणि राज्यभरातून आलेले हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.