Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सायबर गुन्ह्यांत महाराष्ट्र दुसरा, एनसीआरबीची आकडेवारी

Police mahasanchalak mumbai

पुणे/दि/ प्रतिनिधी/
उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात करण्यात आल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) २०१७ मधील आकडेवारीवरून समोर आले आहे. महाराष्ट्रात २०१७ मध्ये ३६०४ आणि २०१६ मध्ये २३८० सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. उत्तर प्रदेशात याच वर्षांत अनुक्रमे ४९७१ आणि २६३९ सायबर गुन्हे नोंदवण्यात आले.

महाराष्ट्रात मागील सहा वर्षांत दाखल झालेल्या १० हजार ४१९ सायबर गुन्ह्यांमधील ७० टक्के प्रकरणांचा गुंता अद्याप सुटलेला नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे केवळ ०.३ टक्के गुन्ह्यांमध्येच दोषींना शिक्षा झाली आहे. महाराष्ट्र पोलिस दलाच्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०१७ या कालावधीत राज्यात १० हजार ४१९ सायबर गुन्हे दाखल करण्यात आले.
त्यापैकी तब्बल ७२५२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. या काळात २०७९ गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यातील केवळ १८४ गुन्ह्यांच्या खटल्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. त्यातही, केवळ ३४ गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा झाली आहे.
राज्यात सहा वर्षांत माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत (२०००) एकूण १६७ विशेष गुन्हे (एसएलपी) दाखल करण्यात आले. त्यातील एकाही गुन्ह्यात दोषीला शिक्षा झालेली नाही. त्याशिवाय भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यातील कलमे लावून दाखल झालेल्या ७४९४ गुन्ह्यांपैकी केवळ ३० प्रकरणांत दोषींना शिक्षा झाली आहे.
मुंबईचा देशात दुसरा क्रमांक
देशातील मोठ्या शहरांचा विचार केल्यास, २०१७ मध्ये बंगळूरुनंतर मुंबईत सर्वाधिक सायबर गुन्हे दाखल झाले. विशेष म्हणजे, मुंबईत दाखल होणार्‍या सायबर गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. मुंबईत २०१५ मध्ये ९७९ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली,
२०१६ मध्ये फक्त एका सायबर गुन्ह्याची भर पडून हा आकडा ९८० झाला. परंतु, २०१७ मध्ये १३६२ सायबर गुन्हे दाखल झाले. २०१७ मध्ये देशातील लैंगिक शोषणाचे सर्वाधिक म्हणजे २०४ गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आले.