Thursday, April 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने मराठी बेरोजगार व लहान शेतकर्‍यांना देशोधडीला लावले

APMC Market Pune

नियमांच्या अधिन राहून, राऊत बाईसाहेबांचा थाटच मोठा, देणार्‍याचं चांगभल, न देणार्‍याचा बाजार उठविला

पुणे/दि/ रिजवान अली शेख/
लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देशातील उद्योग व्यवसाय बंद आहेत. मोठे उदयोग बंद असल्यामुळे साहजिकच लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग धंदे बंद आहेत. बहुतांश जणांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. थोडक्यात उद्योग धंदे बंद पडल्याने नोकर्‍या गेल्या, शासकीय उदासिनता आणि बँकांच्या आडमुठे धोरणामुळे रोजगारही गेला. आता जगायचं कस हा प्रश्‍न राज्यातील सर्वच नागरीकांपुढे पडला आहे. त्यामुळे आपले व आपल्या कुटूंबियांचे पोट भरण्यासाठी नागरीक वाट्टेल तो धंदा करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु सध्याची अवस्था अशी झाली आहे की, कुटूंबिय मरू देत नाहीत आणि मायबाप सरकार जगु देत नाहीत अशी आजची अवस्था झाली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या अधिनस्थ असलेले बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील अतिक्रमण विभाग म्हणजे उलट्या काळजाचे लोक आहेत की काय अशी आज त्यांनी दशा व दीशा करून ठेवली आहे. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आज आंबेडकर नगर, मार्केटयार्ड, प्रेमनगर, डायस प्लॉट गुलटेकडी, आनंदनगर, तसेच जवळच असणारे अप्पर इंदिरानगर, चैत्रबन सारख्या मोठ्या व घनदाट लोकसंख्येच्या झोपडपट्टया आहेत. सर्व झोपडपट्या ह्या कंन्टेनमेेंट झोन मधल्या आहेत. पण पोटाला कंटेनमेंट करून जगणं शक्यच नाही. पोटाला दोन वेळंचं अन्न तर हवंच. पण नोकरी गेली. रोजगार नाही. मग नागरीक मार्केटयार्डातून काही सामान घेवून, त्याची विक्री करून, स्वतःचा व कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत.
दरम्यान सर्व उद्योग बंद पडल्याने पीएम आणि सीएम कार्यालयाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प सोडला आहे. पण बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयातील अतिक्रमण विभागाच्या प्रमुख राऊत बाईसाहेब मात्र झोपडपट्टतील एकाही नागरीकाला आत्मनिर्भर होवूच देत नाहीत. शासकीय नियमांच्या आडून रस्त्यावर गर्दी केली म्हणून अतिक्रमण कारवाई करीत सुटल्या आहेत.
पण थांबा…. अतिक्रमण कारवाई फक्त न देणार्‍यांवर होत आहे. जे माल / थैली देतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण जे पैसे थोडक्यात हप्ता वसूली देत नाहीत त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. मार्केटयार्ड पोस्ट ऑफिस ते बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या जवळपास पथारी व्यावसायिक थोडक्यात बेरोजगार युवक व महिला त्यांच्या मालाची विक्री करीत असतात. त्यातील काही लोकांचे राऊत बाईसाहेबांशी संधान असल्यामुळे कारवाई अगोदरच राऊत बाईंचा फोन खणखणतो.( ह्याचे पुरावे आमच्याकडे आहेत याची नोंद असावी.) फोना फोना होवूनच नंतर कारवाई केली जाते.
शेतकरी असो की शेतमजुर, झोपडपट्टीतील बेरोजगार व्यक्ती काम करीत असतांना, छोटया मोठ्या गाडीतून विक्री सुरू असते. त्याच वेळी संबंधितांवर कारवाई करून, त्याची गाडी जप्त केली जाते. दहा हजार रुपये भरा नाहीतर गाडी सोडणार नाही अशी धमकी दिली जाते. तडतोडी अंति पाच हजार रुपये भरून ८००/- रुपयांची पावती दिली जाते. अशी अनेक प्रकरणे आमच्याकडे आली आहेत. संपूर्ण अतिक्रमण विभागाला पैसे खाण्याची इतकी सवय झाली आहे की, त्यांच्या बदलीचा विषय आला तर बदली करणार्‍या अधिकार्‍याच्या थोबाडावर दोन पाच लाख रुपये फेकून ते बदली रोखून धरू शकतात एवढी ताकद आता अतिक्रमण विभागातील एका एका कर्मचार्‍याच्या हातात आली आहे.
पीएम आणि सीएम आत्मनिर्भर व्हा म्हणतात. पण बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय मात्र एका एका नागरीकाला हालहाल करून ठार करीत आहेत. आता पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड नेमक काय भूमिका घेतायत ते पाहूयात.

आर्थिक विवंचनेतून नर्‍हे, धायरी, धानोरी येथे आत्महत्या –
सिंहगड रस्त्यावरील नर्‍हे परिसरात ३८ वर्षीय इसमाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. अंबादास आसाराम काकडे वय ३८ यांचा खानावळीचा व्यवसाय असून ते जेएसपीएम कॉलेज परिरात खानावळ चालवित होते. लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून खानावळ बंद होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहली असून त्यामध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.
मागील काही दिवसांपासुन शहरात सातत्याने घडणार्‍या आत्महत्यांच्या सत्रामुळे सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच पोलीसही चिंतेत आहेत. लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, छोटा मोठा उद्योग धंदा बंद पडला, बँका कर्ज देत नाहीत, सरकारी अधिकारी ऐकुन घेत नाहीत या सर्व विवंचनेमुळे नागरीक आत्महत्या करीत आहेत. दरम्यान शहरात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, ते थांबायचे नाव घेत नाहीये. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांनी एकत्र येवून काहीतरी उपाय योजना करणे आवश्यक आहे.
प्रेमनगर, आंबेडकर नगर, औद्योगिक वसाहत व लगतच्या झोपडपट्टीतील बेरोजगार युवक व कष्टकरी महिलांवर राऊत बाहेसाहेबांचा एवढा राग तो कशासाठी –
छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात किरकोळ ग्राहक विक्री बंद आहे. तसेच कोरोना विषाणूच्या भितिने सोसायट्यामधील नागरीकांनी धुणीभांडी, केरकचरा झाडुवाले काम करणार्‍यांना सोसायटीत येण्यास मज्जाव केला आहे. ज्यांच्या छोट्या मोठ्या नोकर्‍या होत्या, त्या देखील उद्योग धंदे बंद पडल्यामुळे नोकर्‍या गेल्या आहेत. पाच/ सात लोकांचे कुटूंब चालवायचे तर तारेवरची कसरत करावी लागत आहेत. मायबाप सरकार रेशनिंगवर गहू व तांदूळ देत असली तरी गहु आणि तांदूळाला मिठ मिरची आणयची कुठून असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे स्थानिक झोपडपट्टीतील बेरोजगार युवक, कष्टकरी महिला, बाजूच्या ग्रामीण भागातील लहान व किरकोळ पिक घेणारे शेतकरी आणि शेतमजुर त्यांच्या शेतातील माल घेवून त्याची या भागात विक्री करीत आहेत. मात्र रस्त्यावर अतिक्रमण होतय म्हणून शासकीय बागुलबुवा करून, नागरीकांना रोजगारापासून वंचित ठेवलं जातय.
बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या राऊत बाईसाहेबांना ज्यांच्याकडून हप्ता बांधून दिला आहे, त्यांचे धंदे राजरोस सुरू आहेत. पण ज्यांना पन्नास रुपयेही देता येत नाहीत, त्यांना मात्र देशोधडीला लावण्याचे काम राऊत बाईसाहेबांनी केलं आहे.
पुरावा जमा करण्यात बाईसाहेब आघाडीवर –
बाजारातून काही माळवं घेवून, रस्त्यावर विक्री करणार्‍या बेरोजगारांवर कारवाई करीत असतांना, जिवाच्या आकांताने ते माझे साहित्य घेवून जावू नका हो….. हा वजन काटा दुसर्‍याला मागुन आणला आहे. आर्जवऽऽ विनंती करतांना मानवी मुखातून एक दोन शब्द इकडे तिकडे होतात. त्याच वेळी राऊत बाईसाहेब त्यांचा लाखभर रुपयांचा अँड्रॉईड मोबाईल काढुन त्यावर पुरावे जमा करून, नंतर ते पोलीसांना व क्षेत्रिय अधिकार्‍यांना दाखवुन असहाय्य नागरीकांवर कारवाईसाठी वापर करीत आहेत. आज सोमवार पासून तर इथ बसू देणंच बंद केलं आहे. त्यामुळे आता जगाव कसं हा प्रश्‍न झोपडपट्टीतील नागरीक व लहान मोठया शेतकर्‍यांपुढे पडला आहे.
पुण्यात यांचा कुणीतरी आवाज ऐकणार आहे काय… पोलीस आयुक्त साहेब मार्केटयार्ड पोलीसांना थोडतरी आवरा… महापालिका आयुक्त साहेब ह्या राऊत बाईसाहेबांना कुणीतरी आवरा, आम्हाला त्यांना दयायला आमच्याकडे काहीच न्हाई वंऽऽऽ सांगा जनतेने जगायच तरी कसंऽऽऽ (क्रमशः)

वरील झोपडपट्टीतील नागरीकांनी संपर्क करावा – रिजवान अली शेख – ९६५७६३६३२८